Leading International Marathi News Daily

बुधवार, १७ जून २००९

(सविस्तर वृत्त)

काँग्रेस ‘बॅकफूट’वर!
उस्मानाबाद, १६ जून/वार्ताहर

लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केलेला करार नगरसेवकांनी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोडीत काढला. त्यामुळे काँग्रेसला जिल्ह्य़ात सर्वत्र ‘बॅकफूट’वर

 

जावे लागले आहे. जिल्ह्य़ातील आठ नगरपालिकांपैकी उस्मानाबाद, उमरगा, भूम, नळदुर्ग येथे राष्ट्रवादी काँग्रेसने नगराध्यक्षपद पटकाविले. कळंबमध्ये पुन्हा शिवसेनापुरस्कृत आघाडीच्या नावाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे किरण हौसलमल नगराध्यक्ष झाल्याने काँग्रेसला फटका बसला. मुरुम नगरपालिकेमध्ये काँग्रेसची निर्विवाद सत्ता असल्याने तेथे शिवाजी चेंडके यांना नगराध्यक्षपद बिनविरोध मिळाले.
तुळजापूर नगरपालिकेमध्ये मात्र बरीच उलथापालथ झाली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शेतकरी कामगार पक्ष यांनी एकत्रितपणे दिलीप गंगणे यांना निवडून देण्याचा पक्षादेश काढला होता. पक्षाच्या नेत्यांचा आदेश झुगारून देत शे. का. प.मधून बंडखोरी करणाऱ्या भारती नारायण गवळी नगराध्यक्ष झाल्या. नगरसेवकांची सहल आणि बऱ्याच पडद्यामागच्या घडामोडीनंतर तुळजापुरातील नगरपालिकेत बंडखोरांनी विजय मिळविला.
अशीच बंडखोरी कळंब नगरपालिकेतही झाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी शिवसेनेशी हातमिळवणी केली. शिवसेनेचे दोन नगरसेवक व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाच नगरसेवकांनी आघाडीची मोट बांधली. शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख नरसिंग जाधव यांनी या आघाडीचे नेतृत्व केले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे हौसलमल नगराध्यक्ष झाले व शिवसेनेचे चोंदे उपनगराध्यक्ष म्हणून निवडून आले.
उमरग्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रभावती बेंबळगे नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या. उपनगराध्यक्षपदी अतिक मुन्शी यांची निवड झाली. नळदुर्ग, भूम आणि मुरुमच्या निवडी बिनविरोध झाल्या. भूममध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय गाढवे व संगीता मस्कर यांची बिनविरोध निवड झाली.