Leading International Marathi News Daily

बुधवार, १७ जून २००९

कर्जाच्या आमिषाने गंडा!
वैजापूरमध्ये ५० जणांची तीन भामटय़ांकडून फसवणूक

औरंगाबाद, १६ जून /प्रतिनिधी

आय. सी. आय. सी. आय. बँकेकडून शेती-उद्योगासह वेगवेगळ्या कारणांसाठी तत्काळ कर्ज देण्याची योजना असल्याचे भासवून तिघांच्या एका टोळीने वैजापूर तालुक्यातील सुमारे ५० जणांकडून १० टक्के रक्कम उकळून लाखो रुपयांना गंडा घालून पलायन केल्याचे आज समोर आले. फसविले गेल्याचे लक्षात आल्यानंतर यातील काहींनी आज वैजापूर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. सायंकाळपर्यंत कोणालाही अटक झाली नव्हती. या तिघांनीही पुण्याचा पत्ता दिला होता.

कळमनुरी, वसमतचे नगराध्यक्षपद काँग्रेसकडे; हिंगोलीत ‘राष्ट्रवादी’ला संधी
हिंगोली, १६ जून/वार्ताहर

जिल्ह्य़ातील तीन नगरपालिकांच्या अध्यक्षपदासाठी आज निवडणूक झाली. कळमनुरीत काँग्रेसच्या मुमताज बेगम बिनविरोध निवडून आल्या. वसमतमध्ये काँग्रेसच्या मनीषा कडतन यांनी भारतीय जनता पक्षाच्या सुषमा बोड्डेवार यांचा पराभव केला आणि हिंगोलीतून राष्ट्रवादी काँग्रेसचे गणेश लुंगे विजयी झाले. जिल्ह्य़ातील तिन्ही नगरपालिकांतील अध्यक्षपदांची निवडणूक आज झाली. हिंगोली येथे सात उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते.

मुंडे-मुंदडा भेट
बीड, १६ जून/वार्ताहर

भारतीय जनता पक्षाचे खासदार गोपीनाथ मुंडे यांनी काल सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व सार्वजनिक बांधकाममंत्री (उपक्रम) डॉ. विमल मुंदडा यांची त्यांच्या सरकारी निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून भेटीत नेमकी कोणत्या राजकीय विषयावर चर्चा झाली याचा तपशील समजला नाही. रेल्वेच्या प्रश्नावर ही भेट असल्याचे सूत्रांनी सांगितले.

कचरा
मागील काही महिन्यांपासून नागरी क्षेत्रातील घनकचरा विल्हेवाटीच्या बातम्या सर्वच दैनिकांतून प्रसिद्ध होत आहेत. राज्यातील बहुतेक शहरांमध्ये घनकचऱ्याची विल्हेवाट नियमितपणे आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने लावली जात नाही, ही वस्तुस्थिती सर्वमान्य आहे. या संबंधात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्र शासनाने सविस्तर नियम तयार केले आहेत. या नियमातील महत्त्वाच्या तरतुदींची अंमलबजावणी सन २००५पूर्वीच करणे अपेक्षितच नव्हे तर बंधनकारकसुद्धा होते.

सत्तापरिवर्तनाचा काँग्रेसचा प्रयत्न फसला
उस्मानाबाद, १६ जून/वार्ताहर

अपक्षांना पुढे करून काँग्रेसने नगरपालिकेमध्ये सत्तापरिवर्तनासाठी केलेले प्रयत्न सपशेल फसले. काँग्रेसचे तीन नगरसेवक अनुपस्थित राहिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे शेख सत्तार शेख रसुल यांनी आज १५ मते मिळवून नगराध्यक्षपद पटकाविले. उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसशी सलगी करणारे काँग्रेसचे मकरंद राजेनिंबाळकर यांची निवड झाली. राष्ट्रवादी काँग्रेसपुरस्कृत अपक्ष नगरसेवक काझी नादेरउल्ला हुसेनी यांना पुढे करून काँग्रेसने अपक्षांच्या जोरावर नगराध्यक्षपद मिळविण्याचा घाट घातला होता.

