Leading International Marathi News Daily

बुधवार, १७ जून २००९

(सविस्तर वृत्त)

सत्तापरिवर्तनाचा काँग्रेसचा प्रयत्न फसला
उस्मानाबाद, १६ जून/वार्ताहर

अपक्षांना पुढे करून काँग्रेसने नगरपालिकेमध्ये सत्तापरिवर्तनासाठी केलेले प्रयत्न सपशेल फसले. काँग्रेसचे तीन नगरसेवक अनुपस्थित राहिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे शेख सत्तार शेख रसुल यांनी आज १५ मते मिळवून नगराध्यक्षपद पटकाविले. उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसशी सलगी

 

करणारे काँग्रेसचे मकरंद राजेनिंबाळकर यांची निवड झाली.
राष्ट्रवादी काँग्रेसपुरस्कृत अपक्ष नगरसेवक काझी नादेरउल्ला हुसेनी यांना पुढे करून काँग्रेसने अपक्षांच्या जोरावर नगराध्यक्षपद मिळविण्याचा घाट घातला होता. केंद्रीय अवजड उद्योगमंत्री विलासराव देशमुख तुळजापूर येथे आले असताना अपक्ष नगरसेवकांसह काँग्रेस नेत्यांनी खलबते केली होती.
नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी वेळात वेळ काढून राज्यमंत्री राणा जगजितसिंह पाटील यांनी रात्रीतून बऱ्याच हालचाली केल्या. आज मतदानाला काँग्रेसच्याच तीन महिला नगरसेवक गैरहजर राहिल्या. उजाबाई मोतीराम मोहिते, आरेफा जिकरे, तब्बसुम बाबा मोमीन अशी त्यांची नावे आहेत.
नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून शेख सत्तार शेख रसुल यांनी व काँग्रेसकडून मुनीर कुरेशी यांनी अर्ज भरला. अपक्षांची मोट बांधून नगराध्यक्षपद मिळविण्यासाठी काँग्रेसने काझी नादेरउल्ला हुसेनी यांच्या नावाला पाठिंबा दिला. तथापि काँग्रेसचा डाव यशस्वी झाला नाही. काँग्रेसचे अधिकृत उमेदवार मुनीर कुरेशी यांनीही काँग्रेस पुरस्कृत अपक्षास मतदान केल्यामुळे त्यांना शून्य मते मिळाली.
उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे मकरंद शूरसेन राजेनिंबाळकर यांच्या विरोधात काँग्रेसचे खलील सय्यद यांनी अर्ज दाखल केला. राष्ट्रवादी काँग्रेसशी सलगी असल्याने राजेनिंबाळकर यांना १५ मते मिळाली. शिवसेनेचे एकमेव सदस्य बाळासाहेब काकडे उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीस अनुपस्थित होते. पीठासन अधिकारी म्हणून सुनील यादव यांनी काम पाहिले.
हार-तुरे नाकारले!
निवडीनंतर नगराध्यक्ष शेख सत्तार शेख रसुल यांनी हारतुरे घेण्यास नकार दिला. ‘माझ्या घरी दु:ख आहे,’ असे ते म्हणाले. डॉ. पद्मसिंह पाटील यांना अटक झाल्याचा संदर्भ असल्याने नंतर हारतुऱ्यांचा आग्रहही फारसा झाला नाही.