Leading International Marathi News Daily

बुधवार, १७ जून २००९

(सविस्तर वृत्त)

झाडे तोडून बांधकाम चालू केल्यावरून ५० हजारांचा दंड
सांगली, १६ जून / प्रतिनिधी

सांगली महापालिका क्षेत्रातील एका बिल्डरने झाडे तोडून बांधकाम सुरू केल्याप्रकरणी मंगळवारी स्थायी समिती सभेत जोरदार चर्चा झाली. या बिल्डरला ५० हजार रुपयांचा दंड करण्यात आला असून, त्याने अद्यापही हा दंड न भरल्याने त्याचे बांधकाम साहित्य जप्त करण्याबरोबरच शहरातील

 

सर्व बांधकामे रोखण्याचे आदेश सभापती हरिदास पाटील यांनी दिले.
स्थायी समितीच्या आजच्या सभेत बहुतांशी विषय हे अवलोकनार्थच होते. विरोधी काँग्रेस सदस्य हणमंत पवार यांनी राजवाडा परिसरातील भगिनी निवेदिता संस्थेसमोरील बाजूस एस. व्ही. कुलकर्णी या बिल्डरकडून बांधकामासाठी २६ झाडे तोडल्याचे निदर्शनास आणून दिले. या बिल्डरची शहरात अन्य सहा ते सात कामे सुरू असून त्या ठिकाणीही झाडे तोडल्याचे सांगितले. महापालिका प्रशासनाने वृक्षतोडप्रकरणी या बिल्डरला ५० हजार रुपयांचा दंडही केला होता. मात्र त्याने हा दंड अद्यापही भरलेला नाही. हा दंड भरण्यापूर्वी त्याला बांधकाम परवाना कसा देण्यात आला, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. त्यावर सभापती हरिदास पाटील यांनी दंडापोटी संबंधित बिल्डरचे बांधकाम साहित्य जप्त करण्याचे आदेश दिले. तसेच बांधकाम परवाना दिलेल्या अधिकाऱ्याची चौकशी केली जाईल, अशी ग्वाही दिली.
महापालिकेतील ठेके घेऊनही ठेकेदारांकडून वेळेवर कामाची पूर्तता केली जात नाही, याबाबत या सभेत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. तसेच ठेकेदार आडमुठे यांना काळय़ा यादीत समाविष्ट करण्याची नोटीसही बजावण्याचे आदेश दिले. या सभेत महापौर मैनुद्दीन बागवान यांच्यासाठी सात हजार ९००, तर उपमहापौर शेखर इनामदार यांच्यासाठी पाच हजार ६०० रुपयांचा नवीन मोबाईल संचही खरेदीस मान्यता देण्यात आली.