Leading International Marathi News Daily

बुधवार, १७ जून २००९

गांधी ऑफ इंडियन थिएटर!
छत्तीसगढी बोली तसेच तिथली ‘नाचा’ लोककलाशैली आणि छत्तीसगढमधल्याच आदिवासी, अशिक्षित व अनघड लोककलावंतांना घेऊन गेली ६० हून अधिक वर्षे रंगकार्य करणारे नाटककार, दिग्दर्शक, निर्माते, गीतकार, संगीतकार, अभिनेते, चित्रपटकार अशा चतुरस्र व्यक्तिमत्त्वाच्या हबीब तन्वीर यांचे अलीकडेच निधन झाले. त्यांना अभिवादन करण्यासाठी लोकवाङ्मयगृह, आविष्कार नाटय़संस्था आणि मुंबई विद्यापीठाचा अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स विभाग यांनी एका सभेचे आयोजन केले होते. त्याचा हा वृत्तान्त..

ड.. डार्विनचा..
भारताने विज्ञान शिक्षणाकडे लक्ष केंद्रित करावे असा सल्ला गेली अनेक वर्षे देशातीलच नव्हे तर जगभरातील तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे. नोबेल पारितोषिक विजेते सिडने अल्टमन यांनीदेखील मागील आठवडय़ात वॉशिंग्टन येथे पार पडलेल्या वैज्ञानिक परिषदेमध्ये भारतीय वैज्ञानिकांशी बोलताना ‘भारताने विज्ञान शिक्षणाकडे गांर्भीयाने बघणे गरजेचे आहे’ असा टोला मारला. त्याचबरोबर उच्चशिक्षण आणि संशोधन समितीचे अध्यक्ष प्राध्यापक यशपाल यांनीदेखील देशातील तमाम विद्यापीठांनी आता तरी जागे व्हावे, असा सल्ला दिला. ते पुढे म्हणाले की, ‘एआयसीटीइ’ने तांत्रिक शिक्षणाचा दर्जा वाढविण्याकडे लक्ष पुरविले पाहिजे. तसेच विज्ञान विद्यापीठांनी शिक्षणासाठी भरीव योगदान देणे गरजेचे आहे. ११ व्या पंचवार्षिक योजनेत विद्यमान सरकारने विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भरीव गुंतवणूक केली आहे. पण केवळ गुंतवणूक पुरेशी नसून या क्षेत्रातील शिक्षणाचा दर्जा सुधारणे गरजेचे आहे. म्हणजे वर्षांनुवष्रे परंपरागत सुरू असलेल्या शिक्षण पद्धतीचा पुनर्विचार करणे गरजेचे आहे, अशी मागणी सर्व स्तरांवरून जोर धरू लागली आहे. याची सुरुवात शाळांपासून झाली पाहिजे.
शालेय जीवनात बहुतांशी विद्यार्थ्यांना विज्ञान आणि गणित या विषयांबद्दल प्रचंड उदासीनता असते. याचे एक मूळ शाळेतील शिकविण्याची पद्धतीमध्ये आहे. जर आपल्याला विज्ञानक्षेत्रात भरीव कामगिरीची अपेक्षा असेल तर आपल्याला केवळ गुंतवणुकीवर अवलंबून न राहता या क्षेत्रात मुळापासून बदल करणे आवश्यक आहे. कालानुरुप यामध्ये बदल घडत आहेत. पण त्याचे परिणामकारक रुप अद्याप समोर आलेले नाही. यासाठी शाळेत विज्ञानाच्या पुस्तकातील महत्त्वाची प्रकरणे कशाप्रकारे शिकविली जातात, विद्यार्थ्यांचा त्या प्रकरणांकडे पाहण्याचा दृष्टीकोन कसा आहे? याचा अभ्यास करुन ती कशाप्रकारे शिकविली पाहिजेत याची रुपरेषा आखणे गरजेचे आहे.
वैज्ञानिक अभ्यासक्रमांसदर्भातील विविध संशोधन, विविध स्तरांवर सुरू आहे. असेच एक संशोधन होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रातील व्हिजिटिंग फेलो डॉ. अभिजीत बर्दापूरकर यांनी केले आहे. विद्यार्थी वैज्ञानिक सिद्धांत कशाप्रकारे समजावून घेतात यावर त्यांनी आपल्या संशोधनात प्रकाशझोत टाकला आहे. त्यांनी सजीवांची उत्क्रांती होत असताना घडणाऱ्या नैसर्गिक बदलांसंदर्भातील सिद्धांत विद्यार्थी कशाप्रकारे समजावून घेतो, आणि ते सिद्धांत त्यांना कशाप्रकारे शिकविले पाहिजेत यावर संशोधन केले आहे.
