Leading International Marathi News Daily

बुधवार, १७ जून २००९

(सविस्तर वृत्त)

राजारामबापू कारखान्याने केले १५०० एकरावर ठिबक सिंचन
इस्लामपूर, १६ जून / वार्ताहर

अतिरिक्त पाण्याचा वापर टाळण्यासाठी व जमिनीचा पोत सुरक्षित राहण्यासाठी लोकनेते राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना व शासन यांच्या वतीने वाळवा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या १५०० एकर शेतजमिनीवर ठिबक सिंचन केले असल्याची माहिती साखर

 

कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांनी सावळवाडी येथे दिली.
सावळवाडी येथे राजारामबापू साखर कारखान्याच्या वतीने क्षारपड जमिनीत ड्रेनेज खोदण्याच्या कामाच्या शुभारंभप्रसंगी पी. आर. पाटील बोलत होते. साखर कारखान्याचे संचालक नारायणराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात पी. आर. पाटील म्हणाले की, गृहमंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार साखर कारखान्याचे सभासद असलेल्या शेतकऱ्यांना ठिबक सिंचनासाठी ५० टक्के सबसिडी दिली जाते. त्याचा लाभ जास्तीत जास्त सभासद शेतकऱ्यांनी घेणे आवश्यक आहे.
राजारामबापू साखर कारखान्याने गेल्या वर्षीच्या उसाला आतापर्यंत १५०५ रुपये प्रतिटन उच्चांकी अ‍ॅडव्हान्स दिला असून अद्यापही दिवाळी अ‍ॅडव्हान्स व फायनल बिल देणे बाकी असल्याने शेतकऱ्यांच्या पदरात जास्तीत जास्त पैसे पडावेत, अशी भूमिका गृहमंत्री जयंत पाटील यांची असल्याचेही पी. आर. पाटील यांनी सांगितले.
सावळवाडीचे सरपंच रवींद्र माणगावे यांनी स्वागत केले. यावेळी नारायणराव पाटील यांचेही भाषण झाले. साखर कारखान्याचे संचालक श्रेणीक कबाडे, इरिगेशन ऑफिसर संभाजी पाटील, एम. वाय. जमादार, माळवाडीचे सरपंच तानाजी कोळी, आप्पासो काटकर, सुनील लांडे, अधिक पाटील, बाळासो आवटी व सुभाष लोंढे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.