Leading International Marathi News Daily

बुधवार, १७ जून २००९

प्रधान समिती अहवालावरून गोंधळ
दिवाकर रावते, अरविंद सावंत, विनोद तावडे निलंबित
मुंबई, १६ जून / प्रतिनिधी
सुरक्षा आणि गुप्ततेचे निमित्त करून राम प्रधान समितीचा मूळ अहवाल सादर न करता फक्त कृती अहवाल सादर करण्यात आल्याने विधिमंडळाच्या उभय सभागृहांमध्ये आज प्रचंड गदारोळ झाला. विधान परिषदेत कागदपत्रे भिरकवीत सभापतींच्या आसनाजवळ जाऊन गोंधळ घातल्याने भाजपचे विनोद तावडे यांचे सदस्यत्व तीन वर्षांंसाठी तर शिवसेनेचे दिवाकर रावते आणि अरविंद सावंत यांचे सदस्यत्व त्यांची मुदत संपेपर्यंत निलंबित करण्यात आले. प्रधान समितीत तीन आजी-माजी मंत्र्यांवर ठपका ठेवल्यानेच मूळ अहवाल सादर करण्याचे टाळण्यात आल्याचा विरोधकांचा आरोप मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी फेटाळून लावताना कोणत्याही मंत्र्यावर ताशेरे ओढलेले नसल्याचे स्पष्ट केले.

कायदेतज्ज्ञांच्या परीक्षेत ९०-१० उत्तीर्ण!
शासनाकडून आज घोषणा अपेक्षित
मुंबई, १६ जून / प्रतिनिधी
अकरावीची प्रवेशप्रक्रिया ९०-१० अशा कोटाधिष्ठित सूत्राच्याच आधारे करण्याचे स्पष्ट संकेत शालेय शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज दिले असून उद्या, बुधवारी त्याची औपचारिक घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. ९०-१० च्या धोरणाबाबत विधिज्ञांनी अनुकूल सल्ला दिल्यानंतर मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या अनुमतीनंतरच शासनाकडून हे पाऊल उचलले जात आहे.

‘तीन मंत्र्यांना वाचविण्याकरिता अहवाल दडपला’
मुंबई, १६ जून/प्रतिनिधी

समुद्रमार्गे अतिरेकी हल्ला होऊ शकतो, अशी माहिती गुप्तचर खात्याने दिल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे पोलिसांनी मार्गदर्शन मागितले. परंतु त्याबाबतची फाईल मंत्रालयात पडून राहिली आणि अतिरेकी हल्ला झाला, असा निष्कर्ष राम प्रधान समितीने काढत तीन मंत्र्यांवर ठपका ठेवल्यानेच राज्यातील सरकारने हा अहवाल दडपला, असा आरोप भाजपचे गटनेते एकनाथ खडसे यांनी आज पत्रकार परिषदेत केला. गुप्तचर खात्याच्या अपयशानंतरही डी. शिवानंद यांना मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्त करणे सर्वस्वी अयोग्य असल्याचेही खडसे म्हणाले.

कोणत्याही मंत्र्यावर ताशेरे नाहीत - मुख्यमंत्री
मुंबई, १६ जून / खास प्रतिनिधी

राम प्रधान समितीच्या अहवालात तीन मंत्र्यांवर ताशेरे ओढल्याने हा अहवाल विधिमंडळात सादर करण्यात आला नाही हा विरोधी नेत्यांचा आरोप फेटाळून लावताना मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी त्यात कोणत्याही आजी-माजी मंत्र्याचा उल्लेख करण्यात आलेला नसल्याचे आज स्पष्ट केले. २६ / ११ च्या हल्ल्याच्या सुरू असलेल्या न्यायालयीन सुनावणीवर परिणाम होऊ नये म्हणूनच मूळ अहवालाऐवजी फक्त कृती अहवाल सादर करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.

राज ठाकरे यांचा अटकपूर्व जामीन रद्द
कल्याण रेल्वे कोर्टात हजर होण्याचा आदेश
मुंबई, १६ जून/प्रतिनिधी
कल्याण रेल्वे पोलिसांनी नोंदविलेल्या गुन्ह्यात तेथील सत्र न्यायालयाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना आठ महिन्यांपूर्वी मंजूर केलेला अंतरिम अटकपूर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयाने आज रद्द केला व राज ठाकरे यांनी येत्या २९ जून रोजी सकाळी कल्याण रेल्वे दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात हजर हावे, असा आदेश दिला. कल्याणच्या दंडाधिकारी तसेच सत्र न्यायालयाने २२ ऑक्टोबर रोजी दिलेल्या आदेशांविरुद्ध राज्य शासनाने केलेली फौजदारी रिट याचिका मंजूर करून न्या. श्रीमती आर पी.सोंदूर-बलदोटा यांनी हा आदेश दिला.

