Leading International Marathi News Daily

बुधवार, १७ जून २००९

(सविस्तर वृत्त)

सांगोलाच्या नगराध्यक्षपदी रफिक नदाफ निश्चित
सांगोला, १६ जून/वार्ताहर

सांगोला नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी आज अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस व आर.पी.आय.च्या नगरविकास आघाडीतर्फे रफिक नदाफ यांचा, तर उपनगराध्यक्षपदासाठी अब्दुलरहिम मुजावर यांचा एकेकच अर्ज दाखल झाला असल्याची माहिती

 

सहायक निवडणूक अधिकारी राजेंद्र तेली यांनी दिली.
सोमवार १५ जून रोजी अर्ज भरण्याची मुदत ११ ते २ होती. त्या मुदतीत नगराध्यक्षपदासाठी रफिक नदाफ, तर उपनगराध्यक्षपदासाठी अब्दुलरहीम मुजावर या दोघांचेच अर्ज आले. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता छाननी होऊन दोन्हीही अर्ज वैध असल्याचे प्रसिद्ध करण्यात आले. आता बिनविरोध निवडीच्या अधिकृत घोषणेची वाट पाहावी लागणार आहे. मंगळवारपर्यंत (१६ जून) अर्ज मागे घेता येतील. वेळ पडल्यास मतदान शुक्रवार १९ जून रोजी होणार आहे.
सांगोला नगरपालिकेत १८ नगरसेवक असून त्यामध्ये ११ नगरसेवक नगरविकास आघाडीचे आहेत. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे ८, तर काँग्रेसचे ३ नगरसेवक आहेत. पहिले अडीच वर्षे नगराध्यक्षपद राष्ट्रवादीला तर पुढील अडीच वर्षे काँग्रेस पक्षाला असे ठरले होते. त्यानुसार राष्ट्रवादीचे दीपकआबा साळुंखे पाटील, बाबुराव गायकवाड, काँग्रेस पक्षातर्फे माजी आमदार अ‍ॅड. शहाजीबापू पाटील, मा. पी. सी. झपके, सुभाषनाना पाटील यांच्यासह अकरा नगरसेवक यांची बैठक होऊन त्यामध्ये नगराध्यक्षपदासाठी रफीक नदाफ तर उपनगराध्यक्षपद अब्दुलरहिम मुजावर यांचे नाव निश्चित करण्यात आले. त्यानुसार दोघांनी अर्ज दाखल केले.
नगरपालिकेत शेकापचे सात नगरसेवक आहेत. त्या नगरसेवकांची बैठक आमदार गणपतराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली होऊन नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवायची नाही असे ठरविण्यात आले. यानुसार शेकापने अर्ज दाखल केला नाही. जनतेने ५ वषार्ंसाठी आपणास विरोधी बसण्याचा निर्णय दिला आहे. आपण विकासकामाला सहकार्य करू, असे आमदार गणपतराव देशमुख यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ८ नगरसेवक असूनही राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडीच्या धर्माचे पालन केले व काँग्रेसचे ३ नगरसेवक असतानाही पाठिंबा दिला आहे. त्याबाबत दीपकआबा साळुंखे पाटील व नगरसेवक तसेच काँग्रेसचे माजी आमदार शहाजीबापू पाटील, प्रश्न. पी. सी. झपके, दगडूभाई इनामदार, सुभाषनाना पाटील, बाबुराव गायकवाड, आमदार गणपतराव देशमुख व त्यांच्या पक्षाचे नगरसेवक यांचे ऋण नदाफ यांनी व्यक्त केले.
रफिक नदाफ यांनी वॉर्ड क्र. ११ मधून शेकापचे डॉ. श्रीकांत भोसेकर यांचा पराभव केला होता. अत्यंत चुरशीच्या व लक्षवेधी लढतीत नदाफ यांनी बाजी मारली होती. रफीक नदाफ हे माजी आमदार अ‍ॅड. शहाजीबापू पाटील यांचे विश्वासू व कट्टर समर्थक आहेत, तर नगरपालिकेत साखर कारखान्याचे अध्यक्ष दीपकआबा पाटील यांचे मार्गदर्शनाखाली काम करतात तसेच ते तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आहेत. नगरपालिकेत नगराध्यक्षपद व उपनगराध्यक्षपद मुस्लीम समाजाला प्रथमच मिळाले आहे. हा एक इतिहासात नोंद करण्याचा प्रसंग आहे.
अब्दुल रहीम मुजावर हे वॉर्ड क्र. १४ मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निवडणूक लढवून शेकापचे प. महंमद- मुलाणी यांचा पराभव केला होता. दीपकआबा साळुंखे पाटील यांचे मुजावर हे कट्टर समर्थक आहेत.
सर्व नगरसेवकांनी व त्या त्या पक्षाच्या नेत्यांनी बिनविरोध विजयी केल्याबद्दल मोठी जबाबदारी पडली आहे. सांगोला शहराचा चेहरा मोहरा बदलून आरोग्य, पाणी, स्वच्छता याकडे जास्तीत जास्त लक्ष दिले जाईल, असे नूतन नगराध्यक्ष रफिक नदाफ यांनी सांगितले.