Leading International Marathi News Daily

मंगळवार, १६ जून २००९

ग्रामीण भागात कामांची संख्या कमी
अमरावती विभागात रोजगार हमी योजनेचा बोजवारा
मोहन अटाळकर
अमरावती, १५ जून

मेळघाटातील आदिवासींसह ग्रामीण भागातील मजुरांच्या स्थलांतराचा प्रश्न सातत्याने चर्चेत असताना ग्रामीण भागात रोजगार हमी योजनेच्या कामांची संख्या घटल्याचे दिसून आले आहे.
मेळघाटातील धारणी आणि चिखलदरा तालुक्यात सध्या जलसंधारण, कृषी, रस्ते, वनीकरण आणि इतर विभागांची १८७ कामेच सुरू आहेत. साडे चार हजार एवढी मजूर क्षमता असताना फक्त ३ हजार ४०० आदिवासी मजूर उपलब्ध होऊ शकले.


१३ गावातील महिला सरपंचांचा लढा उभारण्याचा निर्धार
चंद्रपूर, १५ जून/प्रतिनिधी

जिल्हय़ातील सिंदेवाही तालुक्यातील १३ महिला संरपंचांनी एकत्र येऊन महिलांसाठी लढा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. हा अभिनव उपक्रम राबवताना महिलांना कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण देण्यासोबतच कायदा व इतर गोष्टींचे मोफत प्रशिक्षणसुद्धा देण्यात येणार आहे. या महिलांनी चिमूर व ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याचा निर्धार केला आहे.

चंद्रपुरात २५ जूनला बचत गट महिला मेळावा
चंद्रपूर , १५ जून/प्रतिनिधी

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, महिला राजसत्ता आंदोलन आणि महाराष्ट्र महिला परिषदेच्यावतीने येत्या २५ जूनला बचत गट महिला मेळावा आयोजित करण्यात आला आहे. प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहात सकाळी ११ वाजता हा मेळावा होणार आहे. या मेळाव्याचे उद्घाटन आदिवासी विकास, वने व जलसंपदा राज्यमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून उपाध्यक्ष संजय तोटावार, मानद सचिव विलास धांडे व संचालक उपस्थित राहणार आहेत.

राज्यातील देखरेख सहकारी संघ बरखास्त होणार
गटसचिवांना सेवेची आणि वेतनाची हमी
यवतमाळ, १५ जून / वार्ताहर
राज्यातील जिल्हा देखरेख सहकारी संघ आणि तालुका देखरेख सहकारी संघ बरखास्त करण्याचा शासनाने निर्णय घेतला असला तरी या संघांमध्ये आणि सहकारी पतसंस्थेमधील गटसचिवांच्या सेवा कायम राहून त्यांना ‘संरक्षण’ दिल्या जाणार आहे, अशी माहिती सहकारी पतसंस्थांच्या गटसचिवांच्या संघटनेचे नेते एल.डी. घोटेकर यांनी येथे दिली.

एम.एड.च्या ३५ विद्यार्थ्यांची लाखो रुपयांनी फसवणूक
चार जणांना अटक
अमरावती, १५ जून / प्रतिनिधी

येथील बॅ. रामराव आदिक एज्युकेशन ट्रस्ट संस्थेच्या माध्यमातून एम.एड.ची परीक्षा देणाऱ्या अमरावती जिल्ह्य़ातील ३५ विद्यार्थ्यांची लाखो रुपयानी फसवणूक करण्यात आल्याचे प्रकरण उजेडात आले असून आता या विद्यार्थ्यांनी येथील पोलीस आयुक्तांकडे धाव घेतली आहे. या विद्यार्थ्यांना ग्वाल्हेर येथील जिवाजी विद्यापीठातून एम.एड.ची पदवी मिळवून देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते पण, ही संस्था या विद्यापीठाशी संलग्नित नसल्याचे परीक्षार्थ्यांच्या लक्षात आले. या प्रकरणी ग्वाल्हेर पोलिसांनी येथील चार जणांना अटकही केली आहे.

