Leading International Marathi News Daily

मंगळवार, १६ जून २००९

क्रीडा
(सविस्तर वृत्त)

ज्युनियर विश्वचषक हॉकी : भारताची बेल्जियमवर ४-० ने मात
सिंगापूर, १५ जून/पी.टी.आय.

ज्युनियर विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारताने बेल्जियमवर ४-० असा विजय मिळविला आणि ९ ते १६ क्रमांकासाठी ‘ग’ गटात सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली.

 

सेन्ग कॅन्ग स्पोर्टस् कॉम्प्लेक्स येथील लढतीत भारताच्या कर्णधार दिवाकर राम (२५ वे मिनिट), मोहम्मद अमिर खान (२७ वे मिनिट), व्हिक्टो सिंग (४० वे मिनिट) आणि जय करण (५९ वे मिनिट) यांनी प्रत्येकी एक-एक गोल करून भारताला विजय मिळवून दिला.
सलग दोन विजयांमुळे भारताचे ‘ग’ गटात सहा गुण झाले असून ९ आणि १० व्या क्रमांकासाठी त्यांची लढत निश्चित आहे. बुधवारी गटातील शेवटच्या साखळी लढतीत त्यांची गाठ इंग्लंडशी पडणार आहे.
भारतीय संघाने सलग दुसऱ्या दिवशी अचूक पास आणि आक्रमण अशा उत्कृष्ट हॉकी खेळाचे प्रदर्शन केले. ेबेल्जियम विरुद्धच्या लढतीत सुरुवातीला मनदीप अन्तील, व्हिक्टो आणि डॅनिश मुजतबा याची आक्रमक चाल बेल्जियमच्या बचावफळीने निष्प्रभ ठरवून भारताची आघाडी घेण्याची संधी हुकवले. मात्र २५ व्या मिनिटाला दिवाकरच्या जोरदार ड्रॅगफ्लिकने भारताला खाते उघडून दिले. दोनच मिनिटांनी उजव्या बगलेवरून मुजतबाकडून मिळालेल्या सुरेख पासवर अमिर खानने चेंडू अचूक गोलक्षेत्रात मारून संघाला दुसरा गोल करून दिला. पहिल्या सत्रात शेवटी बेल्जियमने आक्रमक खेळ करून तीन पेनल्टी कॉर्नर मिळविले. मात्र भारताचा गोलरक्षक मृणाल चौबे याने हे तिन्ही प्रयत्न हाणून पाडले व भारताची २-० अशी आघाडी टिकवून ठेवली.
सामन्याच्या दुसऱ्या सत्रात पाचच मिनिटांनी व्हेटोने बेल्जियम गोलरक्षकाला चकवून संघासाठी तिसऱ्या गोलची नोंद केली. त्यानंतर भारतीयांनी आघाडीच्या फळीत झटपट बदल करीत आक्रमणाची धार वाढवीत नेली. ५९ व्या मिनिटाला जय करण आणि डॅनिश मुजतबा यांनी जोरदार मुसंडी मारली व जय करणने चेंडू गोलक्षेत्रात मारून संघाचा चौथा गोल नोंदविला.