Leading International Marathi News Daily

बुधवार, १७ जून २००९

(सविस्तर वृत्त)

कर्जाच्या आमिषाने गंडा!
वैजापूरमध्ये ५० जणांची तीन भामटय़ांकडून फसवणूक
औरंगाबाद, १६ जून /प्रतिनिधी

आय. सी. आय. सी. आय. बँकेकडून शेती-उद्योगासह वेगवेगळ्या कारणांसाठी तत्काळ कर्ज देण्याची योजना असल्याचे भासवून तिघांच्या एका टोळीने वैजापूर तालुक्यातील सुमारे ५०

 

जणांकडून १० टक्के रक्कम उकळून लाखो रुपयांना गंडा घालून पलायन केल्याचे आज समोर आले. फसविले गेल्याचे लक्षात आल्यानंतर यातील काहींनी आज वैजापूर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. सायंकाळपर्यंत कोणालाही अटक झाली नव्हती. या तिघांनीही पुण्याचा पत्ता दिला होता.
संजय पाटोळे, नितिन गुप्ता आणि समीर शेख अशी आरोपींची नावे असल्याचे सांगण्यात येते. ही नावे खरी की खोटी हे अद्यापि समजले नाही. या तिघांनी गंगापूर रस्त्यावरील संजय पाथरे यांच्या व्यापारी संकुलात ‘एक्सप्रेस सव्‍‌र्हिसेस’ या नावाने ‘दुकान’ उघडले होते. आय. सी. आय. सी. आय. बँकेच्या औरंगाबाद शाखेकडून शेती, गृह, वाहन, उद्योग, व्यवसायासाठी अवघ्या दहा दिवसांत मोठय़ा रकमेचे कर्ज मंजूर करण्यात येत असल्याची जाहिरात त्यांनी केली. अवघ्या काही दिवसांतच तालुकाभर तसा प्रचार झाला होता.
या जाहिरातीला बळी पडून अनेकांनी त्यांच्याशी संपर्क साधला. शेतकऱ्यांना सध्या पेरणीचे वेध लागले आहे. बी-बियाणे तसेच खते खरेदीसाठी शेतकरी उसनवारी करू लागला आहे. त्यातच ही योजना समोर आल्याने शेतकऱ्यांनी यांच्याकडे धाव घेतली. यासाठी कमीत कमी कागदपत्रे लागतात असेही सांगण्यात येत होते.
त्यानुसार अनेकांनी कागदपत्रांसह ‘एक्स्प्रेस सव्‍‌र्हिसेस’मध्ये धाव घेतली. पाटोळे कागदपत्रे घेऊन त्यांची सत्यता तपासण्यासाठी कर्जदाराच्या मालमत्तेची पाहणी करी. त्यामुळे त्यांच्याबद्दल कोणालाही संशय आला नाही. कर्जप्रकरणाची फाईल तयार झाल्यानंतर नियमानुसार १० टक्के रक्कम रोखीने बँकेत जमा करावी लागते, असे ते संबंधिताला सांगत. कसलाही विचार न करता कर्जदारांनी कर्ज रकमेच्या दहा टक्के रकमा रोखीने त्यांच्याकडे जमा केल्या. रोख रक्कम जमा करताच कर्जदाराला धनादेश देण्यात येत होता. आय. सी. आय. सी. आय. बँकेच्या ‘बिझनेस बॅकिंग न्यू करंट अकाऊंट’ (क्रमांक सीएकेटीटी ००४४०५५००६१) या खात्याचे हे धनादेश होते. सुमारे एक कोटी रुपयांचे धनादेश त्यांनी कर्जदारांना दिल्याचे समजते. त्यावर १२ जून तारीख होती.
भावी कर्जदार दि. १२ जूनची वाट पाहत होते. अनेकांनी धनादेश आपल्या खात्यावर जमा केले. ते धनादेश न वटता परत येणार हे नक्की असल्यामुळे तिघांनीही काल रात्री वैजापूर सोडून पलायन केले. जाताना त्यांनी एका कर्जदाराची दुचाकीही पळविली. मधल्या काळात मैत्री झाल्याने कर्जदाराने त्याला वापरण्यासाठी दुचाकी दिली होती. दरम्यान धनादेश वटले नसल्याचे अनेकांच्या लक्षात आल्यानंतर सकाळी ‘एक्स्प्रेस सव्‍‌र्हिसेस’कडे अनेकांनी धाव घेतली. एरवी सकाळीच उघडणारे हे दुकान बंद आणि त्या तिघांचे मोबाईलही बंद होते. त्यामुळे संबंधितांनी आय. सी. आय. सी. आय. बँकेच्या औरंगाबाद शाखेकडे चौकशी केली. बँकेची अशी कोणतीही योजना नसल्याचे उत्तर त्यांना मिळाले. तीन भामटय़ांनी अनेकांना गंडविल्याची वार्ता वैजापुरात पसरली आणि गंगापूर रस्त्यावर एकच गर्दी झाली. या जमावाने पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी प्रथम गुन्हा नोंदविण्यास टाळाटाळ केली होती. तथापि हे प्रकरण वरिष्ठांपर्यंत गेल्याने गुन्ह्य़ाची नोंद करण्यात आली. तिघेही भामटे वैजापूरच्या ‘सूर्या लॉज’मध्ये थांबले होते. त्यांनी तेथे ‘फ्लॅट क्रमांक १०, मानसी अपार्टमेंट, शिवाजीनगर, पुणे’ असा पत्ता नोंदविला होता. यातील दोघांना अनेकांनी औरंगाबादच्या सिडको भागात पाहिल्याचे समोर आले. आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.
गंडविण्यापूर्वी दिली ‘ओली पार्टी’
या तिघांनी काल रात्री काही कर्जदारांना ‘ओली पार्टी’ दिली. कर्ज मिळविण्यासाठी पाटर्य़ा द्याव्या लागतात, येथे कर्ज देणारेच पार्टी देत असल्यामुळे मोठय़ा दिमाखात कर्जदारांनी पार्टीचा आनंद घेतला. आमचे ‘टार्गेट’ पूर्ण झाल्यामुळे ही पार्टी देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले होते. पार्टीच्या तंद्रीत झोपलेले कर्जदार जागे झाले तेच फसविण्यात आल्याच्या बातमीने!