विनोद अढाऊ यांना मंजुनाथ षण्मुगम एकात्मता पुरस्कार प्रदान
अंजनगावसुर्जी, १५ जून / वार्ताहर

शासकीय सेवेशी इमान राखून शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी संघर्ष करणाऱ्या येथील तलाठी विनोद वामनराव अढाऊ यांना या वर्षीचा ‘मंजुनाथ षण्मुगम एकात्मता पुरस्कार’ मिळाला आहे. इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंटच्या वतीने ‘स्वर्गीय मंजुनाथ षण्मुगम यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ’ भष्ट्राचाराविरुद्ध लढणाऱ्या देशभरातील तिघांना हा अत्यंत महत्त्वाचा पुरस्कार देण्यात येतो. विदर्भातील विनोद अढाऊ यांना मिळालेल्या या पुरस्काराने पुरोगामी महाराष्ट्राच्या शिरपेचात सन्मानाचा आणखी एक तुरा रोवला आहे.

खाजगी विहिरीतील पाण्याचा नागरिकांना पुरवठा
शिवसैनिकांचा उपक्रम
पुसद, १५ जून / वार्ताहर

तालुक्यातील वरूड येथील दुष्काळग्रस्त ग्रामस्थांना महिनाभर पाणी पुरवठा करून शिवसैनिकांनी समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. पुसद-नागपूर मुख्य रस्त्यावरील या गावात तीव्र टंचाईत प्रशासनाने पिण्याच्या पाण्याची कोणतीही उपाययोजना केली नाही. पुस धरणाच्या ओलित क्षेत्रातील गावांमध्ये डाव्या कालव्याला पाणी न सोडल्यामुळे दहा गावातील विहिरी आटल्या, कोरडय़ा झाल्या. जर या कालव्याला पाणी सोडले असते, तर कदाचित हा दुष्काळ पडला नसता.

पंतप्रधान ‘पॅकेज’ अंतर्गत बियाणे वाटप
दर्यापूर, १५ जून / वार्ताहर

पंतप्रधान विदर्भ पॅकेज अंतर्गत शेतकऱ्यांना बियाणे वाटपाचा शुभारंभ कृषी अधिकारी अरविंद मोरे यांच्या हस्ते करण्यात आला. खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष मधुकर तराळ, कृषी अधिकारी राजकुमार अडगोकार व विस्तार अधिकारी ए.बी. राठोड यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी अरविंद मोरे यांनी सांगितले की, पंतप्रधान विदर्भ पॅकेजचा आतापर्यंत लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांचा प्राधान्याने विचार करून बियाणे परमिटचे वाटप करण्यात येणार आहे. बियाणे वाटपामध्ये शेतकऱ्यांना अनुदानावर सोयाबीनची फक्त एक बॅग, तूर, कपाशी, मूग, उडीद इत्यादी बियाण्यांचे वाटप करण्यात येणार आहे.सर्वच अल्प भूधारक शेतकऱ्यांना पेरणीस आवश्यक बियाण्यांचे पन्नास टक्के अनुदानावर वाटप व्हावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. लाभार्थी शेतकऱ्यांनी बियाण्यांचे परमिट घेतले; परंतु बियाणे मिळाले किंवा उचलले नाही. त्यामुळे ते या अनुदान लाभापासून वंचित राहिले. त्याचप्रमाणे बनवलेल्या यादीमध्ये संपूर्ण लाभ घेतलेल्यांची नावे समाविष्ट असल्याची तक्रार आहे. सर्व अल्प भूधारकांना व दोन हेक्टपर्यंत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना आवश्यक बियाणे अनुदानावर उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी आहे.

अंजनगावसुर्जी नागरी बँकेच्या अध्यक्षपदी बळीराम धर्मे
अंजनगावसुर्जी, १५ जून / वार्ताहर
अंजनगावसुर्जी नागरी सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी बळीराम धुर्वे तर उपाध्यक्षपदी महादेव पेठेकर यांची बिनविरोध निवड झाली. नगरसेवक धर्मे यांच्या निवडीमुळे या बँकेवर प्रथमच शिवसेनेचा भगवा फडकला आहे. ओमप्रकाश अडगोकर यांनी बळीराम धर्मे यांचे नाव अध्यक्षपदासाठी सुचवले त्यास हरीश बहिरे यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदासाठी मंजूषा लोळे यांनी महादेव पेठेकर यांचे नाव सुचवले त्यास प्रल्हाद आवंडकर यांनी अनुमोदन दिले. इतर कुणाच्याही नावाचा प्रस्ताव न आल्यामुळे निवडणूक अधिकारी सहाय्यक निबंधक ज्ञानदीप लोणारे यांनी बळीराम धर्मे व महादेव पेठेकर यांची अध्यक्ष व उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी फटाक्याची आतषबाजी करून आनंद व्यक्त केला. सभेस बँकेचे मावळते अध्यक्ष कुंदन झाडेसह शरद बलंगे, परमेश्वर श्रीवास्तव, अरुण जुमळे व रजनी वऱ्हेकर हे संचालक अनुपस्थित होते.