आयकर खात्याचे जालन्यात छापेसत्र
जालना, १६ जून/वार्ताहर

आयकर खात्याच्या अधिकाऱ्यांनी शहरातील काही उद्योजक-व्यापाऱ्यांवर आज छापे घातले. सकाळपासून सुरू झालेल्या या कारवाईची बाजारपेठेत चर्चा होती. चार-पाच उद्योजकांवर हे छापे घालण्यात आले. एकाच वेळी अनेक ठिकाणी घालण्यात आलेल्या या छाप्यांमध्ये जालना जिल्ह्य़ासह नजीकच्या काही जिल्ह्य़ांतील आयकर खात्याचे अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते. औद्योगिक वसाहतीतील बडय़ा लोखंड उद्योगांवर त्याचप्रमाणे शहरातील काही कापड विक्रीशी संबंधित असणाऱ्या व्यापाऱ्यांवर हे छापे घालण्यात आल्याची चर्चा होती. उद्योग, दुकाने त्याचप्रमाणे निवासस्थानांवरही आयकर अधिकाऱ्यांनी छापे घातले.

पाण्यासाठी महिलांचे ‘रास्ता रोको’
नांदेड, १६ जून /वार्ताहर

पिण्याचे पाणी मिळावे यासाठी आज नंदीग्राम सोसायटी तसेच विनायकनगर परिसरातल्या महिलांनी रास्ता रोको आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले. शहराच्या वेगवेगळ्या भागात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. गेल्या काही वर्षात अशा प्रकारची टंचाई यंदा तीव्रतेने जाणवत आहे. काही भागात पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू आहेत. काही भागात आजपर्यंत बोअरला पाणी होते; परंतु भूगर्भातील पिण्याच्या पाण्याची पातळी घटल्याने आता नागरिक हवालदिल झाले आहेत. पिण्याचे पाणी मिळावे यासाठी विनायकनगर, नंदीग्राम सोसायटी या भागातील महिलांनी महानगरपालिका तसेच संबंधित विभागकडे खेटे घातले; परंतु त्यांना कोणीही दाद दिली नाही. आज प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी या भागातील महिला एकत्र आल्या. त्यांनी मुख्य रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले. अचानक सुरू झालेल्या या रास्ता रोकोमुळे सुमारे तासभर वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी मध्यस्थी करून मनपाच्या अधिकाऱ्यांना तेथे बोलाविले. पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून दिली जाईल असे आश्वासन मिळाल्यानंतर महिलांनी आंदोलन मागे घेतले.

गंगाखेड नगराध्यक्षपदासाठी दोन अर्ज
गंगाखेड, १६ जून/वार्ताहर

नगराध्यक्षपदासाठी आज पुष्पलता गौतम भालेराव यांनी अर्ज दाखल केला. त्यामुळे आता नीलावंती घोबाळे विरुद्ध पुष्पलता भालेराव ही लढत होणार आहे. दरम्यान, माजी नगराध्यक्ष गौतम भालेराव व डॉ. प्रतिभा सिद्धार्थ भालेराव यांनी श्रीमती घोबाळे यांच्या अर्जावर छाननीदरम्यान आक्षेप दाखल केला होता. निवडणूक अधिकाऱ्यांनी तो फेटाळला. नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. श्रीमती भालेराव यांनी आज अर्ज दाखल केला. यावर सूचक म्हणून डॉ. प्रतिभा भालेराव यांनी व गौतम भालेराव यांनी अनुमोदक म्हणून स्वाक्षऱ्या केल्या. अर्ज मागे घेण्याची मुदत गुरुवापर्यंत आहे. छाननीदरम्यान डॉ. प्रतिभा भालेराव व गौतम भालेराव यांनी स्वतंत्रपणे नीलावंती घोबाळे यांच्याविरुद्ध आक्षेप दाखल केले. श्रीमती घोबाळे या महिला अनुसूचित जाती राखीव प्रवर्गातून निवडून न आल्याने त्यांना नगराध्यक्षपदासाठी पात्र धरू नये, या मुद्दय़ांसहीत इतर मुद्दय़ांचा समावेश होता.

