Leading International Marathi News Daily

मंगळवार, १६ जून २००९

ठाणे पालिका अर्थसंकल्पास मुख्यमंत्र्यांची स्थगिती
ठाणे/प्रतिनिधी : विरोधी पक्षांच्या अनुपस्थित मंजूर करण्यात आलेला ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प कायदेशीर कचाटय़ात सापडला आहे. रात्री उशिरा अर्थसंकल्पाला दिलेली मंजुरी बेकायदेशीर असल्याच्या विरोधी पक्षाच्या तक्रारींची दखल घेत मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी या अर्थसंकल्पाला स्थगिती दिल्याचे समजते.

एमएमआरडीएचे पाणीपुरवठा क्षेत्रात पदार्पण
सोपान बोंगाणे

आजपर्यंत रस्ते बांधणी व विकासकामे राबविणारी ‘एमएमआरडीए’ सूर्या धरणाचे पाणी वसई-विरारला पुरविण्याच्या माध्यमातून प्रथमच पाणीपुरवठय़ाच्या क्षेत्रातही पदार्पण करणार आहे.
सूर्या धरणातील पाणी वसई-विरार पट्टय़ातील १५ लाख लोकवस्तीला पुरविण्यासाठी ‘एमएमआरडीए’ने तयार केलेल्या पाणीपुरवठा योजनेला पाटबंधारे विभागाने हिरवा कंदील दाखविला आहे. त्यासाठी आवश्यक असलेली ९६ कोटी ३३ लाख रुपये एवढी रक्कम पाटबंधारे विभागाकडे वर्ग होताच योजनेच्या पहिल्या टप्प्यातील कामाला प्रारंभ केला जाणार आहे.

विद्यार्थी स्वागत अभियानाने गाजला शाळेचा पहिला दिवस!
श्रमजीवी संघटनेचा दोन हजार शाळांत उपक्रम
ठाणे/प्रतिनिधी
पाना-फुलांनी सजवलेल्या कमानी, रस्त्यावर काढलेल्या रंगीबेरंगी रांगोळ्या आणि सनईच्या मंजूळ स्वरांनी न्हाऊन निघालेल्या प्रचंड उत्साही वातावरणात आज ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण आदिवासी भागातील नव्या वर्षांच्या शालेय सत्राची सुरुवात झाली. सुट्टय़ा संपून शाळा सुरू होताना आदिवासी मुलांचे शाळेत उत्साहात स्वागत करण्याची नवी परंपरा आज श्रमजीवी संघटनेने ठाणे जिल्ह्यात सुरू केली. जिल्ह्यातील दोन हजार शाळांत संघटनेच्या हजारो कार्यकर्त्यांनी या उपक्रमाला प्रथमच सुरुवात केली.

बदलापूरच्या गणेशमूर्ती चालल्या मॉरिशसला!
बदलापूर/वार्ताहर : यंदा गणेश चतुर्थी २३ ऑगस्ट रोजी असून येथील आंबवणे बंधूंच्या श्री गणेश चित्रकला मंदिरातील ‘श्रीं’च्या मूर्ती मॉरिशसला जाण्यासाठी तयार आहेत. दोन महिने अगोदरच जूनच्या अखेरीस त्या रवाना होणार आहेत. थोडय़ा थोडक्या नव्हे, तर तब्बल ४५२ गणेशमूर्ती जलमार्गाद्वारे जहाजातून रवाना होतील.

कल्याण-डोंबिवलीच्या मानगुटीवर २१८ कोटींचा पांढरा हत्ती
कल्याण/प्रतिनिधी - ‘बाप दाखव, नाहीतर श्राद्ध कर’ असा विचार करून २१८ कोटी ८१ लाख रुपयांचा एक पांढरा हत्ती पालिकेच्या मानगुटीवर येऊन बसला आहे. या हत्तीला तोंड कसे द्यायचे, असा मोठा पेच १०७ नगरसेवकांसमोर पडला आहे. काही नगरसेवकांच्या कमरेला असलेली परवानाधारी रिव्हॉल्व्हरही या हत्तीसमोर ‘किस झाड की पत्ती’सारखी आहे, असेही सध्याचे चित्र आहे. म्हणजे नगरसेवक, अधिकाऱ्यांनी तयार केलेल्या ११३ कोटींच्या खड्डय़ाने पालिकेची लक्तरे वेशीवर टांगलेली असतानाच, २१८ कोटींच्या एका नव्या फेऱ्यात पालिका अडकली आहे.

शिक्षण मंडळ अध्यक्षांचा उपोषणाचा इशारा
ठाणे/प्रतिनिधी : शिक्षणाधिकारी नसल्याने तसेच पालिका प्रशासनही गांभीर्याने लक्ष देत नसल्याने शिक्षण मंडळाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. ते सोडविण्याबाबत सातत्याने पाठपुरावा करूनही प्रशासन लक्ष देत नाही. त्यामुळे आता शिक्षण मंडळ सदस्यांसमवेत पालिका आयुक्तांच्या कार्यालयात उपोषण करण्याचा इशारा शिक्षण मंडळ अध्यक्ष सुरेश गडा यांनी दिला आहे.
शिक्षण मंडळात जातपडताळणीशिवाय अनेक मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली असून, त्याची चौकशी करण्याबाबत आपण स्वत: तक्रार केली.