नागपूर-नागभीड रेल्वे ब्रॉडगेजची मागणी
भंडारा, १५ जून / वार्ताहर

नागपूर-पवनी-नागभीड रेल्वे लाईन ब्रॉडगेज करण्याची मागणी पवनी शहर युवक काँग्रेसने केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
नागपूर-पवनी-नागभीड नॅरोगेज रेल्वे स्वातंत्र्य पूर्व काळापासून चालू आहे. मागील सात वर्षांपूर्वी गोंदिया-नागभीड-चंद्रपूर ही नॅरोगेज रेल्वे लाईन ब्रॉडगेज करण्यात आली परंतु, त्याआधीपासून सुरू असलेल्या नागपूर-नागभीड रेल्वे मार्ग ब्रॉडगेज झाली नाही आता तर पवनी रेल्वे स्थानकातील गाडीचा थांबा देखील काढून घेण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना आर्थिक भरुदड सहन करावा लागत आहे. पवनी रोडपासून आठ किमी अंतरावरील गोसे धरण पाहणाऱ्या पर्यटकांची गर्दी पावसाळ्यानंतर वाढणार असून पर्यटकांना या रेल्वेलाईनचा लाभ होऊ शकतो. तालुक्यातील व्यापार उद्योगाच्या वाढीच्या दृष्टिकोनातून नागपूर-नागभीड रेल्वे लाईन ब्रॉडगेज करून पवनी रोड येथे पूर्ववत थांबा सुरू करावा, पवनी-उमरेड-बुटीबोरी आणि पवनी-नागभीड-गोंदिया अशा नवीन गाडय़ा सुरू करण्याची मागणी पवनी शहर युवक काँग्रेसने प्रफुल्ल पटेल यांना केली आहे.

आर्णी क्रीडा संकुलाचे काम रखडले
आर्णी, १५ जून / वार्ताहर

येथील क्रीडा संकुलाचे काम पूर्ववत सुरू करण्याची मागणी समता क्लबने केली आहे. एनएसयुआय कार्यकर्त्यांनी तहसीलदारांना निवेदन सादर करून हे काम त्वरित सुरू करण्याची मागणी केली आहे. समता क्लबच्या वतीने जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यापूर्वी १५ फेब्रुवारीपासून या क्रीडा संकुलाचे काम सुरू झाले मात्र, काही दिवसातच ते बंद झाले. त्यामुळे विद्यार्थी व युवक वर्गात असंतोष पसरला आहे. समता क्लबच्या वतीने वेळोवेळी या क्रीडा संकुलाबाबत पाठपुरावा करण्यात आला. मात्र, शासनाकडून कार्य सुरू झालेले नाही. एन.एस.यु.आय.च्या वतीने एक निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले व क्रीडा संकुलाचे काम त्वरित सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. क्रीडा संकुलाचे काम सुरू करण्यात आले नाही तर आंदोलन छेडण्याचा इशारा तालुका एन.एस.यु.आय.चे अध्यक्ष आकाश जाधव, आकाश राठोड, दिग्विजय मुंडवाईक, विशाल भवरे, गौरव इंगळे यांनी दिला आहे.

