Leading International Marathi News Daily

बुधवार, १७ जून २००९

(सविस्तर वृत्त)

गटविकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयाला पदाधिकाऱ्यांनीच ठोकले टाळे
इचलकरंजी, १६ जून / वार्ताहर

अर्थपूर्ण व्यवहारातून पदाधिकाऱ्यांनी पंचायत समितीतील गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी

 

यांच्या कार्यालयास ठोकलेले टाळे दुसऱ्या दिवशीही तसेच होते. तथापि पदाधिकाऱ्यांना आक्रमक प्रत्युत्तर देताना कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांच्या सर्व खात्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मंगळवारी दिवसभर काम बंद आंदोलन केले. पंचायत समिती सदस्य व प्रशासनातील अनेक दिवस धुमसणारा वाद टोकाला पोहोचला असून पंचायत समितीची प्रतिमा काळवंडली आहे.
पंचायत समिती सदस्य व अधिकारी, कर्मचाऱ्यांतील वाद शिक्षकांच्या बदल्यातील अर्थपूर्ण व्यवहारावरून ऐरणीवर आला आहे. शिक्षकांना सांभाळण्यासाठी सदस्यांनी सोयीच्या ठिकाणी बदलीचा आग्रह चालवला होता. बदली करावयाच्या शिक्षकाची यादी हनुमंताच्या शेपटीप्रमाणे वाढत चालल्याने गटविकास अधिकारी नितीन माने व गटशिक्षणाधिकारी मोळे यांनी अडीच टक्के इतक्या नियमानुसार बदल्या करण्याचा निर्णय घेतला.
सभापती जयश्री कुरणे व उपसभापती सुचित्रा खवरे यांनी बदल्याची नस्ती मागवली. त्यात आपण सुचवलेली नावे नसल्याचे पाहून सभापती, उपसभापती व अन्य सदस्यांनी मोळे यांच्यावर आगपाखड केली. मोळे आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने बदल्या बेकायदेशीर असल्याचे सांगत सोमवारी सायंकाळी कुरणे, खवरे, धुळाप्पा पुजारी, संजय गाठ, साताप्पा भवान, मिलन खोबरे आदी सदस्यांनी गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयास टाळे ठोकले. पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी परस्परांवर अर्थपूर्ण व्यवहारातून बदल्या केल्याचा आरोप केला.
मंगळवारी या घटनेचे पडसाद प्रशासनाकडून उमटले. दोन्ही कार्यालयाचे टाळे कायम असल्याचे पाहून अधिकारी, कर्मचाऱ्यांतून तीव्र प्रतिक्रिया उमटली. नियमबाह्य़ काम करण्यास प्रवृत्त करणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या कामकाज पद्धतीवर असणारा कर्मचाऱ्यांचा राग उफाळून आला. नियोजन व विकास, कृषी, आरोग्य, शिक्षण ग्रामपंचायत, समाजकल्याण, लेखा, बांधकाम, महिला व बालकल्याण, पाणीपुरवठा आदी सर्व खात्यातील कर्मचारी अधिकाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले. दोनशेवर अधिकारी, कर्मचारी तसेच शिक्षक, ग्रामसेवकांनी पंचायत समितीसमोर घोषणाबाजी सुरू केली.