Leading International Marathi News Daily

बुधवार, १७ जून २००९

(सविस्तर वृत्त)

बार्शी उपसा सिंचन योजनेसाठी २० कोटींची तरतूद
सोलापूर, १६ जून/प्रतिनिधी

बार्शी उपसा सिंचन योजनेच्या प्रलंबित कामासाठी राज्याच्या पुरवणी अर्थसंकल्पात २० कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आल्याची माहिती माजी राज्यमंत्री दिलीप सोपल यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे. या शासन निर्णयाचे संपूर्ण शहरात राष्ट्रवादी काँग्रेस सोपल गट व

 

आमदार राऊत गटाने फटाके वाजवून स्वागत केले.
केवळ आपल्याच मागणीप्रमाणे हा निधी मिळाला असल्याचा दावा सोपल यांनी केला आहे. तर मागील साडेचार वर्षात शासन दरबारी आपल्या सातत्याच्या पाठपुराव्यामुळे हा निधी मिळाल्याचा दावा आमदार राजेंद्र राऊत यांनी केला आहे.
बार्शी उपसा सिंचन योजना पूर्ण झाल्यानंतर बार्शी तालुक्यातील १२ हजार ४५०, तर माढा तालुक्यातील २५५० असे एकूण १५ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. बार्शी तालुक्यातील एकूण २२ गावांना याचा फायदा होणार आहे. या निधी व्यतिरिक्त योजनेच्या रखडलेल्या कामांसाठी आणखीन १२१ कोटी रुपयांची गरज आहे.
सोपल यांनी आपल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे, की ११ मे रोजी मुंबईच्या सह्य़ाद्री अतिथीगृहात केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत बार्शी, शिरापूर, आष्टीसह सोलापूर जिल्ह्य़ातील सिंचनकामांची आढावा बैठक झाली. त्यामध्ये मी विस्तृत निवेदन सादर केले. त्या निवेदनात केलेल्या सूचनांवर पवार यांनी संबंधितांना योग्य त्या कार्यवाहीचे आदेश दिले.
दरम्यान मध्यंतरी पंढरपूर येथे पवार यांनी पुरवणी अर्थसंकल्पात बार्शी उपसा सिंचनाचा समावेश करण्यात आल्याचे सांगितले होते. त्यानुसार २० कोटी रुपयांची तरतूद चालू पुरवणी अर्थसंकल्पात करण्यात आल्याने प्रलंबित कामाला लवकरच सुरुवात होणार आहे.