नव्वद कर्मचारी ‘दांडी’यात्रेवर!
बीड, १६ जून/वार्ताहर

जिल्हाधिकारी पंकजकुमार यांनी शहरातील विविध सरकारी कार्यालयांना काल भेट देऊन हजेरीपट तपासला. ‘दांडी’यात्रेवर असलेल्या तब्बल ९० कर्मचाऱ्यांना दंड करण्याचा आदेश त्यांनी दिला.
नगर रस्ता परिसरात जिल्हाधिकाऱ्यांसह सर्व विभागांची कार्यालये आहेत. कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांची उपस्थिती नाममात्रच असते. कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीने जिल्हाभरातून आलेले नागरिक त्रस्त असतात. श्री. पंकजकुमार यांनी काल अचानक महसूल व इतर कार्यालयांत भेट देऊन हजेरीपटांची तपासणी केली. अनेक ठिकाणी हजेरी पटावर सही, पण कर्मचारी गैरहजर असे दिसून आले. अनेक ठिकाणी कर्मचारी कार्यालयाबाहेर आढळून आले. कोणतेही कारण न देता दांडीयात्रेवर असलेल्या या सर्व कर्मचाऱ्यांना प्रत्येकी ५० रुपयेा दंड करण्याचा आदेश दिला.

अध्र्या शहराला आज पाणी नाही, दुरुस्ती सुरू
औरंगाबाद, १६ जून /प्रतिनिधी

काल मोठय़ा प्रमाणावर गळती सुरू झाल्याने मंगळवारी दुपारपासून ७०० मिलीमीटर व्यासाच्या वाहिनीच्या दुरुस्तीचे काम अखेर हाती घेण्यात आले. या दुरुस्तीसाठी किमान दहा तासांचा अवधी लागणार असल्यामुळे उद्या (बुधवार) अध्र्या शहराला पाणी मिळणार नसल्याचे कार्यकारी अभियंता सखाराम पानझडे यांनी निवेदनाद्वारे कळविले आहे. महानुभाव आश्रम येथे काल गळती सुरू झाली होती. गळती वाढत गेल्याने आज या वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा थांबविण्यात आला आणि दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास दुरुस्तीला सुरुवात झाली. दहा तासांनंतर म्हणजे रात्री दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर काही तासांनी यातून पाणी सोडण्यात येणार आहे. परिणामी उद्या गुलमंडी, औरंगपुरा, सिटी चौक, दलालवाडी, दिवाण देवडी, चौराहा, नबावपुरा, राजाबाजार, शहाबाजार, म्हाडा कॉलनी, मकसूद कॉलनी, पोलीस कॉलनी, मुजीब कॉलनी, एस. टी. कॉलनी, टाईम्स कॉलनी, क्रांती चौक, खोकडपुरा, बापूनगर, जरीपुरा, चुनाभट्टी, बौद्धवाडा, गांधीनगर, सेव्हन हिल, अिहसानगर, गारखेडा, मोरेश्वर सोसायटी, अशोकनगर, उल्कानगरी, हनुमाननगर, नक्षत्रवाडी, इटखेडा, कांचनवाडी, मिलिंदनगर, सिल्कमिल कॉलनी, राहुलनगर, उस्मानपुरा, एकनाथनगर, बन्सीलालनगर, गांधीनगर या भागाला पाणी मिळणार नाही. उर्वरित शहराला कमी दाबाने पाणी मिळेल.

