Leading International Marathi News Daily

मंगळवार, १६ जून २००९

क्रीडा
(सविस्तर वृत्त)

भारतीय हॉकीच्या नंबर गेममध्ये केपीएस गिल ‘नंबर वन’
महेश विचारे, मुंबई, १५ जून

नाटय़मय ‘ड्रिबलिंग’सह पुढे पुढे सरकत राहणे ही भारतीय हॉकीची ओळख बनली आहे. के.पी.एस. गिल यांना भारतीय हॉकी फेडरेशनमधून दूर केल्यानंतर वेगळे काहीतरी घडेल अशी

 

अटकळ बांधली जात असताना पुन्हा एकदा गिल ‘बिग बॉस’ म्हणून भारतीय हॉकीमध्ये स्थान निर्माण करू लागले आहेत. त्याचदरम्यान, बंगाल हॉकी संघटनेचे अध्यक्ष जे. बी. रॉय हे आपल्यासोबत अनेक राज्य संघटना असल्याचे दाखवून शक्तीप्रदर्शन करीत आहेत. हॉकीचा कैवार आपल्याकडेच आहे, असे ठामपणे म्हणणाऱ्या या दोन्ही गटात तूर्तास गिल हेच ‘नंबर वन’ आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसांत किंवा महिन्यात होणाऱ्या घडामोडींत रॉय यांचे शक्तीप्रदर्शन निष्प्रभ ठरण्याची शक्यता दिसते आहे.
काल नवी दिल्ली येथे झालेल्या गिल यांच्या नेतृत्वाखालील भारतीय हॉकी फेडरेशन व ऑलिम्पिक संघटनेने स्थापन केलेल्या हॉकी इंडियाची एकत्रित बैठक झाली, त्यावेळी पुरुष हॉकी संघटना व महिला हॉकी संघटनेच्या विलिनीकरणाचा मुद्दा चर्चिला गेला व आता हॉकीसाठी एकत्रित काम करण्याची वेळ आल्याचीही उपरती झाली. आज मुंबईत रॉय व दिल्लीच्या अमृत बोस यांनी एकत्र येऊन हॉकीसाठी काहीतरी करण्याची इच्छा प्रदर्शित केली व गिल-हॉकी इंडियाची युती कशी होऊ शकते, असा सवालही उपस्थित केला. रॉय यांच्या या बंडखोरसदृश भाषेला देशभरातून फारसा प्रतिसाद मिळण्याची, अगदी त्यांनी कितीही राज्य संघटना आपल्यासोबत आहेत, हे पटवून सांगितले तरीही शक्यता दिसत नाही, असे हॉकीतील सूत्रांचे म्हणणे आहे.
गिल यांच्या अध्यक्षतेखालील भारतीय हॉकी फेडरेशन हीच देशातील मूळ हॉकी संघटना आहे. शिवाय, त्यांनी दिल्लीतील बैठकीत २० राज्य संघटना आपल्यासोबत आहेत, हे सप्रमाण सिद्ध केले आहे. आसाम, झारखंड, छत्तीसगड यांचाही त्यांना पाठिंबा असल्याची पत्रे त्यांच्यापाशी आहेत. असाच पाठिंबा रॉय यांनाही असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत त्या त्या संघटनांच्या प्रतिनिधींच्या स्वाक्षऱ्यांसह सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे, पण याच संघटनांमधील प्रतिनिधी दिल्लीच्या बैठकीतही होते. त्यामुळे या संघटना नेमक्या कोणाच्या बाजूने आहेत, असा सवाल उपस्थित केला जात आहे. रॉय यांच्या नेतृत्वाखालील गटाला कायदेशीर आधार नाही, मान्यता नाही. ती स्थिती गिल यांच्याबाबत नाही. ज्योतिकुमारन भ्रष्टाचार प्रकरणानंतर निलंबित करण्यात आलेल्या भारतीय हॉकी फेडरेशनवरील कारवाई मागे घेण्यात आली आहे. गिल हे पुन्हा निवडूनही आले आहेत. जे महत्त्वाचे संघ हॉकीत पाहायला मिळतात, ते सर्व भारतीय हॉकी फेडरेशनच्या पाठीशी आहेत. त्यामुळेच फेडरेशनशिवाय काम कसे करायचे हा प्रश्न हॉकी इंडियाला