उंद्री ते किन्ही नाईक रस्ता बांधकामास मंजुरी
बुलढाणा, १५ जून / प्रतिनिधी
शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार जयंत पाटील व अ‍ॅड.दत्ता भुतेकर यांची उंद्री ते किन्ही नाईक रस्ता मंजूर करण्यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्यासोबत नुकतीच चर्चा केली. त्यावर या रस्ता मंजुरीचे आदेश मंत्र्यांनी सर्व संबंधितांना दिले आहेत.
आमदार जयंत पाटील व अ‍ॅड. दत्ता भुतेकर यांनी नुकतीच भुजबळ यांच्यासोबत विधान भवनात उंद्री ते किन्ही नाईक १० किमी. चा रस्ता मंजूर करण्याबाबत सविस्तर चर्चा केली.त्यानुसार रस्ता मंजूर करण्यात आला.

वर्धेच्या नगराध्यक्षपदी मनोरमा शाहू बिनविरोध
वर्धा, १५ जून / प्रतिनिधी
वर्धा नगरपालिकेच्या अध्यक्षपदी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस युतीच्या मनोरमा शाहू तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे शब्बीर तुरक यांची बिनविरोध निवड झाली. उद्या, मंगळवारी या दोन्ही पदांसाठी मतदान होणार होते. मात्र, प्रतिस्पर्धी उमेदवारांनी आपले अर्ज परत घेतल्याने अध्यक्ष-उपाध्यक्ष पदावर शाहू व तुरक हे बिनविरोध निवडल्या गेले. या सर्व घडामोडी खासदार दत्ता मेघे व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रा. सुरेश देशमुख यांच्या समन्वयातून अखेरच्या क्षणी घडल्या. मेघे यांच्याशी जुळलेला नगरसेवक प्रदीप ठाकूर यांच्या गटाला अध्यक्षपद देण्याचे निश्चित झाल्यावर या गटाच्या अपक्ष शाहूंना संधी मिळाली. सर्व सूत्रधार काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस नेते असतानाही शक्तीप्रदर्शनामुळे अपक्ष नगरसेवकास प्रथमच वर्धेत नगराध्यक्षपद लाभले आहे.

पुलगाव पालिकेत अध्यक्ष-उपाध्यक्ष बिनविरोध
पुलगाव, १५ जून / वार्ताहर

नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतील २ उमेदवारांनी त्यांचे अर्ज मागे घेतल्याने अध्यक्षपदी राष्ट्रीय काँग्रेसच्या शालवंती दाबोडे तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मीना पनिया यांची बिनविरोध निवड झाली. निवडणुकीच्या एक दिवस आधीच अध्यक्षपदाच्या उमेदवार स्मिता चव्हाण व राष्ट्रीय काँग्रेसचे उपाध्यक्ष पदाचे उमेदवार भगवान ठाकूर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने अध्यक्षपदी शालवंती दाबोडे व उपाध्यक्षपदी मीना पनिया यांची बिनविरोध निवड झाली.

सिंदीच्या नगराध्यक्षपदी प्रकाशचंद्र डफ बिनविरोध
सिंदी रेल्वे, १५ जून / वार्ताहर

नगरपालिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माजी उपाध्यक्ष शोभा राऊत यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने सिंदी नगराध्यक्षपदावर अपक्ष नगरसेवक प्रकाशचंद्र डफ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदासाठी मात्र १६ जूनला मतदान होणार असून अपक्ष नगरसेवक घनश्याम मेंढे आणि उपाध्यक्ष विलास जांबूतकर यांच्यात लढत होणार आहे. सिंदी नगरपालिकेच्या ३० वर्षांंच्या इतिहासात नगराध्यक्षपदी अविरोध होण्याचा बहुमान अपक्ष नगरसेवक प्रकाशचंद्र डफ यांना मिळाला आहे.१७ सदस्यीय सिंदी नगरपालिकेत राष्ट्रवादीचे चार, काँग्रेसचे तीन, भाजपचे तीन तर सात अपक्ष सदस्य आहेत. प्रकाशचंद्र डफ यांना १३ नगरसेवकांचा पाठिंबा मिळाल्याने शेवटी शोभा राऊत यांना माघार घ्यावी लागली. सिंदी नगराध्यक्षपदावर प्रकाशचंद्र डफ यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल काँग्रेसचे नगरसेवक अशोक कलोडे, राष्ट्रवादीचे दत्ताभाऊ कलोडे, भाजपचे ओमप्रकाश राठी, सुधाकर खेडकर, अरुण बोंगाडे, प्रवासी मंडळाचे जनक पालीवाल व पत्रकार संघाचे विनायक झिलपे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

