Leading International Marathi News Daily

बुधवार, १७ जून २००९

(सविस्तर वृत्त)

जनसेवा संघटनेच्या बैठकीकडे सर्वाचे लक्ष
माळशिरस, १६ जून/वार्ताहर

स. म. शंकरराव मोहिते पाटील यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने जानेवारीत झालेल्या जनसेवा संघटनेच्या बैठकीला अखेरच्या क्षणी वेगळे वळण लागून आयत्या वेळी संघटनेने आमदार

 

प्रतापसिंहांची उमेदवारी जाहीर केली होती. त्याच प्रतापसिंहांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने उद्या सोलापुरात होणाऱ्या जनसेवा संघटनेच्या बैठकीतही काही क्रांतिकारी निर्णय होणार का, या चर्चेला ऊत आला आहे.
जनसेवा संघटनेची स्थापना स्व. शंकरराव मोहिते पाटील यांनी १९७५ साली करून तालुक्यातील तरुणांना सामाजिक कार्यासाठी व्यासपीठ निर्माण करून दिले. त्याची स्थापनेपासूनची जबाबदारी आ. प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी घेऊन पुढे संघटनेचे कार्यक्षेत्र संपूर्ण सोलापूर जिल्हा व त्यानंतर राज्यभर केले. किल्लारी भूकंपग्रस्तांना मदतीचा हात देण्यापासून अनेक विविध विधायक कामांची भलीमोठी यादी तयार झाली. संघटनेने सहकार महर्षीच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने गेली २५ वर्षे अनेक राजकीय पुढाऱ्यांच्या उपस्थितीत लाखोंच्या संख्येचे शेतकरी मेळावे आयोजित करून व त्या ठिकाणी मागण्या करून शेतकऱ्यांच्या पाण्याचे, दूध दर विजेचे अनेक प्रश्न सोडविले आहेत व या प्रत्येक कामात पुढाकार घेणाऱ्या प्रतापसिंहांवर वेळोवेळी होणाऱ्या राजकीय अन्यायाची सल संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना बोचत होती.
अकरा फेब्रुवारीला होणाऱ्या सहकार महर्षीच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी म्हणून जमलेल्या बैठकीत संघटनेचे माजी अध्यक्ष रावसाहेब पराडे यांनी तसे बोलून दाखविले होते आणि तेथे जमलेल्या हजारो कार्यकर्त्यांनी प्रतापसिंहांनी लोकसभेची निवडणूक लढवावी, असा आग्रह धरला. त्यासाठी पुन्हा बैठका झाल्यानंतर आ. प्रतापसिंहांनी संघटनेच्या या निर्णयास होकार दिला. मात्र त्यानंतर माढा लोकसभा मतदारसंघातून शरद पवारांची उमेदवारी आल्याने पवारांचे शब्दाखातर मोहिते पाटील थांबले.
अशा प्रकारे जनसेवा संघटनेच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जातात याची संपूर्ण जिल्ह्य़ास माहिती आहे. त्यातच ही बैठक सोलापूरच्या कार्यालयात घेतली आहे. शिवाय समोर विधानसभेच्या निवडणुकीचे वातावरण आहे. अशा भौतिक परिस्थितीवरून लोक या बैठकीत काय निर्णय होईल याबाबतचे वेगवेगळे आडाखे बांधताना दिसत आहेत.