Leading International Marathi News Daily

बुधवार, १७ जून २००९

(सविस्तर वृत्त)

कळमनुरी, वसमतचे नगराध्यक्षपद काँग्रेसकडे; हिंगोलीत ‘राष्ट्रवादी’ला संधी
हिंगोली, १६ जून/वार्ताहर

जिल्ह्य़ातील तीन नगरपालिकांच्या अध्यक्षपदासाठी आज निवडणूक झाली. कळमनुरीत काँग्रेसच्या मुमताज बेगम बिनविरोध निवडून आल्या. वसमतमध्ये काँग्रेसच्या मनीषा कडतन यांनी भारतीय जनता पक्षाच्या सुषमा बोड्डेवार यांचा पराभव केला आणि हिंगोलीतून राष्ट्रवादी काँग्रेसचे गणेश लुंगे

 

विजयी झाले.
जिल्ह्य़ातील तिन्ही नगरपालिकांतील अध्यक्षपदांची निवडणूक आज झाली. हिंगोली येथे सात उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे बिरजू यादव, मीना बांगर, काँग्रेसच्या मीनाताई भिसे, सुधीरअप्पा सराफ व भा. ज. प.चे उमेश गठ्ठे यांनी उमेदवारी अर्ज परत घेतल्याने काँग्रेसचे शेख आरेफ व राष्ट्रवादी काँग्रेसचे गणेश लुंगे यांच्यात लढत झाली. सभेचे कामकाज सुरू झाल्यावर काँग्रेसचे उमेदवार शेख आरेफ व त्यांचे समर्थक काँग्रेसचे सर्व सदस्य अनुपस्थित राहिले. सभागृहात उपस्थित असलेले भा. ज. प.-शिवसेना युतीचे सात सदस्य तटस्थ राहिले. त्यांनी मतदानात भाग घेतला नाही. सभागृहात हजर असलेल्या बारा सदस्यांनी गणेश लुंगे यांना मतदान केले.
श्री. लुंगे यांच्या विजयानंतर त्यांच्या समर्थकांनी शहरातून विजयी मिरवणूक काढली. बँड, ताशे, फटाके, गुलालाची उधळण करीत शहरातील प्रमुख रस्त्यांवरून मिरवणूक काढण्यात आली होती. कळमनुरी येथे नगराध्यक्षपदासाठी दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सिद्दिका बेगम यांनी काल माघार घेतल्याने काँग्रेसच्या मुमताज बेगम यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला. निवडणूक अधिकाऱ्यांनी आज श्रीमती मुमताज बेगम यांच्या विजयाची घोषणा केली.
वसमतमध्ये नगराध्यक्षपदासाठी चार उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या हेमलता लालपोतू व इंदिराबाई साखरे यांनी काल अर्ज परत घेतले. आज झालेल्या मतदानात मनीषा कडतन यांना १४ व सुषमा बोड्डेवार यांना ११ मते मिळाली. निवडणूक अधिकाऱ्यांनी मनीषा कडतन विजयी झाल्याची घोषणा केली. वसमतमध्ये दोन्ही काँग्रेसची युती अभंग राहिल्याने श्रीमती कडतन विजयी झाल्या. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसकडून दगाफटका होणार अशी जिल्हाभर चर्चा होती ती फोल ठरली.
उपनगराध्यक्षांची बिनविरोध निवड
उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत कळमनुरीतून प्रश्न. जयंत भोयर, हिंगोली राष्ट्रवादी काँग्रेसचे बिरजू यादव, वसमत राष्ट्रवादी काँग्रेसच्या इंदिरा साखरे यांची बिनविरोध निवड झाली.