आर्वी निवडणुकीस स्थगिती
आर्वी, १५ जून / वार्ताहर

आर्वी नगरपालिकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीस नगरपालिकेच्या विभागीय संचालिका अंजू सिन्हा यांनी स्थगनादेश दिल्याने या निवडणुकीवर प्रश्नचिन्ह लागले आहे.
पालिकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाची १६ मे रोजी होणाऱ्या निवडणुकीकरिता काँग्रेसतर्फे अध्यक्ष-पदाकरिता नागोराव लोडे तर उपाध्यक्ष पदाकरिता कांचन लोहे यांनी तर भाजप व मित्रपक्षांतर्फे अध्यक्ष पदांकरिता विजय बाजपेयी व उपाध्यक्षकरिता जाबीर बेग यांनी उमेदवारी दाखल केली आहे. काँग्रेस उमेदवार नागोराव लोडे व कांचन लोहे यांच्या अर्जावर भाजपतर्फे आक्षेप घेण्यात आला. नागोराव लोडे यांच्या नावे पालिकेच्या मालकीचे दुकान आहे तर कांचन लोहे यांच्या पतीच्या नावे पालिकेच्या मालकीचे दुकान आहे. सदर आक्षेप नगरपालिकेच्या विभागीय संचालिका अंजू सिन्हा यांच्याकडे दाखल करण्यात आला. त्यावरून सिन्हा यांनी १९ जूनपर्यंत प्रतिवादीस विचारणी केल्याची नोटीस दिल्याने त्यानंतरच अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीची तारीख ठरणार आहे. २३ सदस्य संख्या असलेल्या आर्वी पालिकेत काँग्रेस १२, भाजप ५, राकाँ २ व अपक्ष ४ असे संख्या बळ असल्याने काँग्रेसचे पारडे जड आहे.

संजय हाडे यांचा मनसेत प्रवेश
बुलढाणा, १५ जून / प्रतिनिधी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रभावित होऊन धामणगाव बढे येथील सामाजिक कार्यकर्ते संजय हाडे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह खामगाव येथे प्रवेश केला. हाडे यांच्या समवेत दिवाकर पाटील, मंगेश देशमुख, रमेश वाघ, विजय खडके, सदाशिव पाटील, किरण चातारे, दीपक वैराळकर, मुकींदा नेमाने, भास्कर मोरे, गणेश पवार, निना बाकळे, सुनील जाधव, मंगेश पोलाखरे, सचिन पल्टनकर, अमित मुळे, निखील चाफेकर, सागर शिंदे, बलसागर तायडे, सादीक शेख, अनिल मारे, प्रदीप सपकाळ, भास्कर खिल्लारे, राम खिल्लारे, गजानन मिसाळ, शिवाजी खिल्लारे, राजू पवार, तेजराम कासाद, विजय कदम, मोहन देशमुख, नीलेश थोरात, दिनकर कासोदे, उमेश वाघ, प्रमोद जैन, रवींद्र कदम, सीताराम ठाकूर यांनीही मनसेत प्रवेश घेतला.यावेळी विठ्ठल लोखंडकार, प्रकाश सानप, जिल्हाध्यक्ष मदनराज गायकवाड, अशोक पाटील, देवेंद्र खोत, श्रीकृष्ण सोनुने, प्रा. प्रदीप पाटील, राजेश परिहार, गणेश बरबडे, राज देशमुख, श्रीकृष्ण सपकाळ, बाबा काळे, अमर राजपुत, बाळू पाटील उपस्थित होते.