हवामानातील बदलांचा कोकणालाही झटका
रत्नागिरी, १६ जून/खास प्रतिनिधी

मान्सूनचा पाऊस अपेक्षेपेक्षा जास्त लांबल्यामुळे कोकणातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून जागतिक पातळीवर चर्चा होणाऱ्या हवामानबदलाचा झटका निसर्गाचे वरदान लाभलेल्या कोकणालाही यंदा प्रथमच जाणवला आहे. गेल्या काही वर्षांंत हवामानामध्ये मोठय़ा प्रमाणात बदल होत असून त्याची गंभीर दखल देशोदेशीच्या हवामानतज्ज्ञांनी घेतली आहे, पण त्याबाबत आपल्या देशात आणि विशेषत: कोकणासारख्या निसर्गसंपन्न प्रदेशात फारशी जाणीव अजून झालेली नाही. कारण जगात अन्यत्र हवामानामध्ये चढ-उतार बदल होत असले तरी कोकणावर वरुणराजाची आणि एकूणच ऋतुचक्राची कृपादृष्टी राहिलेली आहे.

बीकॉमच्या परीक्षेत पोदार महाविद्यालयाचे वर्चस्व
मुंबई, १६ जून / प्रतिनिधी

मुंबई विद्यापीठाच्या वतीने मार्च-एप्रिल २००९ मध्ये घेण्यात आलेल्या तृतीय वर्ष वाणिज्य (टी.वाय.बी.कॉम.) अभ्यासक्रमाच्या परीक्षेचा निकाल अखेर जाहीर झाला असून पहिले तिन्ही क्रमांक माटुंगा येथील पोदार महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पटकावले आहेत. पहिल्या दहा विद्यार्थ्यांमध्येही पोदारच्याच सहा विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सिद्धार्थ सुनील पारेख (९०.४३), दुहिता भालचंद्र श्रीखंडे (९०.२९)आणि विधी धीरज विकम (८९.५७) हे तिघेजण अनुक्रमे पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर आहेत. ‘महाराष्ट्र विद्यापीठ कायद्या’नुसार ४० दिवसांच्या आतमध्ये निकाल जाहीर करणे बंधनकारक आहे.

१०१ मजली इमारतीसाठी देशी-विदेशी कंपन्याची झुंबड
विकास महाडिक
मुंबई १६ जून
एमएमआरडीएच्या माध्यमातून ‘बीओटी’ तत्वावर वडाळा येथे बांधण्यात येणाऱ्या १०१ मजल्यांच्या देशातील सर्वात उंच इमारतींच्या उभारणीसाठी देश-विदेशातील सात बडय़ा विकासकांनी व २३ सल्लागार कंपन्यांनी रस दाखवला आहे. जागतिक मंदीच्या सावटातही विकासकांच्या या अनपेक्षित प्रतिसादामुळे एमएमआरडीला सुखद धक्का बसला आहे.
वडाळा येथे ११५ हेक्टर जागेवर एमएमआरडीएकडून अद्ययावत ट्रक टर्मिनल व अांतरराज्यीय बस टर्मिनल विकसित करण्यात येत आहे.

पाकिस्तानातून भारताविरुद्ध होणाऱ्या दहशतवादी कारवाया बंद करा
मनमोहनसिंग यांनी झरदारींना ठणकावले
येकातरीनबर्ग, १६ जून/पीटीआय

