Leading International Marathi News Daily

मंगळवार, १६ जून २००९

क्रीडा
(सविस्तर वृत्त)

गुलवरील चेंडू कुरतडण्याच्या आरोपामुळे पाकिस्तानी खेळाडू संतप्त
कराची, १५ जून/ वृत्तसंस्था

न्यूझीलंडचा कर्णधार डॅनिअल व्हेटोरी याने पाकिस्तान गोलंदाजांवर चेंडू कुरतडण्याचा आरोप केल्यामुळे पाकिस्तानच्या खेळाडूंकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
सुपर एट फेरीतील सामन्यात पाकिस्तानने शनिवारी न्यूझीलंडचा पराभव केला. या सामन्यात पाकिस्तानच्या उमर गुल याने तीन षटकांत अवघ्या सहा धावात पाच बळी घेऊन न्यूझीलंडचा डाव ९९ धावांत गुंडाळण्यात मोठा वाटा उचलला. ट्वेंटी २० सामन्यांत गोलंदाजीतील ही सर्वोत्तम कामगिरी आहे.
सामना संपल्यानंतर व्हेटोरी याने उमर गुल याचे चेंडू ज्या पद्धतीने रिव्हर्स स्विंग होत होते, त्याबद्दल

 

आश्चर्य प्रकट केले होते. सामन्याच्या १२ व्या षटकांत एखादा गोलंदाज रिव्हर्स स्विंग करताना मी प्रथमच पाहिला, असे व्हेटोरी म्हणाला होता. उमर गुल याने चेंडू कुरतडला असावा असा अप्रत्यक्ष आरोप व्हेटोरीने केला होता. उपलब्ध झालेल्या माहितीनुसार व्हेटोरी याने या संदर्भात सामनाधिकारी रंजन मदुगले यांच्याकडे तक्रार नोंदवून उमर गुल याचे चेंडू रिव्हर्स स्विंग कसे होत होते याची चौकशी करण्याची मागणी केली होती. मात्र मदुगले यांनी व्हेटोरी याची चौकशीची मागणी फेटाळून लावली. पाकिस्तान गोलंदाजांनी चेंडू कुरतडला असेल असे मानण्याएवढा पुरावा नाही, असेही मदुगले यांनी व्हेटोरी याला सांगितले होते.
पाकिस्तान- न्यूझीलंड सामना ज्या ओव्हल मैदानावर झाला त्याच मैदानावर तीन वर्षापूर्वी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात पाकिस्तानच्या गोलंदाजांना चेंडू कुरतडल्याबद्दल शिक्षा केली होती.
व्हेटोरी याने चेंडू कुरतडल्याबद्दलचा केलेला आरोप अतिशय हास्यास्पद असल्याची प्रतिक्रिया उमर गुल याने व्यक्त केली आहे. प्रत्येक षटकानंतर पंच चेंडूची पाहणी करतात, अनेकदा षटक चालू असतानाही चेंडू तपासतात असे असताना आम्ही चेंडू कुरतडला असे म्हणणे हास्यास्पदच आहे, असे गुल याने पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. चेंडू रिव्हर्स स्विंग कसा करावा ही एक कला आहे. वकार युनूस, वासिम अक्रम यांच्याकडून मी चेंडू रिव्हर्स स्विंग कसा करावा हे शिकलो, असेही तो म्हणाला. पाकिस्तानचा कर्णधार युनिस खान म्हणाला की, उमर गुल हा चेंडू रिव्हर्स स्विंग करण्याचा नेटमध्ये सतत सराव करीत असतो. त्याने मोठय़ा परिश्रमाने रिव्हर्स स्विंगची कला साध्य केली आहे. चेंडूू रिव्हर्स स्विंग करण्याची आणि अचूक यॉर्कर टाकण्याची त्याची ही क्षमता पाहूनच आम्ही त्याला डावाच्या मध्यास गोलंदाजी देण्याची चाल खेळली होती. ती चाल यशस्वी ठरली. गुल याच्यावर चेंडू कुरतडण्याचा आरोप करणे म्हणजे त्याच्या गोलंदाजीच्या क्षमतेवर अन्याय करण्यासारखे आहे.