Leading International Marathi News Daily

बुधवार, १७ जून २००९

(सविस्तर वृत्त)

कराड पालिकेतील सत्ताधारी गटात दुफळी
कराड, १६ जून/वार्ताहर

पुनर्रचित कराड-उत्तर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस अंतर्गत शह-काटशहाच्या राजकारणाचा दुष्परिणाम कराड नगरपालिकेच्या राजकारणावरही झाल्याचे आज उघड झाले.

 

सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेदरम्यान सत्ताधारी आघाडीतील दुफळी चव्हाटय़ावर आल्याने विरोधी जनशक्ती विकास आघाडीला सत्तेची संधी चालून येते किंवा काय असे गोंधळाचे चित्र निर्माण झाले आहे.
नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या घटकेला आज सत्ताधारी लोकशाही आघाडीच्या वतीने अ‍ॅड. विद्याराणी साळुंखे यांनी आपले तीन उमेदवारी अर्ज दाखल केले, तर विरोधी जनशक्ती विकास आघाडीच्या वतीने माजी नगराध्यक्षा शारदा जाधव, कमल मोरे व सावित्री मुठेकर यांनी प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज दाखल केले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रश्नंताधिकारी नीलिमा धायगुडे या काम पाहात आहेत. अर्ज छाननीत सर्व सहाही उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. विरोधी जनशक्ती विकास आघाडीमधील शारदा जाधव यांचीच उमेदवारी कायम राहण्याची दाट शक्यता आहे. शनिवारी (दि. २०) दुपारी एक वाजता मतदान होणार आहे.
सध्या नगरपरिषदेत २६ सदस्यांपैकी आमदार बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली लोकशाही आघाडीचे सर्वाधिक १२ सदस्य आहेत, तर कृष्णा उद्योग समूहाचे युवानेते व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखालील यशवंतरा चव्हाण कृष्णा विकास आघाडीचे ३ व अपक्ष सदस्य विद्यमान उपनगराध्यक्ष सुभाष डुबल अशी १६ सदस्यांची सत्ताधारी आघाडी आहे, तर विरोधी जनशक्ती विकास आघाडीचे १० सदस्य आहेत. असे बलाबल असताना आज नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी यशवंतराव चव्हाण कृष्णा विकास आघाडीचे विद्यमान नगराध्यक्ष अल्ताफ शिकलगार, माजी नगराध्यक्ष रामचंद्र कोळी व महादेव पवार या तीनही सदस्यांनी अनुपस्थित राहून आमदार बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील लोकशाही आघाडीला हादरा दिला.
कराड-उत्तर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आमदार बाळासाहेब पाटील व अतुल भोसले यांनी स्वतंत्रपणे संपर्क मोहीमेस सुरुवात केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतीलच या दोन युवा नेत्यांमध्ये यांगलीच जुंपणार असल्याचे चित्र आहे. याचीच झळ नगराध्यक्षपदाच्या निवडीला बसत आहे. याच संधीचे सोने करण्याची नामी संधी उठवण्याचे जनशक्ती विकास आघाडीच्या नेत्यांचे प्रयत्न आहेत. त्यांच्याकडून कृष्णा विकास आघाडीशी जुळते घेऊन सत्तेचे राजकारण सुरू असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.