Leading International Marathi News Daily

बुधवार, १७ जून २००९

(सविस्तर वृत्त)

शिक्षकांच्या बदलीसाठी ग्रामस्थांचे शाळेला टाळे
पेठवडगाव, १६ जून / वार्ताहर

शिक्षकांच्या अन्यत्र बदल्या कराव्यात, या मागणीसाठी आज शाळेच्या पहिल्याच दिवशी तळसंदे (ता. हातकणंगले) येथील ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी प्रश्नथमिक शाळेला टाळे ठोकले.

 

अनेक वशिल्याचे व शेजारच्या जिल्ह्य़ातील जवळच्या गावचे अनेक शिक्षक कार्यकर्ते सपत्नीक तळसंदे (ता. हातकणंगले) येथील विकास व कन्या विद्यामंदिरमध्ये गेली अनेक वर्षे नोकरीस आहेत. शिक्षणापेक्षा अन्य कामातच त्यांना रस असतो. शिकविण्याकडे दुर्लक्षच असते म्हणून अशा शिक्षकांच्या बदल्या करण्याची मागणी ग्रामस्थांनी दहा दिवसांपूर्वी केली होती. त्यानंतर काहीही कार्यवाही झाली नाही. रविवारी रात्री जि.प.सदस्य हंबीरराव मोहिते यांच्याशीही चर्चा झाली.
आज शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळा सुरू होण्यापूर्वी ग्रामस्थांनी डेअरीचा भोंगा देऊन सर्वाना एकत्र केले. ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच सदस्य यांनी शाळेला आपले टाळे ठोकले. दुपारी शिक्षण अधिकाऱ्यांनी येऊन चर्चा केली. मात्र येथील शिक्षकांची अन्यत्र बदली होईपर्यंत टाळे काढले जाणार नाही असा पवित्रा स्थानिक पदाधिकाऱ्यांनी घेतली.
या वर्षातील शाळेच्या पहिल्याच दिवशीच्या या प्रकाराने हातकणंगले तालुक्यातील शिक्षण व्यवस्था प्रश्नथमिक शिक्षकांच्या बदल्या हा चर्चेचा विषय ठरला आहे. या वेळी सरपंच श्रीमती लोहार, उपसरपंच धोंडीराम पाटील, माजी उपसरपंच मनोहर चव्हाण, राजाराम चव्हाण, ग्रा.प.सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.