Leading International Marathi News Daily

मंगळवार, १६ जून २००९

विविध

राज्यात स्वबळावर लढण्यासाठी राष्ट्रवादीही ‘कामाला’ लागणार
नवी दिल्ली, १५ जून/खास प्रतिनिधी

महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेसशी युती करण्याचा सर्वसंमतीने निर्णय घेतानाच प्रसंगी स्वबळावर लढण्याची तयारी ठेवून तात्काळ ‘कामाला’ लागण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने ठरविले आहे. आज सायंकाळी दिल्लीत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत लोकसभा निवडणुकांतील विजयानंतर आक्रमक झालेल्या काँग्रेसला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी ही रणनिती निश्चित करण्यात आली.

ऑस्ट्रेलियात आणखी एका भारतीय विद्यार्थ्यांवर हल्ला
मेलबर्न, १५ जून/पीटीआय

दिल्लीचा मुळ रहिवासी असलेला व ऑस्ट्रेलियातील डंकन विद्यापीठामध्ये शिकणाऱ्या सनी बजाज या वीस वर्षे वयाच्या विद्यार्थ्यांवर गेल्या शुक्रवारी रात्री मेलबोर्नच्या पूर्व उपनगरामध्ये दोन व्यक्तींनी हल्ला चढविला तसेच वर्णव्देषी शेरेबाजीही केली. या मारहाणीत सुनीलचे बोट फ्रॅक्चर झाले असून त्याच्या नाकालाही दुखापत झाली आहे. गेल्या महिनाभरात ऑस्ट्रेलियामध्ये भारतीयांवर हल्ले होण्याची ही चौदावी घटना आहे.

पेट्रोल, डिझेल दरवाढीचा पर्यायही उपलब्ध - मुरली देवरा
नवी दिल्ली, १५ जून/पीटीआय

आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढणाऱ्या तेलाच्या किंमतीबाबत चिंता व्यक्त करून पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा म्हणाले की, महसुलातील तूट भरून काढण्यासाठी केंद्र सरकार अनेक उपायांचा विचार करीत आहे. देशामध्ये पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीचा पर्यायही सरकारसमोर उपलब्ध आहे.
केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्याशी आज नवी दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मुरली देवरा म्हणाले की, क्रुड तेलाच्या वाढत्या किंमतींबाबत सरकारला तीव्र चिंता वाटत आहे.

‘मंदीच्या तावडीतून जगाची मुक्तता करण्यासाठी भारत ठोस भूमिका बजावेल’
नवी दिल्ली, १५ जून/पीटीआय

पंतप्रधान मनमोहनसिंग आज तीन दिवसांच्या रशियाच्या दौऱ्यावर रवाना झाले. पंतप्रधानपदी फेरनिवड झाल्यानंतर मनमोहनसिंग करीत असलेला हा पहिलाच विदेश दौरा आहे. आर्थिक मंदीच्या तावडीतून मुक्तता होण्यासाठी जागतिक पातळीवर सुरू असलेल्या प्रयत्नांमध्ये भारत ठोस भूमिका बजावेल असे मनमोहनसिंग यांनी सांगितले. या दौऱ्यादरम्यान मनमोहनसिंग हे पाकिस्तानचे अध्यक्ष असीफ अली झरदारी यांची भेट घेऊन चर्चा करतील. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर या दोन्ही नेत्यांची प्रथमच भेट होणार आहे.

अमेरिकेतील विमान अपघातात भारतीय वंशाचे तीन ठार
न्यूयॉर्क,१५ जून/पीटीआय

अमेरिकेतील मोहॉक नदीमध्ये एक छोटय़ा आकाराचे विमान कोसळून झालेल्या अपघातात भारतीय वंशाचे तीनजण ठार झाले. त्यामध्ये ११ वर्षाच्या एका मुलाचा समावेश आहे. हे विमान खाजगी मालकीचे होते. मुळ केरळचे रहिवासी असलेले जॉर्ज कोलाथ हे अमेरिकेत स्थायिक झाले असून तेथील अल्बनी येथे हॉटेल व्यवसाय करतात. ते स्वत:च्या मालकीच्या एका छोटय़ा आकाराच्या विमानातून आपला मुलगा व डॉक्टर मित्रासह उड्डाणाचा आनंद घेण्यासाठी आकाशात झेपावले होते. मोहॉक व्हॅली विमानतळावरून गेल्या रविवारी दुपारी पायपर चेरोकी जातीचे हे विमान उड्डाण केल्यानंतर काही वेळातच नदीत कोसळले. या अपघातात जॉर्ज कोलाथ, त्यांचा ११ वर्षाचा मुलगा व कोलाथ यांचा डॉक्टर मित्र असे भारतीय वंशाचे तीनजण ठार झाले.

‘भाजप’ची सद्यस्थिती अत्यंत स्फोटक - सुषमा स्वराज
भोपाळ , १५ जून / पीटीआय

भारतीय जनता पक्षाची अंतर्गत स्थिती सध्या अत्यंत ‘स्फोटक ’ असून, त्याबद्दल आणखी जास्त बोलणे उचित ठरणार नाही असे भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांनी म्हटले आहे
.सुषमा स्वराज विदिशा या त्यांच्या संसदीय मतदारसंघात चार दिवसांच्या भेटीवर आल्या असून काल,रविवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, माझ्या पक्षातील अंतर्गत स्थिती सध्या फारच स्फोटक बनली आहे. एखादी छोटीशी ठिणगीही मोठा भडका उडवू शकते. लोकसभेच्या निवडणुका राष्ट्रीय लोकशाही आघाडीने जिंकल्या असत्या तर लालकृष्ण अडवाणी पंतप्रधान झाले असते. म्हणूनच लोकसभेत अडवाणी हेच विरोधी पक्षनेते राहिले तर त्यात काय गैर आहे? अडवाणी यांचे विरोधी पक्षनेतेपद मिळविण्यात अखेर आपण यशस्वी झालो असे म्हणणे मात्र चूक आहे असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. निवडणुकांच्या वेळी मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि झारखंड या तीन राज्यांच्या भाजपच्या निवडणूक प्रमुख म्हणून आपली भूमिका आता संपुष्टात आली असून, आता आपण विदिशा लोकसभा मतदारसंघाच्या केवळ खासदार आहोत. मध्य प्रदेशात भारतीय जनता पक्षाच्या कारभारात ढवळाढवळ करण्याचा आपला कधीच हेतू नव्हता हे आपण यापूर्वीच स्पष्ट केले आहे असेही सुषमा स्वराज यांनी म्हटले आहे.