धारणीत आनंदराव अडसूळ यांचा सत्कार
धारणी, १५ जून / वार्ताहर

मेळघाटातील पर्वतपट्टय़ात लोकसभा निवडणुकीत मताधिक्य कमी मिळाले असले तरी मेळघाटातील आदिवासींचा विकास करूच, असा निर्धार खासदार आनंदराव अडसूळ यांनी धारणी येथे केला. समाज मंदिरात शिवसेना मेळाव्यात ते बोलत होते. याप्रसंगी माजी खासदार अनंत गुढे, सुधीर सूर्यवंशी, दिगांबर डाहाके, सुनील साळवी उपस्थित होते. यावेळी अडसूळ यांचा सत्कार करण्यात आला. कुपोषण मिटविण्यासाठी मेळघाटात आलेल्या सामाजिक संस्था आदिवासींचा निधी लाटण्याशिवाय दुसरे कोणतेही कार्य करीत नाही, असा आरोप करून त्यांचे कार्य तपासून पाहण्याची गरज असल्याचेही अडसूळ म्हणाले. चिचघाट रामाखेडा प्रकल्प तापी नदीवर प्रस्तावित आहे. या प्रकल्पात जाणाऱ्या महाराष्ट्रातील ४२ गावांचे प्रथम पुनर्वसन व त्यानंतरच प्रकल्प, अशी आपली भूमिका असल्याचे ते म्हणाले. व्याघ्र प्रकल्पाच्या जायकअटीमुळे या भागाचा विकास खुंटलेला आहे. त्यांचे प्रलंबित असलेले प्रश्न सोडवून आदिवासींना न्याय मिळवून देणार असल्याचे अडसूळ म्हणाले. या वेळी श्रीराम मालवीय, दयाराम सोनी, अशोक मालवीय, दिनेश धनेवार, जयदेव मालविय आदी उपस्थित होते.

आदिवासी विकास प्रकल्पातर्फे दुधाळ जनावरांचे वाटप
खामगाव, १५ जून / वार्ताहर
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत १०० टक्के अनुदानावर दुधाळ जनावरे वाटपाचा कार्यक्रम आदिवासी वसतिगृहात नुकताच झाला.खामगाव तालुक्यातील १३ लाभार्थीना गाई, ७ लाभार्थी म्हशी व शेळी गट ४ अशा २४ लाभार्थ्यांची निवड यासाठी करण्यात आली होती. हा कार्यक्रम वर्षांनंतर येथे राबवण्यात आला. वाटपातील दुधाळ जनावरांमधील १ गाय किंमत १८ हजार रुपये, १ म्हैस २० हजार रुपये व ११ शेळ्याचा गट किंमत २८ हजार रुपये प्रमाणे किंमत आहे. या वाटपात ठेकेदाराद्वारे आणलेली काही जनावरे शासनाने ठरवलेल्या किंमतीपेक्षा कमी किंमतीची होती, असा आरोप लाभार्थ्यांनी केला. त्यामुळे काही लाभार्थ्यांनी वाटपातील जनावरे घेतली नाहीत. याबाबत अकोला येथील प्रकल्प अधिकारी व्ही.बी. गिरी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी ज्या लाभार्थ्यांना आपल्या पसंतीची जनावरे मिळाली नाहीत. त्यांना इतर तालुक्यात किंवा जिल्ह्य़ात होणाऱ्या वाटपाच्या वेळी दुधाळ जनावरे देण्यात येईल व याबद्दल लाभार्थ्यांना सुचित केले जाईल, असे त्यांनी सांगितले.

पिंप्राळा शिवारात ‘ढाब्या’वर दरोडा
खामगाव, १५ जून / वार्ताहर
राष्ट्रीय महामार्गावरील पिंप्राळा शिवारात चड्डी बनियानधारी टोळीने दरोडा टाकला. ट्रकचालकासह प्रताप ढाबाचे मालकाला लाठय़ा-काठय़ा व चाकूने मारहाण करून जखमी केले, त्यांच्याजवळून रोख ३२ हजार आणि मोबाईल असा एकूण ४२ हजाराचा ऐवज लुटून नेला आहे. राष्ट्रीय महामार्गावरील खामगाव अकोला दरम्यान असलेल्या पिंप्राळा शिवारातील प्रताप ढाब्यावर रात्री काही ट्रक उभे होते. दरम्यान २० ते २५ वयोगटातील चड्डी बनियानधारी ८ ते १० जणांच्या टोळीने हातात लाठय़ा, काठय़ा व चाकू घेऊन ढाब्यावर हल्ला चढवला. यावेळी या ढाब्यावरील रमेश भारद्वाज, अकलेश भारद्वाज, तेजराव मोरे, संजय हागे यांना मारहाण करून जखमी केले, नंतर आपला मोर्चा उभ्या असलेल्या ट्रकवर वळविला. चालक गुड्डू, दीपक शिंदे, हरीश यादव, बाबर शेख गुलाम यांनाही मारहाण केली. या सर्वाजवळून रोख ३२ हजार ४०० रुपये नोकीया कंपनीचे ५ मोबाईल किंमत १० हजार ५०० रुपये असा एकूण ४२ हजार ९०० रुपयांचा ऐवज लुटला.

