Leading International Marathi News Daily

बुधवार, १७ जून २००९

(सविस्तर वृत्त)

मुंडे-मुंदडा भेट
बीड, १६ जून/वार्ताहर

भारतीय जनता पक्षाचे खासदार गोपीनाथ मुंडे यांनी काल सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व सार्वजनिक बांधकाममंत्री (उपक्रम) डॉ. विमल मुंदडा यांची त्यांच्या सरकारी निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून भेटीत नेमकी कोणत्या राजकीय विषयावर चर्चा झाली याचा तपशील समजला नाही. रेल्वेच्या प्रश्नावर ही भेट असल्याचे

 

सूत्रांनी सांगितले.
लोकसभेच्या निवडणुकीत विजय मिळवल्यावर श्री. मुंडे यांनी सर्वच पक्षांच्या नेत्यांना बरोबर घेऊन रेल्वेचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रथम रेल्वे कृतिसमितीची बैठक घेऊन हा प्रश्न समन्वयातून सोडविण्याची घोषणा केली. यासाठी आपण सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना प्रत्यक्ष भेटून केंद्र सरकारकडे व रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे जाऊन अर्थसंकल्पात जास्तीची तरतूद घेण्यासाठी प्रयत्न करू, असे जाहीर केले होते.
डॉ. मुंदडा यांच्या मलबार हिल येथील ‘चित्रकूट’ या सरकारी निवासस्थानी श्री. मुंडे काल सायंकाळी गेले. या दोघांची अचानक भेट झाल्याचे वृत्त जिल्ह्य़ात पसरताच जिल्ह्य़ामध्ये खळबळ उडाली आहे. या भेटीत कोणत्या राजकीय विषयावर चर्चा झाली याचा तपशील कळाला नाही. तथापि श्री. मुंडे यांनी परळी-बीड-नगर रेल्वेमार्गासाठी जिल्ह्य़ाच्या मंत्री म्हणून डॉ. मुंदडा यांची भेट घेतल्याचे सांगण्यात आले. रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे शिष्टमंडळ घेऊन जाण्यासाठी श्री. मुंडे जिल्ह्य़ाचे संपर्कमंत्री बबनराव पाचपुते, मुख्यमंत्री अशोक चव्हाण, उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.