Leading International Marathi News Daily

बुधवार, १७ जून २००९

(सविस्तर वृत्त)

अक्कलकोटच्या शिवपुरीत कायरोप्रॅक्टिक उपचार शिबिर
अमेरिका व फ्रान्सचे डॉक्टर येणार
सोलापूर, १६ जून/प्रतिनिधी

अक्कलकोटच्या शिवपुरीत सती चिमामाता अन्नपूर्णा समिती व धर्मात्मा तात्याजी महाराज

 

मेमोरियल मेडिकल रिलिफ ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १८ ते ३० जून दरम्यान कायरोप्रॅक्टिक उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी अमेरिका व फ्रान्समधून ३० कायरोप्रॅक्टिक तज्ज्ञ येत आहेत.
अर्धागवायू, संधिवात, पाठीचे व मणक्यांचे विकार, फ्रोझन शोल्डर, कंबर दुखी, मानदुखी व शरीराचे अवयव पांगळे झालेल्या रुग्णांना या शिबिराचा लाभ घेण्याची संधी मिळणार आहे. याबाबतची माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कायरोप्रॅक्टिकमधील कायरो म्हणजे हात होय. संस्कृतमधील ‘कर’ पासून ‘कायरो’ शब्द झाल्याचे दिसून येते. कायरोप्रॅक्टिक म्हणजे हाताने केली जाणारी उपचार पध्दती होय. अपघात व चुकीच्या पध्दतीने बसणे, उठणे, चालणे इत्यादींमुळे पाठीच्या मणक्यांचे संतुलन बिघडून त्यातून विविध अवयवांकडे जाणाऱ्या मज्जातंतूंवर दाब पडून तेथे वेदना व व्याधी निर्माण होतात.
कायरोप्रॅक्टिकच्या तंत्राने कोणत्याही प्रकारचे औषध व शस्त्रक्रियेविना केवळ हाताने विशिष्ट प्रकारे दाब देऊन मणके पूर्वस्थितीत आणले जातात. अमेरिकेत या उपचार पध्दतीचा शास्त्रीय अभ्यासक्रम विकसित झाला असून, सध्या सुमारे ७० देशांत ही उपचार पध्दती मान्यताप्रश्नप्त वैद्यकीय शाखा आहे.
शिवपुरीत यापूर्वी पाच वेळा घेण्यात आलेल्या कायरोप्रॅक्टिक शिबिराचा पंधरा हजारांपेक्षा अधिक रुग्णांनी लाभ घेतला होता. या शिबिरासाठी नाममात्र शंभर रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. अमेरिकास्थित डॉ. लुईस यांच्या नेतृत्वाखालील तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक रुग्णांची चिकित्सा करणार असल्याची माहितीही राजीमवाले यांनी दिली. या पत्रकार परिषदेस डॉ. गिरिजा राजीमवाले यांच्यासह कायरोप्रॅक्टिक तज्ज्ञ डॉ. जस्टिनक्लाईन यांच्यासह अन्य तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित होते.