Leading International Marathi News Daily

बुधवार, १७ जून २००९

(सविस्तर वृत्त)

आंबळी धरणास मान्यता - शिवेंद्रसिंहराजे
सातारा, १६ जून/प्रतिनिधी

परळी खोऱ्यातील ६० कोटी रुपये खर्चाच्या आंबळी धरणास राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता दिली असून, १०८० हेक्टर जमीन ओलिताखाली येणार असल्याची माहिती आमदार शिवेंद्रसिंहराजे

 

भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
उरमोडी धरणास केंद्रीय जल आयोगाची मान्यता अद्याप मिळाली नसली तरी आंबळी धरणास ७५ टक्के निकषाच्या आधारे एआयबीपीची मान्यता मिळणार असल्याने या योजनेंतर्गत उरमोडी धरणास केंद्र सरकारचे अनुदान मिळू शकेल, असे आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी सांगितले. आंबळी धरण उरमोडी प्रकल्पाचाच एक भाग आहे. जलसंपदामंत्री अजितदादा पवार व रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या प्रयत्नामुळे आंबळीचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. उरमोडीचे उजवे व डावे कालव्यासाठी १५ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. उजवा कालवा ३५ किलोमीटरचा असून, तो सासपडेपर्यंतची सातारा तालुक्यातील ५२५ हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे, तर डावा कालवा १४ किलोमीटरचा शेंद्रेपर्यंतचा असून, त्याद्वारे ८९० हेक्टरचे तालुक्यातील क्षेत्र भिजणार आहे.
अजिंक्यतारा किल्ला सुशोभीकरणासाठी सांस्कृतिक खात्याने पाच कोटी रुपये मंजूर केले असून, ते काम लवकरच सुरू होईल, असे आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी सांगितले. नूतनीकरण झालेल्या शाहू कलामंदिर नाटय़गृहाचे भाडे सातारा विकास व नगरविकास या दोन्ही आघाडय़ांनी मिळून निश्चित केले आहे. व्यावसायिक नसलेल्या संस्था व प्रश्नयोगिक नाटकासाठी ७ हजार भाडय़ात सवलत देण्याबाबत विचार करण्यात येईल, असेही त्यांनी या वेळी सांगितले.