Leading International Marathi News Daily

बुधवार, १७ जून २००९

(सविस्तर वृत्त)

भोकरला नगरपालिकेचा दर्जा देण्याची मागणी
भोकर, १६ जून / वार्ताहर

ग्रामपंचायतीला नगरपंचायतीऐवजी नगरपालिकेचा दर्जा देण्यात यावा, अशी एकमुखी मागणी

 

सर्वपक्षीय बैठकीत व्यक्त करण्यात आली.
‘भोकर ग्रामपंचायतला नगर पंचायतचा दर्जा देण्यात यावा की नगरपालिकेचा’ यासंदर्भात आमदार बापूसाहेब गोरठेकर यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली. यावेळी सरपंच नारायण गौड, काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते नागनाथ घिसेवाड, समाज कल्याण सभापती सुरेश वाघमारे, बाजार समितीचे सभापती प्रकाश देशमुख भोसीकर, शिवसेनेचे सतीश देशमुख, भारतीय जनता पक्षाचे माधव पवार, राष्ट्रवादीचे भगवान दंडवे, सुभाष पाटील किन्हाळकर, बाजार समितीचे संचालक रामचंद्र मुसळे, आनंदराव बोरगावकर, दीपक सोनटक्के, बालाजी पाटील, माधव पाटील, जाकेर पठाण, दत्ता पांचाळ, सरपंच दिलीप देशमुख, गणेश कापसे, पंचायत समिती सदस्य शंकर मोघाळीकर आदी उपस्थित होते.
उपसरपंच वसियोद्दीन इनामदार यांनी भोकरला नगरपंचायतीचा दर्जा देण्यासाठी ठराव पाठवावा असे जिल्हा परिषद नांदेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे पत्र आल्याचे सांगितले. त्यावर आमदार गोरठेकर यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावून नगरपंचायत की नगरपालिका याविषयी मत ऐकून घेऊनच ठराव पाठवावा अशी सूचना केली. त्या अनुषंगाने ही बैठक बोलाविण्यात आली होती.
अनेकांनी या वेळी बोलताना भोकरची लोकसंख्या सद्यस्थितीत ४० हजार झाल्यामुळे विकास कामात अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे नगर पंचायतऐवजी नगरपालिकाच करण्यात यावी अशी बहुसंख्येने मागणी समोर आली.
आमदार गोरठेकर म्हणाले की, या भागाचा आमदार म्हणून मला जेवढे काही शक्य होते ते मी केले. नांदेड जिल्ह्य़ाचे सुपुत्र अशोकराव चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री असल्यामुळे भोकर शहराला नगरपालिका घोषित करण्यासाठी अडचण येणार नाही. ते आपली मागणी मान्य करतील अशी अपेक्षा व्यक्त केली.
सामाजिक विकासासाठी आपण राजकारण कधीच करणार नाही, अशी ग्वाही गोरठेकर यांनी उपस्थितांना दिली. नागनाथ घिसेवाड यांनीही विकासकामात कुठेही अडचण येणार नाही असे सांगितले. आमदार गोरठेकर व मुख्यमंत्री चव्हाण यांनी लक्ष देऊन नगरपालिका मंजूर करून घ्यावी. या दोघांचाही जंगी सत्कार करण्याचे अभिवचन त्यांनी दिले.
गोरठेकर, घिसेवाड एकत्र?
भोकर मतदारसंघातील कट्टर राजकीय विरोधक म्हणून सर्वपरिचित असणारे आमदार श्री. गोरठेकर व नागनाथ घिसेवाड हे राजकारणातील धुरंधर. परंतु विकास कामाच्या मुद्यावर आम्हीही एकत्र बसू शकतो हे भोकर ग्रामपंचायतने ठेवलेल्या बैठकीत जवळजवळ बसून अगदी मोकळेपणाने चर्चा करताना दिसून आले.