Leading International Marathi News Daily

बुधवार, १७ जून २००९

(सविस्तर वृत्त)

डॉ. मुळीक यांचे उपोषण स्थगित; प्रश्न उदयनराजेंच्या खांद्यावर
सातारा, १६ जून / प्रतिनिधी

सोमवारी १५ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपण सुरू केलेले बेमुदत उपोषण रक्तदाब, डायबेटिसमुळे प्रकृती बिघडून कोमात जायची पाळी येऊ नये या कारणास्तव स्थगित

 

केले आहे. मात्र प्रश्न सोडलेला नाही. तो उदयनराजेंच्या खांद्यावर तो दिला असल्याचे कृषिरत्न डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी पत्रकार परिषदेत उदयनराजेंच्या उपस्थितीत सांगितले.
खासदार उदयनराजे यांनी या वेळी सांगितले, की मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची बुधवारी (१७ जूनला) मुंबई येथे जाऊन आपण भेट घेणार आहोत. त्यांनी तातडीने पत्र पाठवून उपोषण थांबविण्याची विनंती केली आहे. तात्पुरती वेळ मारून नेण्यासाठी अशी पत्रे अनेक वेळा दिली जातात. त्यास फारशी अक्कल लागत नाही. पण आपण त्यांना खिंडीत गाठून प्रश्न सोडविण्यास भाग पाडू. त्यांनी शेतक ऱ्यांना ‘इर्मा’ योजना लागू केली केली तर ठीक अन्यथा सरकार कुणाचेही आले तरी त्यास मोठी किंमत मोजावी लागेल.
डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी भूमाता दिंडीच्या माध्यमातून मूलभूत मुद्दे मांडून भूमाता धक्का दिला आहे. राज्यकर्त्यांना लोकांचा धक्का बसू नये याची काळजी आता त्यांनी गांभीर्याने घेतली पाहिजे, अशी आपली कळकळीची विनंती आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत लोक धक्का देतील त्यास आपला हातभार असेल, असा इशारा त्यांनी या वेळी दिला.
केंद्रीय अर्थसंकल्पानंतर आपण राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्याशी त्यांच्या वेळेनुसार प्रदीर्घ चर्चा घडवून आणणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.
राज्यकर्त्यांनी डॉ. मुळीक यांनी उपस्थित केलेले मुद्दे जाणून घेतले पाहिजेत. त्यांनी याकडे लक्ष दिले नाही. प्रश्न सोडविण्यास वेळ दिला नाही तर लोक स्फोटक बनतील. १८५७ सारखी परिस्थिती निर्माण होईल, असा इशारा देऊन उदयनराजे म्हणाले, की अशा वेळी लोक समोर उदयनराजे आहेत का कोण हे बघत नाहीत.
मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी वेळ देण्याचे कबूल केले आहे. पण अशा चर्चेतून काहीही निष्पन्न होत नाही. याचे दु:ख व खेद वाटतो. कधीकधी रागही येतो, असे त्यांनी सांगितले. प्रगतीचा विचार स्वत:च्या कुटुंबाच्या पलिकडे जाऊन केला जात नाही.
आता विधानसभा निवडणुकीची निकड लक्षात घेता लोकांचे हित पाहणारे सुज्ञपणे तळमळीने बोलणाऱ्यांची परीक्षा लागणार आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारने आपण उपस्थित केलेले प्रश्न हाती घेतले तर सोन्याहून पिवळे नाही तर त्यांना मोठी किंमत मोजावी लागेल.
राष्ट्रवादीच्या युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. अतुल भोसले व सातारा जिल्हा विकास आघाडीतील यशवंतभाऊ भोसले या वेळी उपस्थित होते.
बुधाजीराव मुळीक यांनी बेमुदत उपोषण आंदोलन स्थगित केल्याचे सांगताना आत्मघाताने प्रश्न सुटणार नाही. रक्तदाब, डायबेटिसमुळे आपण उपोषण करू शकत नाही. आंदोलन जाहीर करण्याअगोदर हे आपल्याला हे माहीत नव्हते का? तर जरूर होते. विषय तीन-चार महिने सुरू झाला होता. प्रश्नावर जनजागरण झाले. माध्यमांनी सहकार्य केले. त्यांना धन्यवाद। आता उदयनराजेंच्या खांद्यावर सर्व दिले आहे. ते हा विषय पूर्ण करतील, असा विश्वास वाटतो, असे त्यांनी या वेळी सांगितले. डॉ. मुळीक यांना सोमवारी रात्री साडेनऊ वाजता उदयनराजेंनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले, तेव्हापासून बेमुदत उपोषण स्थगित करण्यात आले.