Leading International Marathi News Daily

मंगळवार, १६ जून २००९

व्यक्तिवेध

इंडियन प्रीमियर लीगमध्ये इंग्लंडचा केव्हिन पीटरसन व अ‍ॅण्ड्रय़ू फ्लिंटॉफ यांना आपल्या फ्रँचायझीकडून खेळण्यासाठी प्रत्येकी साडेसात कोटी रुपयांची बोली लागली, त्या वेळी क्रिकेटविश्व आश्चर्यचकित झाले. परंतु काही दिवसांपूर्वीच इंग्लंडमधील मँचेस्टर युनायटेडकडून खेळणाऱ्या चोवीस वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो याला विकत घेण्यासाठी स्पेनच्या रियल माद्रिदने तब्बल ६१९ कोटी रुपये देऊ केले, तेव्हा संपूर्ण क्रीडाविश्व स्तंभित झाले. आतापर्यंतचा सर्वात महागडा फुटबॉलपटू होण्याचा मान रोनाल्डोने प्रश्नप्त केला असून सर्वाधिक उत्पन्न मिळवणारा क्रीडापटूदेखील ठरला आहे. ‘आयपीएल’मधील सर्वच्या सर्व १५०

 

क्रिकेटपटूंना मिळून ६३ कोटी रुपयांची बोली लावण्यात आली होती. यावरूनच रोनाल्डोच्या ‘युरोभरारी’ची उंची लक्षात येते. जगातील बडय़ा क्लबमध्ये स्पेनमधील रियल माद्रिदचा समावेश करण्यात येतो. यापूर्वी फ्रान्सच्या झिनादिन झिदानला सुमारे ४०० कोटी रुपयांना त्यांनी विकत घेतले होते. रोनाल्डोच्या कराराची बोलणी करण्यापूर्वी काही दिवस अगोदरच इटलीमधील एसी मिलानकडून खेळणाऱ्या काका या ब्राझीलच्या फुटबॉलपटूला ४२० कोटी रुपयांना (सुमारे ६२ दशलक्ष युरो) आपल्या क्लबमध्ये आणले होते. त्यानंतर रोनाल्डोसाठी विक्रमी ८० दशलक्ष युरो (१३ कोटी डॉलर) एवढी रक्कम क्लबचे अध्यक्ष फ्लॉरेन्टिनो पेरेझ यांनी मोजली आहे. गेल्या वर्षीचा सवरेत्कृष्ट फुटबॉलपटू म्हणून जागतिक महासंघाने रोनाल्डोची निवड केली होती. त्याचप्रमाणे इंग्लिश प्रीमियर लीग, एफ ए कप, विश्वक्लब स्पर्धेचे विजेतेपद आणि प्रतिष्ठित चॅम्पियन्स लीग स्पर्धेचे उपविजेतेपद त्याने मँचेस्टर युनायटेडला मिळवून दिले आहे. यंदाच्या हंगामामध्ये सर्वाधिक २६ गोलचा धडाका लावून त्याने अव्वल खेळाडू म्हणून कर्तबगारी सिद्ध केली. मूळच्या पोर्तुगालमधील रोनाल्डोच्या कारकिर्दीला अकाली पूर्णविराम मिळण्याचा धोका होता. त्याच्या हृदयामध्ये दोष असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्याचे पालनपोषण करणाऱ्या स्पोर्टिग सीपी या क्लबने तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठीचा सर्व आर्थिक खर्च पेलला आणि एखादा चमत्कार झाल्याप्रमाणे रोनाल्डोने पुन्हा फुटबॉलला किक मारली! २००३ साली मँचेस्टर युनायटेडचे प्रशिक्षक सर अ‍ॅलेक्स फग्र्युसन यांनी हेरले आणि १३ दशलक्ष पौंड मोजून इंग्लंडमध्ये आणले. चेंडूवरील विस्मयकारक नियंत्रणाचे कौशल्य बाळगणाऱ्या रोनाल्डोने मैदानाच्या सर्व भागात आपला करिष्मा दाखविला आहे. हेडिंगने गोल करण्यापासून ते एकाच वेळी पाच-सहा बचावपटूंना चकवून गोल करण्यात रोनाल्डोचा पाय कुणी धरू शकणार नाही! २००४ सालापासून फुटबॉलविश्वावर रोनाल्डोचे जणू साम्राज्य आहे. मैदानावरील कौशल्याच्या जोरावर रोनाल्डोने आपल्याला मिळणारे पुरस्कार सार्थ ठरविले. मँचेस्टर युनायटेडला सलग तीन हंगाम साखळी स्पर्धेचे विजेतेपद मिळवून दिले. राष्ट्रीय संघाकडून खेळताना रोनाल्डोच्याच खेळाच्या जोरावर पोर्तुगालने युरो स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. २००६ सालच्या विश्वचषक स्पर्धेत पोर्तुगालने उपान्त्य फेरीत प्रवेश केला. फ्रान्सचे आव्हान त्यांना पार करता आले नाही आणि त्यांना तिसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले. त्या वेळी स्पर्धेतील सवरेत्कृष्ट खेळाडू म्हणून रोनाल्डोचीच निवड निश्चित होती. परंतु, उपान्त्यपूर्व सामन्यात इंग्लंडविरुद्ध वेन रूनी याच्याशी झालेली बाचाबाची रोडाल्डोला महागात पडली. इंग्लिश फुटबॉलशौकिनांनी इंटरनेटवरून चालविलेल्या नकारात्मक मोहिमेमुळे रोनाल्डो त्या बहुमानापासून वंचित राहिला. अभिनेत्री बिपाशा बसू हिच्यासमवेत केलेल्या नृत्यानंतर रोनाल्डोची भारतामधील लोकप्रियता आणखीनच वाढली! जगभर मंदीचे वारे असले, तरी फुटबॉलविश्वात चांगलीच तेजी आहे. फुटबॉलपटूंच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारामध्ये तब्बल ३५ टक्क्य़ांची वाढ झाली आहे. परंतु, लक्षावधी डॉलरची कमाई केली, तरी मैदानावरील परिश्रमांना पर्याय नाही, याची पूर्ण जाणीव या व्यावसायिक फुटबॉलपटूंना असते. त्यामुळेच जगभरचे अब्जावधी चाहते या फुटबॉलताऱ्यांचा खेळ पाहण्यासाठी कोणतीही किंमत मोजण्यास तयार असतात.