Leading International Marathi News Daily

बुधवार, १७ जून २००९

(सविस्तर वृत्त)

शेट्टी, महाडिक व डावी आघाडी विधानसभेसाठी एकत्र- मंडलिक
कोल्हापूर, १६ जून / प्रतिनिधी

जिल्ह्य़ातील राजकीय झोटिंगशाही उखडून टाकण्यासाठी राजू शेट्टी, महादेवराव महाडिक तसेच डावी आघाडी येथून पुढच्या राजकारणात सक्रिय होणार असल्याचे आणि त्याची सुरुवात येत्या विधानसभा निवडणुकीपासून होणार असल्याचे खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी आज पत्रकार

 

परिषदेत स्पष्ट केले.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटना तसेच शेतकरी कामगार पक्ष, जनता दल, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि महादेवराव महाडिक गट, राजू शेट्टी आणि माझ्या विजयासाठी एकत्र आले होते. येती विधानसभा निवडणूकही आम्ही अशाच पध्दतीने लढवणार आहोत.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात माझ्या विजयासाठी आमदार महादेवराव महाडिक तसेच धनंजय ऊर्फ मुन्ना महाडिक यांनी सहकार्य केले होते.त्यातूनच मंडलिक-महाडिक-शेट्टी हे नवीन राजकीय समीकरण पुढे आले आहे.जिल्ह्य़ातील डावे पक्ष आणि आमची तिघाजणांची आघाडी येत्या विधानसभा निवडणुकीत सक्षम उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे.
जिल्ह्य़ाच्या राजकारणात एक प्रकारची झोटिंगशाही निर्माण झाली आहे. दहशतीचे वातावरण तयार झाले आहे. हे मोडून काढण्यासाठी विधानसभा निवडणुकीत सक्षम उमेदवार उभे करणार आहोत. हा सक्षम उमेदवार कोणत्या पक्षाचा आहे याचा विचार आम्ही करणार नाही. झोटिंगशाही उखडून टाकणे हेच आमचे ध्येय आहे असे खासदार मंडलिक यांनी यावेळी स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकीपासून आणि निवडणुकीनंतर जिल्ह्य़ाच्या राजकारणात मंडलिक-महाडिक-शेट्टी यांची विकासआघाडी सक्रिय होणार अशा आशयाच्या बातम्या ठळकपणे वेळोवेळी प्रसिध्द झाल्या होत्या. या बातम्यांचा इन्कारही संबंधितांकडून झालेला नव्हता. आज मात्र दस्तूरखुद्द खासदार सदाशिवराव मंडलिक यांनीच जिल्ह्य़ाच्या आगामी राजकारणात ही विकास आघाडी अस्तित्वात येणार असल्याची कबुली पत्रकार परिषदेत दिली. त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीत महाडिक गट पूर्ण ताकदीनिशी आपल्याबरोबरच होता याचीही कबुली त्यांनी देऊन टाकली.
या पत्रकार परिषदेला माजी महापौर मारुतराव कातवरे, नगरसेवक सुनील मोदी, माजी नगरसेवक सुहास लटोरे तसेच संजय स्वामी व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.