Leading International Marathi News Daily

बुधवार, १७ जून २००९

शेट्टी, महाडिक व डावी आघाडी विधानसभेसाठी एकत्र- मंडलिक
कोल्हापूर, १६ जून / प्रतिनिधी

जिल्ह्य़ातील राजकीय झोटिंगशाही उखडून टाकण्यासाठी राजू शेट्टी, महादेवराव महाडिक तसेच डावी आघाडी येथून पुढच्या राजकारणात सक्रिय होणार असल्याचे आणि त्याची सुरुवात येत्या विधानसभा निवडणुकीपासून होणार असल्याचे खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटना तसेच शेतकरी कामगार पक्ष, जनता दल, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि महादेवराव महाडिक गट, राजू शेट्टी आणि माझ्या विजयासाठी एकत्र आले होते. येती विधानसभा निवडणूकही आम्ही अशाच पध्दतीने लढवणार आहोत.

कुपवाडमध्ये ११ लाखांची बोगस खते जप्त; मोठे रॅकेट?
सांगली, १६ जून / प्रतिनिधी

खरीप हंगामाच्या तोंडावर खताची कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांना बोगस खताचा पुरवठा करणाऱ्या कुपवाड औद्योगिक वसाहतीतील विजया इंडस्ट्रीज या कंपनीवर सांगली पोलिसांच्या विशेष पथकाने रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास छापा टाकून सुमारे ११ लाख रुपये किमतीच्या बनावट खतासह तीन ट्रक जप्त केले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. यातून मोठे रॅकेट उगढ होण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी व्यक्त केली.

नवी मुंबईतील गोळीबारप्रकरणी फरारी आरोपीला तासगावात अटक
सांगली, १६ जून / प्रतिनिधी

नवी मुंबई येथील शिवसेनेच्या उपशाखाप्रमुखेवर गोळीबार करून फरारी झालेल्या कमलेश दत्ता धनवडे (वय २५, रा. ऐरोली) याला स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने तासगाव येथे अटक केली. त्याच्याकडून एक आलिशान इनोव्हा गाडीही जप्त करण्यात आली आहे.
कमलेश धनवडे हा मूळचा तासगाव येथील असून तो काही वर्षापासून मुंबईत स्थायिक झाला आहे.

डॉ. मुळीक यांचे उपोषण स्थगित; प्रश्न उदयनराजेंच्या खांद्यावर
सातारा, १६ जून / प्रतिनिधी

सोमवारी १५ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपण सुरू केलेले बेमुदत उपोषण रक्तदाब, डायबेटिसमुळे प्रकृती बिघडून कोमात जायची पाळी येऊ नये या कारणास्तव स्थगित केले आहे. मात्र प्रश्न सोडलेला नाही. तो उदयनराजेंच्या खांद्यावर तो दिला असल्याचे कृषिरत्न डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी पत्रकार परिषदेत उदयनराजेंच्या उपस्थितीत सांगितले. खासदार उदयनराजे यांनी या वेळी सांगितले, की मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची बुधवारी (१७ जूनला) मुंबई येथे जाऊन आपण भेट घेणार आहोत.

चारशे वैद्यकीय अधिव्याख्यातांना मागील सेवेचे फायदे देण्याची मागणी
सोलापूर, १६ जून/प्रतिनिधी

राज्यातील विविध शासकीय वैद्यकीय रुग्णालयांमध्ये तात्पुरत्या स्वरुपात सेवारत असलेल्या ३९१ अधिव्याख्यातांना कायम करताना मागील सेवेचे सर्व फायदे न देण्याचा शासनाचा निर्णय अन्यायकारक असून, फसवणूक करणारा असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य वैद्यकीय अध्यापक संघटनेने व्यक्त केली आहे. मागील बरीच वर्षे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा न झाल्यामुळे शासकीय वैद्यकीय रुग्णालयांमध्ये कायमस्वरुपी वैद्यकीय अध्यापकांच्या नेमणुका होत नव्हत्या.