‘इंद्रायणी’च्या पासधारकांचे खासदार परांजपेंना साकडे
ठाणे/ प्रतिनिधी: अव्वाच्या सव्वा किंमत मोजून फर्स्ट क्लासचे पास खरेदी करायचे, पण बसायला जागा कधीच मिळत नाही. ही व्यथा आहे इंद्रायणीतून दररोज प्रवास करणारे विद्यार्थी, नोकरदार आणि व्यावसायिकांची. मुंबई, ठाणे, कल्याण, कर्जत, लोणावळा येथून पुण्यापर्यंत दररोज उभ्याने प्रवास करणाऱ्या या त्रस्त प्रवाशांनी आज कल्याणचे खासदार आनंद परांजपे यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली.

बायांनो, दु:खाने गर्भगळित होऊ नका - सिंधुताई सपकाळ
ठाणे/प्रतिनिधी

बायांनो दु:ख आहे म्हणून गर्भगळित होऊ नका आणि काळजातील चंद्रभागा आटू देऊ नका, देशाला तुमची गरज आहे. कारण बायांचा जन्म सोसण्यासाठी आणि देशाची गरिबी झाकण्यासाठी असतो, असा मौलिक सल्ला ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांनी येथे दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दशकपूर्तीनिमित्त प्रदेश राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे येथील जय भगवान हॉलमध्ये एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

बेकायदेशीर वाहतुकीला अभय; पोलिसांच्या विरोधात आंदोलन
वाडा/वार्ताहर

बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करणाऱ्या निम्म्याहून अधिक जीप, मिनीडोअर वाहनांच्या चालकांकडे गाडी चालविण्याचा परवाना (लायसन्स) नसल्याने या वाहनांमुळे मोठय़ा प्रमाणात अपघात घडत आहेत. बेकायदेशीर वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याऐवजी स्थानिक पोलीस त्यांना पाठीशी घालतात. याचा निषेध म्हणून पोलिसांच्या विरोधात वाडा तालुका पूर्व विभागातील नागरिकांनी बुधवारी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

पावसाला रोखण्यासाठी कल्याणच्या सेंट्रल केबिनवर ताडपत्रीचे आवरण
कल्याण/प्रतिनिधी

रेल्वेच्या अनेक प्रकल्पांसाठी कोटय़वधी रुपये खर्च केले जात असताना, कल्याणमधील मध्य रेल्वेच्या सेंट्रल केबिनवर मात्र पावसाळ्यात छपरातून पाणी गळू नये, म्हणून चक्क ताडपत्री टाकण्यात आली असून याविषयी कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.सेंट्रल केबिनमधून लोकल, लांब पल्ल्याच्या आणि मालगाडय़ा यांच्या चलनवलनाची क्रिया पार पाडली जाते. अतिशय जागरूकपणे हे काम कर्मचाऱ्यांना करावे लागते. कंट्रोल पॅनेलच्या यंत्रणेवरून कर्मचारी गाडय़ांच्या ये-जा करण्याची प्रक्रिया पार पाडत असतात. मात्र सेंट्रल केबिन गेले अनेक वर्षांपासून नादुरुस्त होऊनही तिच्या दुरुस्तीसाठी कोणत्याही प्रकारचा खर्च केला जात नाही. केबिनचे छप्पर पूर्णपणे गळके झाले आहे. त्यामुळे पावसाळ्यात कर्मचाऱ्यांना पाणी डोक्यावर घेत गाडय़ांचेही चलनवलन पार पाडावे लागते. या महत्त्वाच्या विषयाकडे रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त सुंदर स्वाक्षरी स्पर्धा
बदलापूर/वार्ताहर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अंबरनाथ येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मनसेचे अंबरनाथ विधानसभा क्षेत्र अध्यक्ष कुणाल भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी चौकामध्ये सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या सुंदर स्वाक्षरी स्पर्धेचे उद्घाटन प्रा. अरुण मैड, प्रा. रेखा मैड आणि ज्येष्ठ शिक्षिका पूर्वा अष्टपुत्रे यांच्या उपस्थितीत झाले. या मराठी स्वाक्षरी मोहिमेला चांगला प्रतिसाद लाभला. तत्पूर्वी येथील शिवमंदिरात महाअभिषेक, छाया रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप, जावसई येथे पक्षाच्या नामफलकाचे उद्घाटन आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. डॉ. समाधान राजपूत, प्रशांत भोईर, प्रफुल्ल सूर्यराव, मिलिंद जोशी, मीना भोईर आदी कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.