Leading International Marathi News Daily

मंगळवार, १६ जून २००९

क्रीडा
(सविस्तर वृत्त)

लाज राखण्याची भारताला शेवटची संधी
आज दक्षिण आफ्रिकेशी भिडणार
नॉटिंगहॅम, १५ जून/ पीटीआय

जेतेपद पटकाविण्याचे दडपण, आपीएलमध्ये खेळून शरिराला आलेला शीण, दुखापती आणि सेहवाग प्रकरण या सर्वाचा फटका यावेळी भारतीय संघाला बसला. यामुळे अपेक्षेनुरूप कामगिरी

 

न झाल्याने भारतीय संघाचे विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले आहे. उद्या भारताचा ‘सुप एट’ मधील अंतिम सामना दक्षिण आफ्रिकेविरूद्ध होणार असून लाज राखण्यासाठी भारतीय संघांला ही शेवटची संधी असेल. या सामन्याचा दोन्हीही संघांवर काहीही परिणाम होणार नाही. कारण भारतीय संघ स्पर्धेतून बाहेर पडला असून दक्षिण आफ्रिकेचा संघ उपान्त्य फेरीत दाखल झाला आहे.
इंग्लंडविरूद्धच्या सामन्यात झालेल्या निसटत्या पराभवामुळे भारताचे स्पर्धेतील आव्हान तर संपुष्टात आलेले आहेच. पण त्याचबरोबर धोनीच्या विजयी रथाला ‘ब्रेक’ बसला आहे. काहि दिवसांपूर्वी यश धोनीच्याबरोबर चालत होते. पण या पराभवामुळे त्याची साथ यशाने सोडलेली दिसत आहे. या पराभवानंतर धोनीने देशवासियांची माफी मागितलेली असली तरी दक्षिण आफ्रिकेला नमवून देशाची लाज वाचविण्यासाठी भारतीय संघ प्रयत्नशील असेल. एकिकडे भारतीय संघ स्पर्धेबाहेर पडलेला असला, तरी दक्षिण आफ्रिकेने स्पर्धेतील एकही सामना न गमावलेला नसून त्यांनी उपान्त्य फेरीत स्थान मिळविलेले आहे. हे दोन्हीही संघ ट्वेन्टी-२० या प्रकारात २००७ च्या विश्वचषकात एकमेकांसमोर उभे ठाकलेले होते. त्यावेळी भारताने दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले होते. त्यामुळे गॅ्रमी स्मिथचा संघ यावेळी पराभवाचा बदला काढण्यासाठी मैदानात उतरेल.
या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ आतूर आहे, असे मत दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षक मीकी आर्थर यांनी व्यक्त केले आहे. भारताची फलंदाजी कागदावर बलाढय़ वाटत असली तरी गेल्या सामन्यात संघाला १५४ धावाही करता आल्या नाहीत. त्यामुळे फलंदाजांवर या सामन्यात नक्कीच दडपण असेल. वीरेंद्र सेहवागच्या जागी आलेल्या रोहित शर्माकडे फटके खेळण्याची क्षमता असली तरी त्याच्याकडे मानसीक स्थैर्य नाही, ही गोष्ट सर्वापुढे आलेली आहे. सेहवाग एवढा अनुभव तर त्याच्याकडे नक्कीच नाही. सलामीवीर गौतम गंभीर आणि सुरेश रैना फॉर्मात नाहीत. युसूफ पठाणला योग्य ती संधी धोनीने दिलेली नाही. इंग्लंडविरूद्धच्या सामन्यात रवीेंद्र जडेजा या नवोदीत खेळाडूपेक्षा युसूफला फलंदाजीला का पाठवले नाही, हा प्रश्न साऱ्यांनाच पडलेला आहे. फलंदाजीला येताना धोनीची देहबोली सकारात्मक वाटत नाही आणि याचाच परिणाम कुठे तरी संघाच्या कामगिरीवर होताना दिसत आहे. युवराज सिंग हा अन्य फलंदाजांपेक्षा थोडासा सरस वाटत आहे. गोलंदाजीमध्ये आर. पी. सिंग चांगली गोलंदाजी करत असतानाही त्याला चौथे षटक का देण्यात आले नाही हेसुद्धा अनाकलनीय आहे. हरभजन सिंग चांगली गोलंदाजी करत असला तरी अवांतर धावा देण्यावर त्याने अंकूश ठेवायला हवा.
दक्षिण आफ्रिकेचा संघ भन्नाट फॉर्मात आहे. न्यूझीलंडविरूद्धचा सामना १२८ धावा करूनसुद्धा दक्षिण आफ्रिकेचा संघ सामना जिंकू शकतो, यामध्ये त्यांच्या गोलंदाजीतील धार समजता येईल. फलंदाजीमध्ये कर्णधार गॅ्रमी स्मिथ, जॅक कॅलिस, ए. बी. डी.‘व्हिलिअर्स, अ‍ॅल्बी मार्केल, मार्क बाऊचर आणि जे. पीय डय़ुमिनी एवढे फलंदाज असून त्यांनी लौकिकाला साजेशी कामगिरी केलेली आहे.