जिल्ह्य़ात ३७ गावात मच्छरदाण्यांचे वाटप
भंडारा, १५ जून / वार्ताहर
जिल्ह्य़ात हिवतापासाठी अतिसंवेदनशील असलेल्या ३७ गावातील अनुसूचित जातीच्या कुटुंबांना १२ हजार ७०० मच्छरदाण्यांचे वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्य़ात विशेष घटक योजनेच्या अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत २००७-०८ या वर्षांच्या प्राप्त निधीमधून खरेदी केलेल्या ८ हजार ५०० मच्छरदाण्या व पॉलिस्टर (सिंगल) ४ हजार २०० मच्छरदाण्यांचे वाटप करण्यात आले आहे.डोडमाझरी, इंजेवाडा, दैतमांगली, सेलोरी, मुर्झा, मेंढा, तावशी, कुडेगाव, मडेघाट, जांभळी, गुठरी, उमरझरी, चांदोरी, आमगाव (बु.), परसटोला आतेगाव, एकोडी, घानोड, उकारा, मालूटोला, चिचाळ, गोसे (बु.) अडय़ाळ कोदुर्ली, लोभी, आष्टी, र्मुी, लोहारा, सोहरणा, आंबागड, पिटेसूर, देवनारा, चिखली, लेंडेझरी, आलेसूर, वरठी, पाचगाव या गावातील अनुसूचित जातीमधील कुटुंबाना मच्छरदाण्यांचे वाटप करण्यात आले. कुटुंबांनी मच्छरदाण्यांचा वापर करून हिवताप कीटकजन्य आजारापासून बचाव करावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा हिवताप अधिकारी यांनी केले आहे.

साखळी चोराविरुद्ध अखेर गुन्हा दाखल
पुसद, १५ जून / वार्ताहर
येथील पोलीस ठाण्याजवळील मुखरे चौकात फरजाना बी रजाक यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी चोरल्याच्या आरोपावरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या चोरी बाबत पुसद पोलिसांकडे तक्रार केल्या नंतरही पोलिसांनी आरोपीविरोधात हुन्हा दाखल करम्यास टाळाटाळ केली . त्या मुळे फरजाना बी रजाक यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे घेतली .त्या नंतरच गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी प्रथम या प्रकरणी कारवाई करण्यास टाळाटाळ केली परंतु, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर विष प्राशन करून आत्मदहन करण्याचा इशारा फरजाना बी यांनी दिल्यामुळे अखेर आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बेल्यातील विद्युत ग्राहकांचा रोष
बेला, १५ जून / वार्ताहर

वीज वितरण कार्यालयात चार लाईनमनची पदे रिक्त असल्याने मनुष्यबळा अभावी देखभाल, दुरुस्तीचे काम खोळंबले आहे. खंडित वीज प्रवाह सुरू करण्यासाठी विलंब लागत असल्याने ग्राहकांमध्ये रोष व्यक्त होत आहे. शेडेश्वर, बेल्यासह चार ठिकाणी लाईनमन नाही. कर्मचाऱ्यांची येथे कमतरता आहे. गेल्या १२ महिन्यांपासून रिक्त पदे भरण्यात आलेली नाही. बेला येथील अंदाजे ३०० घरगुती मीटर जुनाट झाल्याने ते बदलवून नवीन मीटर लावणे गरजेचे झाले असताना नवीन मीटरचा येथे पुरवठा अद्याप करण्यात आला नाही. रिक्त पदावर नियुक्ती करून त्वरित लाईनमन पाठवण्यात यावे, अन्यथा आंदोलनाचा मार्ग अवलंबण्याचा इशारा यशवंतराव चव्हाण सोशल फोरमचे तालुका अध्यक्ष उत्तम पराते, गजानन लांडे, दिनेश गोळघाटे,पुष्कर डांगरे आदींनी दिला आहे.

