Leading International Marathi News Daily

बुधवार, १७ जून २००९

(सविस्तर वृत्त)

नवी मुंबईतील गोळीबारप्रकरणी फरारी आरोपीला तासगावात अटक
सांगली, १६ जून / प्रतिनिधी

नवी मुंबई येथील शिवसेनेच्या उपशाखाप्रमुखेवर गोळीबार करून फरारी झालेल्या कमलेश दत्ता धनवडे (वय २५, रा. ऐरोली) याला स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने तासगाव येथे

 

अटक केली. त्याच्याकडून एक आलिशान इनोव्हा गाडीही जप्त करण्यात आली आहे.
कमलेश धनवडे हा मूळचा तासगाव येथील असून तो काही वर्षापासून मुंबईत स्थायिक झाला आहे. त्याचा सावकारीचा व्यवसाय असल्याचे समजते. यातूनच त्याने ऐरोली येथील शिवसेनेचे उपशाखाप्रमुख कृष्णा नायडू यांना पैसे दिले होते. या पैशाच्या देवघेवीतून या दोघांच्यात वाद निर्माण झाला होता. या वादातूनच रविवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास कृष्णा नायडू हे मित्रांसमवेत ज्ञानदीप विद्यालयाच्या मैदानात बसले असता कमलेश व त्याच्या साथीदारांनी त्यांच्यावर गोळीबार केला होता.
या गोळीबारात कृष्णा नायडू हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर कमलेश हा फरारी झाला होता. तो आपल्या तासगाव या मूळगावी आल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार निरीक्षक किसन गवळी, सहायक निरीक्षक विजय कुंभार व तासगावचे निरीक्षक अनिल देशमुख यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तासगाव शहरात सापळा रचला होता. रात्री उशिरा कमलेश हा शहरात आला असताना पोलिसांनी त्याला जेरबंद केले.
त्याच्याकडील (क्रमांक एमएच ४३- डी ४३३६) ही आलिशान इनोव्हा गाडीही जप्त केली आहे. कृष्णा नायडू याच्यावर पैशाच्या वादातूनच हल्ला केल्याची कबुलीही त्याने दिली आहे.