भारताविरुद्ध दहशतवादी कारवाया करण्यासाठी पाकिस्तानच्या भूमीचा होत असलेला वापर बंद करा अशा शब्दांत पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी पाकिस्तानचे अध्यक्ष असीफ अली झरदारी यांना आज ठणकावले.रशियातील येकातरीनबर्ग या शहरामध्ये आयोजिण्यात आलेल्या बहुदेशीय परिषदेदरम्यान पंतप्रधान मनमोहनसिंग व असीफ अली झरदारी यांची आज भेट झाली. चर्चेसाठी दालनामध्ये जाण्याआधी दूरचित्रवाहिन्यांच्या प्रतिनिधींसमोर या दोन्ही नेत्यांनी परस्परांशी हस्तांदोलन केले. त्याचवेळी मनमोहनसिंग यांनी झरदारींना पत्रकारांसमोर ठणकावले. मनमोहनसिंग यांच्या या पवित्र्याने झरदारी काहीसे ओशाळले. सारवासारव करण्यासाठी झरदारी मनमोहनसिंग यांना पटकन म्हणाले की ‘आधी या पत्रकारांना येथून जाऊ दे.’ मुंबईवर गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मनमोहनसिंग व झरदारी यांची प्रथमच आज भेट झाली. भारत व पाकिस्तानमधील महत्वाच्या प्रश्नांवर या दोन्ही नेत्यांनी या भेटीत चर्चा केली. दरम्यान आशिया व मध्य आशियातील देशांना दहशतवादाचा मोठा फटका बसत आहे असे निरीक्षण नोंदवून मनमोहनसिंग यांनी म्हटले आहे की, दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी जागतिक स्तरावर सर्व देशांमध्ये उत्तम सहकार्य प्रस्थापित होण्याची गरज आहे. शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या (एससीओ) परिषदेत बोलताना मनमोहनसिंग म्हणाले की, भारताने आपला विकास साध्य करण्यासाठी उत्तम आर्थिक विकास करण्यावर भर दिला आहे.

अधिवेशनाचा शेवट भत्तेवाढीने !
मुंबई, १६ जून / खास प्रतिनिधी

अकराव्या विधानसभेच्या अधिवेशनाचा शेवटचा दिवस अध्यक्ष व उपाध्यक्ष, मंत्री, माजी आमदार यांच्यासाठी लाभदायी ठरला. कारण सर्वांच्या भत्त्यांमध्ये वाढ करण्यात आली. यामुळे शासनाच्या तिजोरीवर साडेआठ कोटींचा बोजा पडणार आहे.विधानसभा अध्यक्ष व उपाध्यक्ष तसेच विधान परिषदेचे सभापती व उपसभापती यांच्या अतिथी भत्त्यांमध्ये भरीव वाढ करण्यात आली आहे. सध्या वर्षांला चार लाख रुपये असलेला भत्ता आता सहा लाख रुपये करण्यात आला आहे. यामुळे दोन्ही सभागृहांचे अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या भत्त्यांमध्ये प्रत्येकी दोन लाख रुपये वाढ झाली आहे. मंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकांचे वेतन दरमहा सात हजार रुपयांवरून आठ हजार रुपये करण्यात आले आहे. दोन्ही सभागृहांच्या विरोधी पक्षनेत्यांच्या स्वीय सहाय्यकांच्या वेतनात हजार रुपये वाढ करून ते आठ हजार रुपये करण्यात आले आहे. माजी आमदारांच्या निवृत्त वेतनात पाच हजारांनी वाढ करण्यात आली आहे. माजी आमदारांना आता दरमहा १५ हजार रुपये निवृत्ती वेतन मिळेल. दिवंगत माजी आमदारांच्या कुटुंबियांना दरमहा पाच हजार रुपयांवरून साडेसात हजार रुपये निवृत्ती वेतन मिळणार आहे. विधानसभेत गोंधळातच भत्ते व निवृत्ती वेतनात वाढ करण्याचे विधेयक मंजूर झाले.

शायनी आहुजाने बलात्कार केल्याचे वैद्यकीय अहवालात निष्पन्न
मुंबई, १६ जून / प्रतिनिधी

अभिनेता शायनी आहुजा याने त्याच्या मोलकरणीवर बलात्कार केल्याचे वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाल्याचे आज पोलिसांतर्फे सांगण्यात आले. दरम्यान, आहुजाच्या ओशिवरा येथील घरालाही पोलिसांनी ‘सील’ केले आहे. बलात्कारप्रकरणी आहुजाला अटक झाल्यानंतर त्याची आणि मोलकरणीची वैद्यकीय चाचणी करण्यात आली होती. या चाचणीचे अहवाल आज पोलिसांना मिळाले. अहवालात आहुजाने मोलकरणीवर बलात्कार केल्याचे निष्पन्न झाले असल्याची माहिती उपायुक्त निकेत कौशिक यांनी दिली. याप्रकरणी आणखी पुरावे मिळविण्यासाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे एक विशेष पथक आहुजा याच्या घरी गेले होते. त्यानंतर त्याच्या घराला ‘सील’ ठोकल्याचेही कौशिक यांनी सांगितलेदरम्यान, या घटनेनंतर आज सुमारे २०० मोलकरणींनी ओशिवरा पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करून पीडित मोलकरणीला न्याय मिळवून देण्याची तसेच आहुजाला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली.

 


महाराष्ट्राचा आखाडा संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.

 

प्रत्येक शुक्रवारी