Leading International Marathi News Daily

बुधवार, १७ जून २००९

(सविस्तर वृत्त)

नवविवाहितेचा जाळून खून; सासू-नणंद अटकेत
सोलापूर, १६ जून/प्रतिनिधी

भेळ विक्रीसाठी माहेरातून पंचवीस हजारांची रक्कम आणत नाही म्हणून नवविवाहितेच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून देऊन तिचा खून केल्याप्रकरणी सासू व दोन नणंदांना पोलिसांनी अटक केली

 

आहे. शास्त्रीनगर भागातील कुंभार गल्लीत हा प्रकार घडला.
गायत्री श्रीनाथ घोडके (वय २२) असे खून झालेल्या दुर्दैवी नवविवाहितेचे नाव आहे. तिने दिलेला मृत्युपूर्व जबाब व फिर्यादीनुसार तिची सासू कौसल्या देवीदास घोडके (वय ४५), नणंद राजश्री मोहन कांबळे (वय २५) व दुसरी नणंद कु. शैलेश्री घोडके (वय १८) या तिघींना सदर बझार पोलिसांनी अटक केली. घोडके यांचा भेळ विक्रीचा व्यवसाय असून त्यासाठी माहेरातून पंचवीस हजारांची रक्कम आणावी म्हणून सासू व नणंदांनी गायत्रीचा गेल्या पंधरा दिवसांपासून छळ चालविला होता. रात्री ती घरात स्वयंपाक करीत असताना याच कारणावरून सासू व नणंदांनी तिला पेटवून दिले.
नवविवाहितेची आत्महत्या
पूर्व भागात दत्तनगर गिरी झोपडपट्टीत सौ. राजश्री रमेश चिल्लाळ (वय २०) या नवविवाहितेने स्वतला पेटवून घेऊन आत्महत्या केली. सासरी होणाऱ्या जाचहाटामुळे तिने आत्महत्येचा मार्ग पत्करल्याचे सांगण्यात आले. मात्र याबाबत जेलरोड पोलीस ठाण्यात अद्यापि कोणावरही गुन्हा दाखल झाला नाही.
वीस तोळे सोने पळविले
सोन्याच्या दागिन्यांना पॉलिश करून देण्याची थाप मारून दोघा भामटय़ांनी एका महिलेकडून वीस तोळे सोन्याचे दागिने पळवून नेल्याची घटना विजापूर रस्त्यावरील सुविद्यानगरात घडली. याबाबत माधव विठ्ठल जोशी यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार २५ वर्षे वयोगटाच्या दोघा भामटय़ांनी जोशी यांच्या घरात प्रवेश केला. त्यावेळी घरात त्यांच्या पत्नी होत्या. सोन्याच्या दागिन्यांना पॉलिश करून देतो अशी थाप मारून त्यांनी जोशी यांचा विश्वास संपादन केला. नंतर त्यांच्या ताब्यातील सोन्याच्या पाटल्या व बिलवर असे दागिने नजर चुकवून पळवून नेले.