Leading International Marathi News Daily

बुधवार, १७ जून २००९

(सविस्तर वृत्त)

इस्लामपूर नगराध्यक्षपदाची सोमवारी निवड; मोर्चेबांधणी
इस्लामपूर, १६ जून / वार्ताहर

इस्लामपूरच्या नगराध्यक्षा श्रीमती शारदादेवी पाटील यांच्या पदाची मुदत मंगळवारी संपली आहे व नव्या नगराध्यक्षाची निवड येत्या दि. २२ जून रोजी होणार असल्याने इच्छुकांच्या हालचाली

 

गतिमान झाल्या आहेत.
नगराध्यक्षपदाचा आगामी अडीच वर्षाचा कालावधी हा ओबीसी प्रवर्गातील पुरुष गटासाठी राखीव आहे व नगरपालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसकडे ओबीसी प्रवर्गातील नगरसेवकांची संख्या तब्बल आठ आहे व ते सर्वचजण इच्छुकांच्या पंक्तीत बसल्याने नगराध्यक्षपदाची निवडणूक लक्षवेधी ठरली आहे. सव्वीस सदस्य असलेल्या इस्लामपूर नगरपालिकेत गृहमंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील सत्तारूढ गटाचे २१, तर विरोधी आघाडीकडे केवळ पाचच सदस्य आहेत. संख्याबळाचा विचार करता नगराध्यक्षपदाची निवडणूक एकतर्फीच होणार, हे उघड गुपित आहे.
नगराध्यक्षपदासाठी सत्ताधारी गटाचे विद्यमान उपनगराध्यक्ष अ‍ॅड. चिमण डांगे, शंकरराव चव्हाण, माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे, पीरअली पुणेकर, माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. सुधीर पिसे, हणमंतराव माळी, विजय कोळेकर व संजय कानडे हे आठजण पात्र आहेत. इस्लामपूरच्या नगराध्यक्ष निवडीचा अंतिम निर्णय गृहमंत्री जयंत पाटील हेच घेणार आहेत व त्यांच्यापर्यंत प्रभावीपणाने नाव पोहोचविण्यात ज्याला अंतिमत: यश मिळेल, त्याचीच निवड होणार आहे. त्यामुळे पाटील यांच्यापर्यंत नाव रेटण्यासाठी प्रत्येक इच्छुक मोर्चेबांधणी करू लागला आहे.
नगरसेवक पीरअली पुणेकर यांनी तालुक्यातील सर्व मुस्लीम संघटनांना एकत्रित करून त्यांच्यावतीने खुलेपणाने नगराध्यक्षपदाची मागणी केली आहे, तर अ‍ॅड. चिमण डांगे यांनी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न सुरू केले आहेत. आनंदराव मलगुंडे हेही वरिष्ठ पातळीवरून हालचाली करीत आहेत. नगरसेवक शंकरराव चव्हाण, हणमंतराव माळी व विजय कोळेकर यांनी सावधपणाने व पक्षप्रतोद विजय पाटील यांच्यावर भरोसा ठेवून संयमितपणाने आपले प्यादे पुढे दामटण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. अ‍ॅड. सुधीर पिसे हे थेटपणे गृहमंत्री जयंत पाटील यांच्याकडेच आपला प्रस्ताव ठेवून परीक्षा पाहतील, तर संजय कानडे हे अद्याप तरी पुढे आलेले नाहीत. त्यामुळे पहिल्या टप्प्यात तरी ते आठव्या क्रमांकावरच आहेत.