Leading International Marathi News Daily

मंगळवार, १६ जून २००९

क्रीडा
(सविस्तर वृत्त)

कसोटी क्रिकेट हाच माझा मुख्य आहार - तेंडुलकर
लंडन, १५ जून/पीटीआय

ट्वेन्टी २० क्रिकेट हे जेवणानंतर येणाऱ्या ‘डेझर्ट’प्रमाणे आहे. ते कितीही रुचकर वाटले तरी त्याने पोट भरत नाही. कसोटी क्रिकेट हेच मुख्य जेवणाप्रमाणे असते आणि कसोटी क्रिकेटशिवाय मी जगूच शकत नाही, असे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने म्हटले आहे. शेवटी कुठल्याही

 

क्रिकेटपटूसाठी कसोटी क्रिकेट हेच अव्वलस्थानी असेल, असेही त्याने सांगितले. कसोटी क्रिकेटमध्ये गोलंदाज हे सतत फलंदाजाला बाद करण्याचा प्रयत्न करतात आणि तुम्हाला यात वर्चस्व गाजविण्यासाठी पाचही दिवस चांगला खेळ करायला लागतो.
ट्वेन्टी-२० प्रकारात एखादा खेळाडू २०-३० मिनिटांच्या खेळात आपल्या संघासाठी चमकदार कामगिरी करून जातो याचाच अर्थ या प्रकारात यश मिळविणे सोपे आहे, असे सचिन म्हणतो. कसोटी क्रिकेटमध्ये ५४.५८ च्या सरासरीने १२,७७३ अशा विक्रमी धावा करणारा सचिन कसोटी क्रिकेट हेच खरे क्रिकेट मानतो; पण तरीही एकदिवसीय क्रिकेटचा विश्वचषक जिंकणे हे त्याचे स्वप्न आहे. गेल्या पाच विश्वचषक स्पर्धामध्ये भारताला विश्वचषकाने हुलकावणी दिलेली असून यावेळी तो पटकावण्याचे स्वप्न तो पाहतो आहे.
सचिन म्हणतो, भारताने १९८३ मध्ये विश्वचषक पटकावला त्यावेळी माझ्या मित्राच्या घरी ते क्षण मी अनुभवले. विजयानंतर सगळे मित्र आनंदाने उडय़ा मारीत होते, नाचत होते, मीदेखील त्यांच्यात सामील झालो; पण नेमके काय घडते आहे हे मला कळत नव्हते. मात्र त्या विश्वचषक विजयानंतरच मी गांभीर्याने क्रिकेटचा विचार करू लागलो. तोपर्यंत मी टेनिस चेंडूनेच क्रिकेट खेळायचो. त्या विजयाचे सेलिब्रेशन पाहून एक विजय संपूर्ण राष्ट्राचा मूड कसा बदलतो हे त्यावेळी मला समजले आणि त्यामुळेच विश्वचषक विजय हे माझे स्वप्न बनल्याचे सचिनने सांगितले.
ट्वेन्टी २० च्या माध्यमातून क्रिकेटचा प्रसार करायला आपल्याला आवडेल असेही सचिनने म्हटले आहे. हा खेळ फारसा प्रचलित नसलेल्या अमेरिकेसारख्या देशात या खेळाचा प्रसार करणे आपल्याला आवडेल. ट्वेन्टी-२० क्रिकेटमुळे क्रिकेट न खेळणाऱ्या देशांमध्येही या खेळाविषयी उत्सुकता निर्माण केल्याचे सचिनने म्हटले आहे. क्रिकेट या खेळाचा स्टेडियममधून जो सर्वप्रथम अनुभव घेतो तो सदैव क्रिकेटच्या चाहता होतो हे आपण स्वत:च्या अनुभवावरून सांगतो असे सचिन म्हणतो. १० वर्षाचा असताना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर त्याने प्रथम वेस्ट इंडिजचा असताना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर त्याने प्रथम वेस्ट इंडिजचा सामना पाहिला. चेंडू किती वेगात येतो हे त्यावेळी प्रथमच पाहणाऱ्या सचिनला त्यावेळी गावसकर आणि रिचर्डस् ही त्याची दैवतं प्रत्यक्ष पाहता आली. टी. व्ही.वर तो अनुभव आपल्याला घेता आला नसता असे सचिन म्हणतो. शालेय क्रिकेटपटूंना कसोटी सेंटर्सवर तीन-चारशे जागा राखीव ठेवाव्यात, असे सचिन म्हणतो. कारण भविष्यात हीच मुले स्टेडियम्सवर येणार असतात, अशी पुस्ती सचिनने जोडली.