Leading International Marathi News Daily

बुधवार, १७ जून २००९

(सविस्तर वृत्त)

‘लक्ष्मी-विष्णू’ मिल कामगारांना देय रकमांवर दीड कोटी व्याज मिळणार
सोलापूर, १६ जून/प्रतिनिधी

पंधरा वर्षापूर्वी बंद पडलेल्या सोलापूरच्या लक्ष्मी-विष्णू कापड गिरणीच्या कामगारांना त्यांच्या देय रकमांवर एक कोटी ५० लाखांचे व्याज मिळणार असून त्याचे वाटप करण्याचा आदेश मुंबईच्या

 

डी.आर.टी. च्या वसुली अधिकाऱ्यांनी दिला आहे.
इंटकप्रणीत राष्ट्रीय गिरणी कामगार संघाने केलेल्या पाठपुराव्यानंतर दीड कोटींची व्याजाची रक्कम लक्ष्मी-विष्णू गिरणीच्या ४३७४ कामगारांना मिळणार आहे. यात प्रत्येक कामगारास किमान ५३४ ते १९ हजार ३४० रुपयांपर्यंत व्याजाची रक्कम मिळणार असून लाभार्थी कामगारांची यादी राष्ट्रीय गिरणी कामगार संघाच्या भैया चौकातील कार्यालयात सर्वाना पाहण्यासाठी लावण्यात आली आहे.
लक्ष्मी-विष्णू कापड गिरणीच्या कामगारांची २२ कोटी २१ लाखांची देय रक्कम १० जून २००५ रोजी बँकेत जमा झाली आहे. त्यावर आजपर्यंतच्या व्याजाच्या रकमेची वर्गवारी करून त्याप्रमाणे व्याज बेकार कामगारांच्या पदरात पडणार आहे. या संदर्भात राष्ट्रीय गिरणी कामगार संघाचे सरचिटणीस चंद्रकांत सुरवसे यांनी दिलेल्या माहितीनुसार २१ कोटी २१ लाखांच्या देय रकमांव्यतिरिक्त मुख्यमंत्री निधीतून यापूर्वी कामगारांनी घेतलेल्या २२०० रुपयांप्रमाणे एकूण एक कोटी १९ लाख, कामगारांनी बँकेकडून घेतलेले एक कोटी ९ लाखांचे कर्ज, कामगारांच्या क्रेडिट सोसायटीची रक्कम त्यांच्या देय रकमेतून वसूल न करता ती रक्कम कामगारांनाच मिळवून देण्यात राष्ट्रीय गिरणी कामगार संघाने पुढाकार घेतला आहे. अशाप्रकारे या गिरणीच्या कामगारांना २८ कोटींपर्यंतची रक्कम संघाने मिळवून दिली आहे. याशिवाय आता केंद्र सरकारच्या पुनर्वसन योजनेद्वारे सुमारे १२ कोटींचा लाभही या कामगारांना मिळवून देण्यासाठी संघ प्रयत्नशील असल्याचे श्री. सुरवसे यांनी सांगितले.