Leading International Marathi News Daily

बुधवार, १७ जून २००९

(सविस्तर वृत्त)

अंबाजोगाईमध्ये ‘राष्ट्रवादी’-भाजप युती
अंबाजोगाई, १६ जून/वार्ताहर

गेल्या सात वर्षापासून काँग्रेसची सत्ता अबाधित ठेवणाऱ्या राजकिशोर मोदी यांच्या ताब्यातून नगरपालिका हिसकावून घेण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला अखेर आज यश मिळाले.

 

उपनगराध्यक्षपदावरून रणकंदन होण्याची चिन्हे दिसू लागताच राष्ट्रवादी काँग्रेसने भारतीय जनता पक्षाशी हातमिळवणी करून सत्तेचा तिढा सोडविला! नगराध्यक्षपदी रोमण साठे व उपनगराध्यक्षपदी भा. ज. प.चे कमलाकर कोपले यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केले. पालिकेत काँग्रेसचे १४ सदस्य असतानाही पक्ष निवडणूक प्रकियेपासून दूर राहिल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
बीड जिल्ह्य़ातील एकमेव अंबाजोगाई पालिका काँग्रेसच्या ताब्यात होती. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस-भा. ज. प.ने युती करून राजकिशोर मोदी यांच्या ताब्यातील पालिका खेचून घेण्यात राष्ट्रवादी काँग्रेस यशस्वी झाली. पालिकेत काँग्रेसचे १४, राष्ट्रवादी काँग्रेसचे ९, भा. ज. प.चे २, शिवसेना, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष व अपक्ष प्रत्येकी १ असे बलाबल आहे. काँग्रेसच्या सहा सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळवणी केल्यामुळे पालिकेची सत्ता आपल्या पक्षाकडे खेचण्यात सार्वजनिक बांधकाममंत्री (उपक्रम) डॉ. विमल मुंदडा व त्यांचे पुत्र अक्षय मुंदडा यांना यश आले.
नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोमणा साठे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे आज जाहीर झाले. उपनगराध्यक्षपदासाठी काँग्रेसचे जयकुमार लोढा व दिनेश परदेशी आणि भा. ज. प.तर्फे कमलाकर कोपले यांनी अर्ज दाखल केला. परंतु काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे श्री. कोपले यांचीही बिनविरोध निवड झाली.
सर्व चित्र आज दुपारी दोननंतर स्पष्ट झाल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस व भा. ज. प.च्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून आनंद व्यक्त केला. भा. ज. प.कडे दोनच नगरसेवक असताना त्यांना उपनगराध्यक्षपद दिल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. काँग्रेसकडे १४ नगरसेवक असतानाही राजकिशोर मोदी यांच्या ताब्यातील पालिका विरोधकाकडे देण्यासाठी काँग्रेसच्याच पदाधिकाऱ्यांनी मोठी मेहनत घेतल्याची या परिसरात चर्चा ऐकावयास मिळाली.
या निवडणुकीच्या निमित्ताने ‘राजकारणात कालचा शत्रू आज मित्र होऊ शकतो’, हे आज अंबाजोगाईकरांनी अनुभवले. लोकसभेच्या निवडणुकीत आमनेसामने लढणाऱ्या भा. ज. प.-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना एकमेकांच्या गळ्यात गळे घालताना पाहून कार्यकर्त्यांसोबत सर्वसामान्यही आश्चर्यचकित झाले. विशेष म्हणजे या आश्चर्यकारक युतीला पाठिंबा देण्याचे कार्य काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याकडून घडल्याने या विश्वासात भर पडली. केवळ श्री. मोदी यांचे खच्चीकरण करणे या एकमेव उद्देशाने या काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी सुत्रे हलवल्याची चर्चा शहरात दिवसभर सुरू होती.