Leading International Marathi News Daily

बुधवार, १७ जून २००९

(सविस्तर वृत्त)

तुळजापूरच्या नगराध्यक्षपदी भारती गवळी
तुळजापूर, १६ जून/वार्ताहर

काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाच्या जिल्हा अध्यक्षांनी काढलेल्या व वृत्तपत्रात प्रसिद्ध केलेल्या पक्षादेशास झुगारून राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५, काँग्रेसच्या २ व शेकापच्या

 

२ नगरसेवकांनी बंडखोर नगरसेविका भारती गवळी यांची नगराध्यक्षपदी निवड केली.
त्यामुळे आघाडीच्या वतीने निवडणूक रिंगणात उतरलेले अधिकृत उमेदवार दिलीप गंगणे यांना पराभवास सामोरे जाण्याची वेळ आली. उपाध्यक्षपदी मंदाकिनी साळुंके यांचा एकमेव अर्ज आला होता. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली.
अडीच वर्षापूर्वी काँग्रेस-शेकाप युतीकडे पुरेसे संख्याबळ असतानाही तत्कालिन परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व करणाऱ्या देवानंद रोचकरी यांनी प्रस्थापित शेकापला सुरुंग लावीत राष्ट्रवादीकडे नगराध्यक्षपद खेचण्याचा करिश्मा केला होता. त्यानंतरच्या कालावधीत शहर स्तरावर राजकीय वर्तुळात सातत्याने स्थित्यंतरे होत गेली.
एवढेच नव्हे तर न्यायालयीन प्रक्रिया व प्रकरण दाखल झाल्याच्या कारणावरून शासकीय स्तरावरून हालचाली झाल्यामुळे व नगरसेवकांमध्ये बेबनाव झाल्याने रोचकरी यांना नगराध्यक्षपद सोडावे लागले. त्यामुळे शेकाप-काँग्रेस युतीच्या नगरसेविका साधना साखरे यांना ९ महिन्यांच्या कालावधीपर्यंत नगराध्यक्षपद भूषविण्याची संधी मिळाली होती.
अडीच वर्षाच्या कालावधीनंतर नूतन नगराध्यक्ष निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर राजकीय समीकरणे पार बदलून गेल्याचे प्रतीत झाले. प्रभाग क्र. १८ मधील नगरसेविका भारती नारायणराव गवळी यांच्यासह राष्ट्रवादीचे ५ शेकाप १ व काँग्रेसच्या एका नगरसेवकांनी प्रस्थापितांना धक्का देण्याचा निर्णय घेऊन अज्ञातस्थळी जाण्याचा पवित्रा घेतला.
त्यानंतर शेकाप, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांशी संपर्क न ठेवण्याचे धोरण अंगीकारल्याचेही स्पष्ट झाले. मात्र निवडणूक तोंडावर आल्यावर या तिन्ही पक्षाच्या जिल्हास्तरीय प्रमुखांनी आपसात बोलणीअंती तडजोड झाल्याचे व प्रत्येक पक्षाकडे १० महिने अध्यक्षपद ठेवण्याचा निर्णय झाल्याचे घोषित करण्यासाठी शनिवारी पत्रकार परिषदही घेतली.
तसेच, आघाडीच्या वतीने दिलीप गंगणे यांचे अधिकृत उमेदवार म्हणून नाव घोषित केले. यासाठी पक्षादेश काढले व वर्तमानपत्रात जाहिरातही दिली. पण बंडखोरी करणाऱ्या नगरसेवकांनी या निर्णयाला केराची टोपली दाखवली.
नगराध्यक्षपदाच्या मतदानाच्या वेळी अधिकृत गंगणे यांना केवळ ६ मते, तर भारती गवळी यांना ९ मते मिळाली.