एकपेशीय सूक्ष्मजीवांपासून उगम होऊन आज जगात दिसणारी वैविध्यपूर्ण सजीवसृष्टी कशी निर्माण झाली हे विषद करणारे तत्त्व म्हणजे उत्क्रांती. एकाच जातीतील सजीवांची जनुके निसर्गत:च एकसारखी नसतात. एकाच जातीतील विविध जनुकांपैकी काही जनुकांतील आनुवंशिक गुणधर्म त्यांच्या पैर्यावरणाशी अनुरुप असतात. ही अनुरुपता त्या जनुकांपासून तयार होणाऱ्या सजीवांना तारण्यासाठी आणि प्रजननासाठी उपयुक्त ठरते. त्यामुळे त्यांच्या संख्येत वाढ होत जाते. या प्रक्रियेतूनच अनुरुप गुणधर्म असणारी नवीन प्रजाती उदयाला येते. या सर्व प्रक्रियांना डार्विनने ‘नैसर्गिक निवड’ असे म्हटले आहे. यावरुन ‘नैसर्गिक निवड’ हा उत्क्रांतीचा पाया आहे, असे चार्लस् रॉबर्ट डार्विन यांनी दाखवून दिले. हा डार्विनचा सिद्धांत ‘नैसर्गिक निवड’ या निकषावर लक्ष केंद्रीत करून शिकविला गेला पाहिजे, असे डॉ. बर्दापूरकर यांचे म्हणणे आहे.
डार्विनचा सिद्धांत ‘नैसर्गिक निवड’ (natural selection) या निकषावर समजून घेण्याऐवजी ‘नैसर्गिक रुपांतरणा’वर (natural transformation) समजून घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल असल्याचे डॉ. बर्दापूरकर यांच्या निदर्शनास आले. उत्क्रांती होत असताना घडणाऱ्या नैसर्गिक बदलांचा अभ्यास विद्यार्थ्यांना कसा समजला हे जाणून घेण्यासाठी डॉ. बर्दापूरकर यांनी सातवी, नववी ते द्वितीय वर्ष बीएससीपर्यंतच्या विद्यार्थ्यांंना हा सिद्धांत कसा समजला हे जाणून घेतले. यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांना समजलेल्या डार्विनच्या सिद्धांताची, मूळ सिद्धांतांशी तुलना केली आणि यातून आढळलेल्या निरीक्षणावरुन त्यांनी आपल्या नोंदी केल्या. विद्यार्थ्यांनी ‘नैसर्गिक निवड’ म्हणजे काय? ती कशा प्रकारे होते? याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. शिवाय विद्यार्थ्यांनी ‘नैसर्गिक रुपांतरण’ आणि ‘नैसर्गिक निवड’ तसेच ‘निसर्ग निवड’ (nature's selection) आणि ‘नैसर्गिक निवड’ (natural selection) याची गल्लत करू नये, असे डॉ. बर्दापूरकर यांनी आपल्या संशोधनात नमूद केले आहे.
या नोंदींचा फायदा येत्या काळात डार्विनचा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत शिकविण्यासाठी केला गेल्यास त्यातील बारकावे विद्यार्थ्यांच्या लक्षात येतील व विद्यार्थ्यांना डार्विनचा सिद्धांत नेमका काय आहे, हे समजेलच, शिवाय त्यांना यासंदर्भात अधिक जाणून घेण्यास उत्सुकताही वाटेल. डॉ. बर्दापूरकर यांचेसारखे संशोधन अनेक शिक्षकांनी पुढे येऊन केल्यास विज्ञान शिक्षणाची व्याख्याच बदलेल. परिणामी मूलभूत विज्ञान करिअर म्हणून नाकारणाच्या विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर होईल आणि विद्यार्थी या क्षेत्राकडे वळतील. ही संख्या ज्या दिवशी वाढेल त्या दिवशी खऱ्या अर्थाने देशाची विज्ञानक्षेत्रात प्रगती होईल.
नीरज पंडित
nirajpandit@in.com

बाळू वासकर यांना मनोहर कदम पुरस्कार
चंद्रलेखा नाटय़संस्थेत सचोटीचा आदर्श घालून देणारे व्यवस्थापक कै. मनोहर कदम यांच्या १७ व्या स्मृतिदिनी त्यांच्या नावे देण्यात येणारे पुरस्कार या वर्षी दादरच्या शिवाजी मंदिर नाटय़गृहात सर्व रंगकर्मीना प्रेमाने कॅंटिनचा चहा पाजणाऱ्या नाटकवेडय़ा बाळू वासकर आणि गडकरी रंगायतनचे व्यवस्थापक राजदेरकर यांना प्रदान करण्यात आला. किरण शांताराम यांच्या हस्ते रोख रक्कम व पुष्पगुच्छ स्वरूपातील या पुरस्काराचे वितरण झाले. त्यांनी निर्माते मोहन वाघ यांच्या या उपक्रमाचे आणि चंद्रलेखा संस्थेचे तोंडभरून कौतुक केले. ( प्रतिनिधी )