कायम विनाअनुदानित शाळांना शासनाचे चारशे कोटी अनुदान
सोलापूर, १६ जून/प्रतिनिधी

राज्यातील तीन हजार कायम विनाअनुदानित शाळांना राज्य शासनाकडून चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात चारशे कोटींचे अनुदान जाहीर झाल्याची माहिती राज्य माध्यमिक शाळा कृती समितीचे सचिव दत्तात्रेय सावंत यांनी दिली. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर कृती समितीच्या वतीने दहा हजार कायम विनाअनुदानित शाळांमधील शिक्षक व कर्मचाऱ्यांचा मोर्चा नेण्यात आला होता. त्यावेळी शासनाकडून विनाअनुदानित शाळांमधील ‘कायम’ हा शब्द काढून टाकण्याचे आश्वासन मिळाले होते. परंतु हे आश्वासन पाळले गेले नाही. त्यामुळे कृती समितीने चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुंबईत आझाद मैदानावर उपोषण सुरू केले होते. या प्रश्नावर शासनाने दखल घेऊन कायम विनाअनुदानित शाळांसाठी चारशे कोटींचे अनुदान जाहीर केले. त्याचा लाभ तीस हजार शिक्षक कर्मचाऱ्यांना होणार असल्याचे श्री. सावंत यांनी सांगितले. सोलापूर जिल्ह्य़ातील कायम विनाअनुदानित शाळा व चारशे अनुदानित शाळांमधील विनाअनुदानित तुकडय़ांवरील दोन हजार कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

वडगावात यादव-सालपे गट पुन्हा वेगळे; नगराध्यक्षपदाला दोन अर्ज
पेठवडगाव, १६ जून / वार्ताहर

सत्तारूढ गटाचे नेते विजयसिंह यादव यांच्याबरोबरीने युवक क्रांती आघाडीकडून अलका मनोहर बेलेकर यांचाही पेठवडगावच्या नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने पेठवडगावातील राजकारणाने पुन्हा एकदा वेगळे वळण घेतल्याचे स्पष्ट झाले. आमच्या प्रभागात विकासकामे होत नाहीत. आम्हाला विचारले जात नाही, विश्वासात घेतले जात नाही अशा कारणातून गेली दीड वर्षे असलेली यादव-सालपे आघाडी पूर्ववत वेगळी झाल्याचेही आज स्पष्ट झाले. नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष निवडीसाठी पेठवडगाव नगरपालिकेची खास सभा शनिवारी २० जून रोजी बोलावण्यात आली आहे. नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्याची आज शेवटची मुदत होती. आज सत्तारूढ गटाकडून नगराध्यक्षपदाचा रौप्यमहोत्सव साजरा केलेले ज्येष्ठ अभ्यासक विजयसिंह यादव यांनी अर्ज दाखल केला. तर यादव-सालपे आघाडीतून कालच बाहेर पडलेल्या युवक क्रांती आघाडीकडून अलका बेलेकर या मूळच्या भाजप कार्यकर्त्यांनी अर्ज दाखल केला.
या दोघांचेही अर्ज वैध ठरल्याचे निवडणुकीचे कामकाज पाहणारे राधानगरीचे उपविभागीय अधिकारी विवेक आगवने यांनी सांगितले. शुक्रवारी अर्ज माघारीची मुदत असून त्याकडे व शनिवारच्या सभेकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे.

चाकूच्या धाकाने तरुणीचे अपहरण करून बलात्कार
सोलापूर, १६ जून/प्रतिनिधी

दुपारच्या वेळी शौचासाठी घराबाहेर पडलेल्या एका तरुणीला चाकूचा धाक दाखवून जीपमधून परगावी पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी दोघाजणांविरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बार्शी तालुक्यातील वैराग येथे हा प्रकार घडला. कृष्णा नागनाथ पवार (रा. गुळपोळी, ता. बार्शी) यास पोलिसांनी अटक केली असून त्याचा साथीदार जीपचालक फरारी असून त्याचा शोध घेतला जात आहे. वैरागच्या संजय गांधी झोपडपट्टीत राहणारी सदर वीस वर्षाची तरुणी दुपारी शौचासाठी गेली असताना पाठीमागून आलेल्या कृष्णा पवार याने डाव्या हाताने तिचे तोंड दाबून गळ्यावर चाकू लावला. नंतर त्याने खुनाची धमकी देत तिला जवळच्या अंतरावर थांबलेल्या पांढऱ्या रंगाच्या जीपमध्ये घातले. त्याने सदर तरुणीला केशर जवळगा (ता. उमरगा, जि. उस्मानाबाद) येथे पाहुण्याच्या घरी नेऊन तिच्यावर बलात्कार केला, असे तिने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. अपघातात ठार पंढरपुरात पालखी मार्गावर वाखरी येथे भरधाव वेगातील सहा आसनी रिक्षा (एमएच ४२-बी ३२२४) झाडावर आदळून घडलेल्या अपघातात संतोष दशरथ जरड (वय ३२, रा. उंडेवाडी, ता. बारामती) हा प्रवासी जागीच मरण पावला.

