Leading International Marathi News Daily

बुधवार, १७ जून २००९

(सविस्तर वृत्त)

कुपवाडमध्ये ११ लाखांची बोगस खते जप्त; मोठे रॅकेट?
सांगली, १६ जून / प्रतिनिधी

खरीप हंगामाच्या तोंडावर खताची कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांना बोगस खताचा पुरवठा करणाऱ्या कुपवाड औद्योगिक वसाहतीतील विजया इंडस्ट्रीज या कंपनीवर सांगली पोलिसांच्या विशेष पथकाने रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास छापा टाकून सुमारे ११ लाख रुपये किमतीच्या बनावट खतासह तीन ट्रक जप्त केले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.

 

यातून मोठे रॅकेट उगढ होण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी व्यक्त केली.
विशेष पोलीस पथकाने अटक केलेल्यांत रामअवतार सिंग जगदीशप्रसाद अग्रवाल (वय ४८, रा. अर्चना बंगला, शिंदे मळा), ट्रकचालक वामन दामू गुधळे (वय २४, रा. संजयनगर), भगवान कृष्णा पाटोळे (वय ३६, रा. रामरहिम कॉलनी) व सुनील यादवराव भोजने (वय ३२, रा. इंदिरानगर झोपडपट्टी) यांचा समावेश आहे. पोलीस अधीक्षक कृष्णप्रकाश यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पोलीस पथकाने बनावट खते तयार करणाऱ्या टोळीचा छडा लावला.
कुपवाड औद्योगिक वसाहतीतील विजया इंडस्ट्रीज येथील गाळा क्रमांक ४० मध्ये शेतीसाठी वापरण्यात येणारे म्युरेट ऑफ पोटॅश हे खत आणून त्याचे पॅकिंग बदलून त्याचा औद्योगिक माती व आगकाडी बनविण्यासाठी काळय़ा बाजारात बनावट खताची विक्री केली जात असल्याची माहिती पोलीस अधीक्षक कृष्णप्रकाश यांना मिळाली होती. या माहितीआधारे विशेष पोलीस पथकाने पाळत ठेवून भेसळीचा हा प्रकार उघडकीस आणला.
रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास विशेष पोलीस पथकाने विजया इंडस्ट्रीजवर छापा टाकला. त्या वेळी भेसळ सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पिवळय़ा रंगाच्या ५० किलोच्या बॅगा व तितक्याच वजनाच्या पांढऱ्या रंगाच्या बॅगा पोलिसांना मिळून आल्या. तसेच ५० किलोच्या पिवळय़ा व पांढऱ्या रंगाच्या गोण्यांनी भरलेले तीन ट्रकही मिळून आले. यातील एका ट्रकमधील पांढऱ्या गोण्या भरल्या जात होत्या, तर दुसऱ्या दोन ट्रकमधील पिवळय़ा गोण्या खाली करून त्या गोडाऊनमध्ये ठेवल्या जात होत्या.
विशेष पोलीस पथकाने विजया इंडस्ट्रीजचे मालक रामअवतार सिंग अग्रवाल यांच्याकडे अधिक चौकशी करता शेतीसाठी उपयुक्त असणारे म्युरेट ऑफ पोटॅश हे फर्टिलायझर खत विकत आणून त्याचे पॅकिंग बदलून पांढऱ्या रंगाच्या इंडस्ट्रीयल सॉल्ट असे लिहिलेल्या गोण्यात भरून परत पॅकिंग करून त्याची काळय़ा बाजारात वाढीव किमतीने विक्री होत असल्याचे उघडकीस आले. इंडस्ट्रीयल सॉल्ट हे शेती वापरासाठी असणाऱ्या म्युरेट ऑफ पोटॅशपेक्षा खूप महाग आहे. त्याचा वापर औद्योगिक व कपडय़ांना रंगकाम तसेच आगकाडी तयार करण्यासाठी केला जातो.
पोलिसांनी या ठिकाणाहून (क्रमांक एमएच १०- ए २४०३), (क्रमांक एमएच ०९- ए ९८६४) व (क्रमांक एमएच १०- झेड ७२०) या तीन मालट्रकसह एक हजार ८०० पोती पोटॅश, दोन शिलाई मशिन, वजनकाटा व रिकाम्या गोण्या असा एकूण ११ लाख ६३ हजार ४७० रुपये किमतीचे साहित्य हस्तगत केले आहे. मूळ पॅकिंग असलेल्या या बॅगा इस्लामपूर, तर म्युरेट ऑफ पोटॅश असे लिहिलेल्या बॅगा भिवंडी येथून आणल्याचे या ट्रकचालकांनी सांगितले. या चौघांवर फर्टिलायझर कंट्रोल ऑर्डर (१९८५) तसेच जीवनावश्यक वस्तू कायदा कलम ३ (७) प्रमाणे कुपवाड औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर करीत आहेत.