पडणे यात आश्चर्य नव्हते. म्हणूनच त्यांनी अखेर गिल यांच्याशी दिलजमाई करण्याचा निर्णय घेतला असावा, असेही बोलले जात आहे. शेवटी विश्वचषक हॉकी व राष्ट्रकुल स्पर्धेच्या आयोजनासाठी अधिकृत फेडरेशनच्या ध्वजाखाली काम करण्याशिवाय पर्याय नाही, हे सत्य हॉकी इंडियाला उमगले आहे, असाही निष्कर्ष यातून काढला जात आहे. निलंबनाच्या कारवाईनंतर गिल यांनी न्यायालयात धाव घेतली होती. आता हॉकी इंडिया आणि गिल ही बाब परस्पर सामंजस्याने सोडविण्यासाठी चर्चा करीत आहेत. यावरूनही गिल यांचेच पारडे जड असल्याचे मानले जात आहे.
रॉय यांच्यासोबत असलेल्या राज्यांत मुळात हॉकी कितीप्रमाणात खेळली जाते, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दुसरे कारण म्हणजे या संघटनांपैकी अनेकांचे प्रतिनिधी दिल्लीतील गिल-हॉकी इंडियाच्या बैठकीला हजर होते. त्यामुळे उद्या गिल यांना झुकते माप मिळत असल्याचे दिसल्यानंतर यातील अनेक मंडळी वाऱ्याच्या दिशेने पाठ करतील, यात शंका नसल्याचीही चर्चा आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनने पुरुष व महिला हॉकी संघटना यांचे विलिनीकरण करावे अन्यथा विश्वचषकाचे यजमानपद गमवावे लागेल, असा इशारा दिल्यामुळे आता गिल-हॉकी इंडिया यांच्या हालचालींनी वेग घेतला आहे. त्यामुळे त्यात रॉय यांच्या गटातील मंडळीही हमखास सामील होतील, असा जाणकारांचा होरा आहे.
भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांनी यासंदर्भात चर्चा करण्यासाठी रॉय व बोस यांना आमंत्रित केले आहे, असे अमृत बोस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार गिल यांच्या भारतीय हॉकी फेडरेशनला टाळून कलमाडी रॉय यांच्या गटाला जवळ करू शकत नाहीत.
दरम्यान, आज जे. बी. रॉय आणि अमृत बोस यांच्या नेतृत्वाखालील गटाने पत्रकार परिषद घेऊन भारतीय हॉकीच्या भवितव्याविषयी जी चर्चा केली, त्याचा तपशील दिला. त्यांच्यासोबत २२ पुरुष व २० महिला राज्य संघटना आहेत, असे त्यांनी जाहीर केले. आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशन, आशियाई हॉकी फेडरेशन व भारतीय ऑलिम्पिक संघटना यांच्याशी वाटाघाटी करण्याचे अधिकार या दोघांना देण्यात आल्याचेही स्पष्ट करण्यात आले. गेली आठ वर्षे पुरुष व महिला संघटनांच्या विलिनीकरणाचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगतानाच लवकरात लवकर ती प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असा विश्वासही त्यांनी प्रकट केला आहे. हॉकी इंडियाला विरोध करीत लोकशाही मार्गाने तेथे निवडणुका व्हाव्यात अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. अशा निवडणुका झाल्या तर कुणीही हॉकी इंडियाचा अध्यक्ष झाल्यास आम्ही त्याला पाठिंबा देऊ अशी भूमिकाही त्यांनी मांडली. लवकरच आपण सुरेश कलमाडी यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर आपली बाजू मांडू असेही त्यांनी म्हटले आहे.