पंढरपूरमध्ये शोरूम फोडून सुमारे साडेचार लाखांची चोरी
पंढरपूर, १६ जून/वार्ताहर

पंढरपूर शहरातील शहर पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर स्टेशनरोडवर असलेले वांगीकर इलेक्ट्रॉनिक शोरूम अज्ञात चोरटय़ांनी फोडून घडय़ाळे व रोख रक्कम असा ४ लाख ४० हजाराचा माल चोरून नेला. स्टेशन रोडवर वांगीकर यांचे इलेक्ट्रॉनिक शोरूम असून मालक सोमवारी रात्री दुकान बंद करून घरी गेले. त्यानंतर अज्ञात चोरटय़ांनी तळघरातील एक्झॉस्ट फॅनचे ग्रील तोडून दुकानात प्रवेश केला. चोरटय़ांनी प्रथम कपाट तोडले, पण त्यात त्यांना स्पेअर पार्ट दिसल्याने दुसऱ्या मजल्यावर प्रवेश करून तेथील शोकेसची कुलपे तोडून आत असलेली सुमारे ३ लाख रुपये किमतीची मनगटी घडय़ाळे व कपाट उचकटून त्यात असलेली ५७ हजार रोख रक्कम असा ४ लाख ४४ हजारचा माल चोरून नेला. चार दिवसांपूर्वी उपनगरात चोरटय़ांनी घरफोडय़ा करून सुमारे अडीच लाखांचा सोन्या-चांदीचा ऐवज चोरून नेला होता. आता तर चोरटय़ांनी भर वस्तीतील दुकान फोडले आहे. या घटनेनंतर पोलिसांचे श्वानपथक मागवण्यात आले. परंतु फारसा उपयोग झाला नाही. याबाबत राजेंद्र वांगीकर यांनी शहर पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.

गावित यांच्या पुतळ्याचे धनगर सेनेकडून दहन
आटपाडी, १६ जून / वार्ताहर

धनगर समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ सोमवारी आटपाडीच्या तहसील कार्यालयासमोर भारतीय धनगर सेनेने आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावित यांच्या पुतळ्याचे दहन केले. यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. देशातील काही राज्यात धनगर समाजाला आरक्षण देण्यात आले आहे; पण पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रात धनगर समाजाला आरक्षण दिले जात नसल्याचे सांगत भारतीय धनगर सेनेचे अध्यक्ष मारूतीराव केसकर यांनी खेद व्यक्त केला. तसेच राज्य मंत्रिमंडळातील सदस्य असलेल्या विजयकुमार गावित यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेधही केला. त्यानंतर विजयकुमार गावित यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी सेनेचे प्रदेश सरचिटणीस श्रावण वाक्षे, भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष अरूण पडळकर, जिल्हा संघटक संदीपान पुजारी, अ‍ॅड. सचिन सातपुते, बाळासो जेडगे, तानाजी खांडेकर, राजेंद्र हाक्के, बाजीराव बुधे, दत्तू वाक्षे, प्रल्हाद पाटील (करगणी) व विठ्ठल कारंडे (बालेवाडी) यांनी नायब तहसीलदार रेंदाळकर यांना निवेदन दिले.

ग्रामरोजगार सेवकांचा आज मोर्चा
कोल्हापूर, १६ जून / विशेष प्रतिनिधी

ग्रामरोजगार सेवकांच्या विविध मागण्यांसाठी जिल्ह्य़ातील ग्रामरोजगार सेवक संघटनेच्या वतीने बुधवारी (१७ जून) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे, असे राज्य नेते कॉ.सूर्याजी साळुंखे, कॉ. राजन क्षीरसागर (परभणी) अ‍ॅड. एस.एम. पाटील गडिहग्लज हे मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत असे सांगण्यात आले. ग्रामरोजगार सेवकांना मस्टर असिस्टंटचा दर्जा द्या, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगालच्या धर्तीवर नियमित ५ हजार रुपये वेतन द्यावे, नेमणूक पत्र द्यावे, राष्ट्रीय रोजगार हमी योजनेचे बजेट १०० टक्के खर्च करावे, ४ टक्के प्रशासकीय खर्चापैकी २ टक्के रक्कम सेवकावर खर्च करावी, टी.ए.डी.ए व मीटिंग भत्ता लागू करा, आय.सी.डी.एस.च्या धर्तीवर जिल्हा परिषद व ग्रामपंचायतीमध्ये स्वतंत्र कक्ष स्थापन करावा आदी मागण्यासंदर्भात हा मोर्चा आहे. १७ जून रोजी दुपारी १२ वाजता टाऊन हॉल येथून मोर्चास सुरुवात होणार आहे. महापालिका, बदू चौक व्हीनस कॉर्नर मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार आहे. मोर्चासाठी ग्रामरोजगार सेवकांनी हजर राहावे असे आवाहन जिल्हा संघटक आनंदा गुरव व अरविंद पाटील यांनी केले आहे.