उमरग्याच्या नगराध्यक्षपदी प्रभावती बेबंळगे
उमरगा, १६ जून /वार्ताहर

नगराध्यक्षपदी प्रभावती सुग्रीव बेबंळगे यांची व उपनगराध्यक्षपदी अतिक मुन्शी यांची आज निवड झाली. नगरपालिकेमध्ये काँग्रेसचे पाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे चार, शिवसेनेचे सहा, भारतीय जनता पक्ष व रिपब्लिकन पक्ष यांचा प्रत्येकी एक सदस्य आहे. दोन्ही पदांसाठी आज निवडणूक झाली. नगराध्यक्षपदाच्या लढतीत काँग्रेस आघाडीच्या प्रभावती बेंबळगे यांना ९ व शिवसेना-भा. ज. प. युतीच्या सायराबानो रज्जाक अतार यांना आठ मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रभावती बेंबळगे केवळ एका मताने निवडून आल्या. रिपब्लिकन पक्षाचे नगरसेवक पोपटराव सोनकांबळे यांनी अनपेक्षितपणे युतीच्या पारडय़ात मत टाकले. उपाध्यक्षपदी काँग्रेसचे अतीक मुन्शी बिनविरोध निवडून आले. ही निवड होताच कार्यकर्त्यांनी पालिकेच्या कार्यालयासमोर फटाक्यांची आतषबाजी केली. पोलीस निरीक्षक राजेंद्र मोरे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. पीठासीन अधिकारी म्हणून विशेष भूसंपादन अधिकारी पी. व्ही. धोत्रे यांनी काम पाहिले. मुख्याधिकारी कुरे यांनी त्यांना मदत केली.

वसमतच्या नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या मनीषा कडतन
उपाध्यक्षपदी इंदिराबाई साखरे
वसमत, १६ जून/वार्ताहर

नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या मनीषा कडतन तीन मतांनी विजयी झाल्या. उपनगराध्यक्षपदी तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या इंदिराबाई साखरे उपाध्यक्षपदी बिनविरोध निवडून आल्या. पीठासन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी विजयकुमार फड यांनी काम पाहिले. दुपारी १२ वा. पालिकेच्या सभागृहात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व भाजपचे नगरसेवक अचानक आले. नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या मनीषा कडतन व भाजप-शिवसेनेच्या सुषमा बोड्डेवार हे आमनेसामने होते. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी चार अर्ज दाखल झाले होते. सोमवारी राष्ट्रवादीच्या इंदिराबाई साखरे व शिवसेनेच्या ताराबाई भोसले यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे या दोघांमध्ये सरळ लढत होती. सभागृहात नगराध्यक्षपदासाठी हात वर करून आपले मतदान करायचे होते. यावेळी कडतन यांना १४ नगरसेवकांनी हात वर करून मतदान केले.

लातूरच्या नगराध्यक्षपदी कांबळे यांची निवड निश्चित
लातूर, १६ जून /वार्ताहर

नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी काँग्रेसचे नगरसेवक लक्ष्मण कांबळे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला असल्यामुळे त्यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड होणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्याची अधिकृत घोषणा शुक्रवारी (दि. १९) होईल. श्री. कांबळे यांनी दोन अर्ज दाखल केले होते. पहिल्या अर्जावर नगराध्यक्ष व्यंकट बेद्रे व उपनगराध्यक्ष मोईज शेख यांच्या सूचक व अनुमोदक म्हणून सह्य़ा आहेत. दुसऱ्या अर्जावर माजी नगराध्यक्ष विक्रमसिंह चौहान, नगरसेविका मीरा राठोड यांच्या सूचक व अनुमोदक म्हणून सह्य़ा आहेत.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी शिवाजी शिंदे काम पाहत आहेत. उपाध्यक्षपदाची निवडणूक शुक्रवारी आहे. निवडणूक अधिकारी म्हणून नूतन नगराध्यक्ष काम पाहतील.

