Leading International Marathi News Daily

बुधवार, १७ जून २००९

(सविस्तर वृत्त)

नीरा नदीतील मातीच्या उपशामुळे कुरबारी गावाला पुराचा धोका
माळशिरस, १६ जून/वार्ताहर

नीरा नदीलगतच्या गाळाच्या मातीचा वीट व्यवसायासाठी होणाऱ्या अमर्याद उपशामुळे तालुक्यातील

 

कुरबारी गावाला या नदीच्या पुराचा धोका निर्माण झाला आहे.
या तालुक्यातील कुरबारी व पुणे जिल्ह्य़ाच्या इंदापूर तालुक्यातील कुरवली या दोन्ही गावांमधून नीरा नदी वाहते. या दोन्ही गावांच्या बाजूस नदीच्या कडेस मात्र खासगी शेतकऱ्यांच्या क्षेत्रात या नदीच्या पात्रातून पाणी वाहून गेल्याने त्याठिकाणी मातीची बेटे तयार झाली आहेत. सातारा जिल्ह्य़ातील राजुरीपासून येणारा करंज ओढा व माळशिरस तालुक्यातील धर्मपुरीपासून येणारा मुका ओढा हे दोन नाले या नदीस बेटाच्या जवळपास मिळतात. मात्र ही दोन्ही ठिकाणे पूर्णपणे खासगी शेतकऱ्यांच्या मालकीची आहेत. या दोन्ही बेटांमुळे पुराच्या पाण्यास वळण मिळते व हे पाणी या नदीवरील कुरभावी कुरवली पुलाखालून जाते. त्यामुळे पुराचे पाणी कुरबावीलगत येते. मात्र त्याचा गावास कसलाही धोका पोहचत नाही.
परंतु अलीकडे वीट व्यावसायिकांची नजर या बेटातील मातीकडे गेली आहे. शिवाय या क्षेत्राची मालकी खासगी आहे. त्यामुळे हे व्यावसायिक या शेतकऱ्यांच्या संपर्कात राहून व शासकीय गौण खनीज कर भरून ही माती मोठय़ा प्रमाणात उचलत आहेत. परंतु बेसुमार माती उपशामुळे ही बेटे नाहिशी होताना दिसत आहेत. वीट व्यावसायिक व संबंधित शेतकरी जरी शासनाचा सारा भरत असले तरी त्या उपशासंबंधीच्या नियम, अटींचे पालन न करता बेसुमार उपसा केल्याने ही परिस्थिती ओढवत आहे. एकतर प्रचंड वाळू उपशाने नदीच्या पात्राचे नुकसान होत असतानाच हा माती उपसा चालू राहिला तर येत्या पावसाळ्यात येणाऱ्या पुराने नदीचे पात्र बदलण्याचा व ते पाणी कुरबावी किंवा कुरवली गावात घुसून सभोवतालच्या जमिनी, पिके, पूल व ही गावे वाहून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.
आवश्यक तो सारा मिळत असल्याने शासकीय अधिकारीही मूग गिळून बसतात. त्यास सध्या पावसाळ्याचे दिवस आल्याने गावातीलच काही कार्यकर्त्यांनी याबाबत राज्याचे ग्रामविकासमंत्री विजयसिंह मोहिते यांची भेट घेऊन हा सारा प्रकार कानावर घातला असून त्यांनीही संबंधित अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीवरून सूचना केल्या आहेत. मात्र पावसाळ्यापूर्वी हे उद्योग न थांबल्यास सर्वसामान्यांना फार मोठी किंमत चुकवावी लागेल हे दिसून येते.