Leading International Marathi News Daily

बुधवार, १७ जून २००९

(सविस्तर वृत्त)

जमीन नावावर न केल्याने आईच्या मदतीने बापाचा खून
सांगली, १६ जून / प्रतिनिधी

अवघी चार गुंठे जमीन नावावर न केल्याचा राग मनात धरून आईच्या मदतीने वडिलांना पुलावरून खाली फेकून देऊन त्यांचा खून केल्याची घटना सांगली पोलिसांनी सोमवारी उघडकीस आणली

 

आहे.
पोलिस अधीक्षक कृष्णप्रकाश यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलिस अधीक्षक बाळासाहेब वाघमोडे यांनी या प्रकरणाचा छडा लावला. सांगली पोलिसांनी अटक केलेल्यात मुलगा राजेश ईश्वर कुंभार व त्याची आई भगीरथी ईश्वर कुंभार यांचा समावेश आहे.
संजयनगर येथील ईश्वर कुंभार (वय ८०) यांची चार गुंठे जागा आहे. मात्र गेले काही दिवस ही जागा आपल्या नावावर करावी, असा तगादा मुलगा राजेश याने लावला होता. त्यावर ईश्वर कुंभार यांनीही ही जागा तुझ्या नावावर करतो, असे त्याला सांगितले होते. परंतु जागेबाबतच्या सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर ईश्वर कुंभार यांनी ही जागा राजेश याच्या नावावर करण्यास नकार दिला होता. त्यामुळे संतापलेल्या राजेश याने वडिलांचा कायमचाच काटा काढण्याचा निश्चय केला होता.
राजेश व त्याची आई भगीरथी यांनी दि. २८ मे रोजी वडील ईश्वर यांना गोड बोलून शाहूवाडी येथे नेले. शाहूवाडीनजीकच्या पुलावरून ईश्वर कुंभार यांना खाली ढकलून त्यांचा खून केला. तसेच सांगलीत येऊन आपले वडील कोणाला काहीही न सांगता घरातून निघून गेल्याची तक्रार विश्रामबाग पोलिस ठाण्यात दाखल केली. परंतु ईश्वर कुंभार यांचा दुसरा मुलगा महेश याने आपल्या वडिलांचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला होता. त्यानुसार अतिरिक्त पोलिस अधीक्षक बाळासाहेब वाघमोडे यांनी अधिक तपास केला असता खुनाची ही घटना उघडकीस आली.