लातूर जिल्हा बँकेतर्फे विलासरावांचा सत्कार
लातूर, १६ जून/वार्ताहर

विलासराव देशमुख यांची केंद्रीय अवजड उद्योगमंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. विलासराव देशमुखांवर केंद्राने जी जबाबदारी टाकली आहे ती जबाबदारी ते समर्थपणे पार पाडतील व लातूर जिल्ह्य़ातील औद्योगिक क्षेत्राला त्यांच्या मंत्रिमंडळातील सहभागामुळे बळकटी मिळेल, असा विश्वास यावेळी संचालक मंडळाने व्यक्त केला. याप्रसंगी बँकेचे अध्यक्ष एस. आर. देशमुख, उपाध्यक्ष विठ्ठलराव माकणे, संचालक दिलीपराव देशमुख, विश्वंभरराव माने, विजयकुमार पाटील, बाबासाहेब पाटील, अशोक गोविंदपूरकर, शीलाताई पाटील, कमलताई जटाळ, इंदुताई इगे, कार्यकारी संचालक एस. टी. वाघ, सरव्यवस्थापक एच. जे. जाधव आदींची उपस्थिती होती.

‘शेतकऱ्यांपर्यंत सर्व योजना पोहोचतात का, याकडे लक्ष देण्याची गरज’
सिल्लोड, १६ जून/वार्ताहर

सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत सरकारच्या शेतीविषयक योजना पोहोचतात का, याविषयी गंभीरतेने आढावा घेतल्यास खरी परिस्थिती लक्षात येईल. त्यादृष्टीने शेतकरी व सरकार यांच्यात समन्वय दृढ होण्यासाठी लक्ष देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन खासदार रावसाहेब दानवे यांनी केले. सिल्लोड येथे कृषी उत्पन्न बाजार समिती व कृषी विभागाच्या वतीने आयोजित शेतकरी व महिलांच्या मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती काशीनाथ जंजाळ, उपसभापती सुरेश बनकर, जिल्हा परिषदेच्या सभापती किरणदेवी जैस्वाल, पंचायत समितीचे सभापती अशोक गरुड, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्रीरंग साळवे उपस्थित होते. श्री. दानवे पुढे म्हणाले, स्पर्धेच्या युगात शेती करताना शेतकऱ्यांनी नव्या तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे.

केजला लवकरच नगरपंचायतीचा दर्जा
बीड, १६ जून/वार्ताहर

मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केजला नगरपंचायतीचा दर्जा देण्याबाबत येत्या आठ दिवसांत कार्यवाही पूर्ण करू, अशी ग्वाही डॉ. विमल मुंदडा यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या शिष्टमंडळाला दिली. त्यामुळे शहरात कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून आनंद व्यक्त केला. केजला नगरपंचायतीचा दर्जा मिळावा या मागणीसाठी गेल्या १५ वर्षापासून आंदोलन सुरू आहे. नगरपंचायत की नगरपालिका असा वाद सुरू झाल्यामुळे नागरिकांना मूलभूत सोयींपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. गावाला शहराचे स्वरूप आले तरी कारभार मात्र ग्रामपंचायतीचा. त्यामुळे सरकारने निर्णय घ्यावा यासाठी मागील काही दिवसांपासून सर्वपक्षीय आंदोलन, उपोषण करण्यात आले.
डॉ. मुंदडा यांनी आंदोलकांची भेट घेऊन शिष्टमंडळ मुंबईत बोलावले. काल सायंकाळी श्री. चव्हाण यांची भेट घेऊन शिष्टमंडळाने मागणीबाबत चर्चा केली व लेखी निवेदन सादर केले. मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आगामी आठ दिवसांत हा प्रश्न मार्गी लावू आणि कागदपत्रांची पूर्तता होताच केजला नगर पंचायतीचा दर्जा देण्याचे आदेश बजावू, अशी ग्वाही दिली. याबाबतचे वृत्त शहरात समजताच कार्यकर्ते व आंदोलकांनी फटाके वाजवून मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे स्वागत केले.