Leading International Marathi News Daily

बुधवार, १७ जून २००९

(सविस्तर वृत्त)

नोकरशहा व राजकीय हस्तक्षेप थांबला तर भारत महासत्ता - डॉ. लाभसेटवार
सोलापूर, १६ जून/प्रतिनिधी

२०२० साली भारत जगाची महासत्ता बनण्याचे स्वप्न साकार करावयाचे असेल तर येथील राजकीय पुढाऱ्यांचा व नोकरशहांचा उद्योगक्षेत्रातील हस्तक्षेप थांबला पाहिजे, असे मत अमेरिकास्थित उद्योगपती, अनिवासी भारतीय तथा साहित्यिक डॉ. अनंत लाभसेटवार यांनी व्यक्त

 

केले.
मंगळवारी सकाळी सोलापूर श्रमिक पत्रकार संघात आयोजित वार्तालाप कार्यक्रमात डॉ. लाभसेटवार यांनी अमेरिकेचे भारतासह आशियाई व इस्लामी देशांशी असलेले संबंध, अणुकरार, जागतिक मंदी, अमेरिकन पत्रकारिता आदी विविध मुद्दय़ांवर भाष्य केले.
राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची लोकप्रियता ६५ टक्क्य़ांपर्यंत वाढली असली तरी येत्या काळात काही गंभीर मुद्दय़ांवर धोरणे आखताना त्यांना चांगल्या-वाईट प्रतिक्रियांना तोंड द्यावे लागेल. मुस्लिम राष्ट्रांमध्ये अमेरिकेविषयीचा द्वेष वाढत असताना तो कमी करण्याच्या दृष्टीने ओबामा यांनी घेतलेली उदारमतवादाची भूमिका महत्वाची वाटते. अमेरिकेचा लढा मुस्लिमांविरुध्द नसून अतिरेक्यांबरोबर आहे. सध्याच्या आर्थिक मंदीमध्ये अमेरिकेतील रोजगाराचे प्रमाण ९.४ टक्क्य़ांपर्यंत खाली घसरून तेथे झोपडपट्टय़ा निर्माण होत असल्या तरी भांडवलशाहीवरील अमेरिकन नागरिकांचा विश्वास अविचल आहे. नियामक मंडळामुळे ही परिस्थिती ओढवली असून त्यात सुधारणा होईल, असा विश्वासही डॉ. लाभसेटवार यांनी व्यक्त केला. ओबामा हे उदारमतवादी आहेत. परंतु समाजवादी धोरणे आखतात म्हणून त्यांच्यावर टीका सुरू झाल्याचेही त्यांनी सांगितले.
भांडवलशाहीमुळेच जगाचा विकास होऊ शकतो. मात्र त्यामुळे आर्थिक विषमता वाढते याची कबुली देत डॉ. लाभसेटवार यांनी, भारतातील विषमता शेकडो वर्षापासूनची आणि खालच्या पातळीपासूनची आहे. त्यावर उपाय योजता येतील, असे मत मांडले. अमेरिकेने मागील पाच वर्षात पाकिस्तानला अकरा अब्ज डॉलरची नागरी मदत केली. ही मदत पाकने लष्करी वापरासाठी केली. येत्या पाच वर्षातही एवढीच मदत अमेरिकेने पाकिस्तानला देऊ केली आहे. मात्र त्यातील एकही पैसा भारताविरुध्द वापरू नये अशी अट घालण्यात आली आहे. अमेरिकेच्या दृष्टीने पाकिस्तान हा गंभीर प्रश्न वाटतो. उद्या पाकचे विघटन होऊन तेथील अण्वस्त्रे अतिरेक्यांच्या ताब्यात गेली तर त्याचा सर्वाधिक धोका अमेरिकेला असल्याची भीती अमेरिकन नागरिकांना वाटते, असेही ते म्हणाले.
आपले साहित्य लेखनाचे प्रेरणास्रोत्र वि.स. खांडेकर हे आहेत. अमेरिकेतील जनजीवन मराठी वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच अमेरिका-भारत देशात एकमेकांविषयीचे समज-गैरसमज कमी करण्यासाठी लेखनाच्या माध्यमातून आपले प्रयत्न चालू असल्याचे डॉ. लाभसेटवार यांनी सांगितले. भारतीयांनी अमेरिकन संस्कृतीचे अंधानुकरण करू नये, असेही ते म्हणाले. सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष अभय दिवाणजी यांनी डॉ. लाभसेटवार यांचा शाल, स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.