जनश्री विमा योजना कार्यालयाचे उद्घाटन
बुलढाणा, १५ जून / प्रतिनिधी
सुंदरखेड जनकल्याण बहुउद्देशीय ग्रामीण विकास सेवाभावी संस्थेमार्फत राबवण्यात येणाऱ्या जनश्री विमा योजना कार्यालयाचे उद्घाटन शाखा व्यवस्थापक पांडे यांच्याहस्ते करण्यात आले.
भारतीय आयुर्विमा महामंडळातर्फे असंघटित कामगारांसाठी जनश्री विमा योजना राबवण्यात येते. ही योजना १८ ते ५९ वर्षे वयोगटातील दारिद्रय़रेषेखालील व्यक्ती व दारिद्रय़रेषेच्या किंचित वर असलेल्या व्यक्तीसाठी आहे. संस्थेचे अध्यक्ष सूर्यकांत हिवाळे यांनी प्रास्ताविक करून प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाला सचिव प्रकाश जाधव, विमल हिवाळे, रंजना हिवाळे, विमा प्रतिनिधी अलका जाधव, माया गवई, सविता दाभाडे, नलिनी खरात उपस्थित होते.

दागिने उजळून देण्याच्या नावावर फसवणूक करणारे दोघे अटकेत
रिसोड, १५ जून / वार्ताहर
चांदीचे दागिने उजळून देण्याची बतावणी करून चांदी चोरणाऱ्या दोन तरुणांना रिसोड पोलिसांनी पकडले आहे. आरोपीच्या अटकेमुळे सोन्या चांदीचे दागिने उजळवून देणाऱ्या टोळींचा छडा लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पळसखेडा येथील लक्ष्मी शिंदे (६०) यांच्याकडे हे दोन युवक गेले. त्यांनी तुमच्या चांदीच्या पाटल्या चकाकून देतो, असे सांगून त्यांनी त्यांच्या हातातील २५ तोळे वजनाच्या पाटल्या घेतल्या व त्या चकाकून दिल्या पण, पाटल्यांच्या वजनाबाबत संशय आल्याने त्यांनी त्या मोजून पाहिल्या तर त्यामध्ये आठ तोळे चांदी कमी भरली दोन्ही आरोपींनी महिलेला दोन हजार रुपयांनी फसविले. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणेदार परशुराम राठोड यांनी लक्ष्मी यांच्या फिर्यादीवरून मनोहर जयप्रकाश साह व कुणाल अरविंद साह यांना मुद्देमालासह अटक केली.

कोंढा कोसरात एकाच रात्री पाच चोऱ्या
भंडारा, १५ जून / वार्ताहर

कोंढा कोसरा येथे चोरटय़ांनी एकाच दिवशी ५ ठिकाणी चोरी करून अंदाजे एक लाख रुपयांचे सोने व रोख असा ऐवज लंपास केला. कोसरा शिक्षक कॉलनीतील विठ्ठल काशीराम हुकरे यांच्या घरून ५० ग्रॅम सोने व रोख ५ हजार ५०० रुपये चोरांनी लंपास केले. या घटनेची तक्रार अडय़ाळ पोलीस ठाण्यात करण्यात आली.

अंगावर झाड पडून मजुराचा मृत्यू
भंडारा, १५ जून / वार्ताहर

वनविकास महामंडळाच्या कामावरील मजुराच्या अंगावर झाड पडून त्याचा मृत्यू झाल्याची घटना लाखांदूर येथे नुकतीच घडली. लाखांदूर तालुक्यातील पिंपळगाव कोहळी येथील अंतराम फकीरा परशुरामकर (४७) हे मागील एक महिन्यापासून वनविकास महामंडळाच्या माध्यमातून जंगलात वाळलेल्या झाडाची कटाई करण्याच्या कामावर होते. अर्जुनी मोरगाव वनपरिक्षेत्रात वाळलेली झाडे तोडीत असताना झाड पडल्याने त्यांचा मृत्यू जाला. अंतराम परशुरामकर यांच्या मागे पत्नी २ मुली व १ मुलगा असा मोठा परिवार आहे.