Leading International Marathi News Daily

बुधवार, १७ जून २००९

(सविस्तर वृत्त)

परभणीत नगराध्यक्षपदावरून काँग्रेसमध्ये गटबाजी
परभणी, १६ जून/वार्ताहर

नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसमध्ये कोणाच्या नावावर एकमत होते, हे अजूनही स्पष्ट झाले नाही. नगरसेवकांची मते जाणून घेण्यासाठी आलेल्या पक्षनिरीक्षकांनी आपला अहवाल मात्र आज

 

प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याकडे पाठविला असल्याचे समजते.
सर्वाधिक नगरसेवक असलेल्या काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवत राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेना, भारतीय जनता पक्ष, मुस्लीम लीग, अपक्ष अशी मोट बांधून अडीच वर्षे सत्ता उपभोगली. राष्ट्रवादी काँग्रेस यापुढे जिल्ह्य़ाच्या राजकारणात स्थानिक स्वराज्य संस्थामध्येही काँग्रेससोबतच राहील असा शब्द कृषी खात्याचे राज्यमंत्री सुरेश वरपूडकर यांनी लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान दिला होता. त्यामुळे या वेळी होणारा नगराध्यक्ष काँग्रेसचाच राहील, ही बाब स्पष्ट असली तरीही कोणत्या नावावर एकमत होते, हे गुपित अजूनही उलगडले नाही. नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून कमलताई काकडे, शफीसा बेगम जलालोद्दीन, जयश्री खोबे यांनी अर्ज दाखल केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या रेणुका उत्तमराव शिंदे, रजिया बेगम युनूस सरवर यांनीही अर्ज दाखल केले आहेत. पुढे उपाध्यक्षपदावर दावा सांगण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने हे अर्ज भरले असल्याची दाट शक्यता आहे.
काँग्रेसने अरुण मुगदिया (औरंगाबाद) यांना निरीक्षक म्हणून पाठविण्याले होते. त्यांनी काल पक्षाच्या नगरसेवकांची मते जाणून घेतली. सायंकाळी सुरू झालेली ही प्रक्रिया पहाटेपर्यंत चालली. नगराध्यक्षपदाची निवडणूक पहिल्यांदाच एवढी चुरशीची होत असून रात्रभर निरीक्षक आणि नगरसेवकांची खलबते सुरूच होती.
विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अल्पसंख्य समाजाला नगराध्ययक्षपद देण्यात यावे, अशी भूमिका घेत नगरसेवकांचा एक मोठा गट शफिसा बेगम जलालोद्दीन यांच्या नावाला पसंती देत आहे. या गटात १४ नगरसेवक असल्याचे समजते. सहा नगरसेवकांच्या गटाने जयश्री खोबे यांच्या बाजूने शब्द टाकला आहे. पक्षश्रेष्ठ जी भूमिका घेतील, ती आपल्याला मान्य असल्याचे दोन नगरसेवकांनी स्पष्ट केले आहे.
सरोदे यांच्याविरुद्ध शिवसेनेच्याच तीन नगरसेवकांचे रणशिंग
उपमगराध्यक्ष अतुल सरोदे यांच्या कारभारावर नाराज असलेल्या शिवसेनेच्या तीन नगरसेवकांनी स्वतंत्र गट तयार केला आहे. गेल्या अडीच वर्षात सरोदे यांनी स्वत:ची पोळी भाजण्याव्यतिरिक्त दुसरे कोणतेही काम केले नाही, असे या नगरसेवकांचे म्हणणे आहे. नगरसेवक विनायक काळे, वसंत मुरकुटे, मनोज पवार यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले की, शिवसेनेवर सरोदे यांच्यामुळे नामुष्कीची वेळ आली. भविष्यात त्यांनी कोणतीही भूमिका घेतली तरीही आम्ही सहमत असणार नाही. प्रभाग क्रमांक २८ मध्ये सरोदे यांनी केलेल्या कामाची चौकशी करण्यात यावी, अशीही मागणी त्यांनी केली.
अजूनही शिवसेनेचा संसार ‘राष्ट्रवादी’सोबतच!
पालिकेच्या आपल्या अडीच वर्षाच्या कारकीर्दीत झालेल्या कामांची माहिती देण्यासाठी नगराध्यक्ष प्रताप देशमुख यांनी घेतलेल्या पत्रकार बैठकीत उपनगराध्यक्ष अतुल सरोदेही उपस्थित होते. परभणीतील सभेत शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेने राष्ट्रवादीशी असलेली युती तोडून खंबीर विरोधी पक्षाची भूमिका घेत जनहिताचे काम करावे, असे फर्मान सोडले होते. एवढय़ा तंबीनंतरही आज शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा सुखाचा संसार पुन्हा एकदा दिसून आला.
शिवसेनेने खंबीर विरोधी पक्षाची भूमिका पालिकेत घ्यावी, अशी नेत्यांची भूमिका असताना आपली भूमिका काय, असे श्री. सरोदे यांना पत्रकारांनी विचारले. ते म्हणाले की, शहराच्या विकासासाठी आम्ही सोबत आहोत. सध्या पालिकेत विरोधी पक्ष अस्तित्वातच नाही काय, अशी पत्रकारांनी विचारणा केली असता अजून पक्षाचा कोणताच आदेश आला नाही.