Leading International Marathi News Daily

बुधवार, १७ जून २००९

(सविस्तर वृत्त)

कोल्हापूरच्या प्रलंबित प्रश्नांसाठी विशेष प्रयत्न करणार - मंडलिक
कोल्हापूर, १६ जून / प्रतिनिधी

काळम्मावाडी धरणातून कोल्हापूर शहराला थेट पाईपलाईनने पाणीपुरवठा, कोल्हापूरला तीर्थक्षेत्राचा

 

दर्जा मिळवून देणे, पंचगंगा नदीला केंद्र शासनाच्या नद्या जलशुद्धीकरण योजनेत समाविष्ट करणे, विमानतळाचे विस्तारीकरण यासह गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले प्रश्न सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असून, या प्रश्नांच्या निर्गतीसाठी केंद्र व राज्य शासनाकडून सहकार्य मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही, असे खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर या मतदारसंघातील विकासाची कामे सोडविण्यासाठी कृतिबद्ध कार्यक्रमाच्या नियोजनास आपण सुरुवात केलेली आहे. विकासाची कामे तसेच अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण लवकरच मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे एक व्यापक शिष्टमंडळ नेणार आहोत. केंद्र शासनाशी निगडित ११ विषय आहेत. आपण केंद्रात स्थिर सरकार यावे, यासाठीच डॉ. मनमोहन सिंग यांना बाहेरून पाठिंबा दिला आहे. त्यामुळे केंद्र शासनाशी निगडित असलेले प्रश्न सोडविताना कोणतीही अडचण येणार नाही, असे
खासदार मंडलिक यांनी या वेळी स्पष्ट केले.
कोल्हापूरला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला तर शेकडो कोटी रुपयांचे अनुदान उपलब्ध होणार आहे. त्यातून विकासाची अनेक कामे होणार आहेत. हा दर्जा मिळावा यासाठी राज्य शासनाच्या अर्थसंकल्पात तरतूद करून घेऊन तो केंद्र शासनाकडे पाठवला जावा, यासाठी आपले विशेष प्रयत्न असतील. केंद्र शासनाचा लवकरच अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्या वेळी आपण कोकण रेल्वेला कोल्हापूर बायपास म्हणून जोडण्यात यावे, यासाठी रेल्वेच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली जावी, यासाठी मी आग्रह धरणार आहे.
कृष्णा, कावेरी, गोदावरी आणि गंगा या नद्या प्रदूषणमुक्त करण्यासाठी केंद्र शासनाची योजना सुरू आहे. या योजनेत पंचगंगा नदीचा समावेश व्हावा, ही आपली मागणी केंद्र शासनाने तत्त्वत: मान्य केलेली आहे. पंचगंगेच्या उगमापासून कृष्णेच्या संगमापर्यंत नदीचे पात्र प्रदूषणमुक्त होण्यासाठी सुमारे ६५० कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला असल्याचे खासदार मंडलिक यांनी या वेळी सांगितले.
काळम्मावाडी धरणाच्या गळतीचा प्रश्न गंभीर आहे. ही गळती शोधून काढण्यासाठी आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थेच्या वतीने त्याचे सर्वेक्षण व्हावे, अशी आपण केंद्र शासनाकडे मागणी केलेली असून, त्याचा पाठपुरावाही मी करणार आहे. कोल्हापूरचे अनेक प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत. विकासाचे प्रस्तावही रखडलेले आहेत. त्याचा आपण प्रश्नधान्याने पाठपुरावा करणार आहोत.
कोल्हापूर जिल्हय़ात विशेषत: करवीर तालुक्यात ४ हजार गुऱ्हाळघरे आहेत. मोठय़ा प्रमाणावर गुळाचे उत्पादन होते आहे. मात्र हा गूळ परदेशामध्ये निर्यात होत नाही. त्यासाठी गूळ निर्यात केंद्र कोल्हापुरात होण्यासाठी आपण लवकरच अ‍ॅपेडा या संस्थेची मदत घेऊन राज्यस्तरीय गूळ परिषद घेणार असल्याचेही खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी या वेळी सांगितले.