Leading International Marathi News Daily

बुधवार, १७ जून २००९

(सविस्तर वृत्त)

अमित गुरव, अनंत कांबळेची सीईटी परीक्षेतही बाजी
सांगली, १६ जून / प्रतिनिधी

उच्च माध्यमिक परीक्षेत कोल्हापूर विभागात दुसरा आलेल्या अमित मुकुंद गुरव याने एमएचटी सीईटी परीक्षेतही बाजी मारली आहे. त्याला अभियांत्रिकी (पीसीएम ग्रुप)मध्ये १९० गुण मिळाले

 

आहेत. तसेच इतर मागासवर्गीय प्रवर्गात दुसरा आलेल्या अनंत पिंपळ कांबळे याला १७६ गुण मिळाले असून तो अभियांत्रिकी गटात अनुसूचित जाती प्रवर्ग विभागात प्रथम आला आहे. वैद्यकीय गटात झैन इकबाल तांबोळी याला १८० गुण मिळाले. मात्र राज्यातील १०० विद्यार्थ्यांत सांगली जिल्ह्य़ाच्या एकाही विद्यार्थ्यांला स्थान मिळविता आले नाही.
सांगली जिल्ह्य़ातील १७ केंद्रांवर एकूण सहा हजार ९३९ विद्यार्थ्यांनी सीईटी परीक्षेचा अर्ज भरला होता. कोल्हापूर विभागात उच्च माध्यमिक परीक्षेत दुसरा आलेला विलिंग्डन महाविद्यालयाचा अमित गुरव याने सीईटीतही यश संपादन केले. भौतिकशास्त्र ४४, रसायनशास्त्र ४६ व गणित विषयात १०० पैकी १०० गुण मिळाले. याच महाविद्यालयाच्या स्वप्नील पाटील याला १८८ व अमेय लोकरे याला १८३ गुण मिळाले. उच्च माध्यमिक परीक्षेत इतर मागासवर्ग प्रवर्गात दुसरा आलेला अनंत पिंपळ कांबळे याला सीईटीत १७६ गुण मिळाले. अभियांत्रिकी गटात अनुसूचित जाती प्रवर्ग विभागात तो प्रथम आला आहे. वैद्यकीय गटात विलिंग्डन महाविद्यालयाचा झैन इकबाल तांबोळी व संदीप अण्णासाहेब तुज्जनवार या दोघांना प्रत्येकी १८० गुण मिळाले, तर पद्मजित जाधव याला १७० गुण मिळाले. अभियांत्रिकी गटात श्रीमती कस्तुरबाई वालचंद महाविद्यालयातील अजिंक्य आडमुठे १८३, रोहित मांगलेकर १७९ व प्रतीक शहा याला १६४ गुण मिळाले.