Leading International Marathi News Daily

बुधवार, १७ जून २००९

(सविस्तर वृत्त)

तपास बाजूला ठेवून सभागृहाला माहिती देण्यासाठी पोलिसांची धावपळ
मानसी देशपांडे खूनप्रकरण
औरंगाबाद, १६ जून/प्रतिनिधी

मानसी देशपांडे खून प्रकरणी विधान परिषदेत लक्षवेधी सूचना उपस्थित केली. घटना कशी घडली आणि पोलीस काय कारवाई करत आहेत याची माहिती सभागृहाला देण्यात येईल असे सत्ताधारी

 

पक्षाच्या वतीने सांगण्यात आले. दुपारी ही माहिती देण्यात येणार होती. ‘ही घटना आणि सुरू असलेल्या तपासाची सविस्तर माहिती तातडीने सादर करा’ असे आदेश आले आणि तपास बाजूला ठेवून पोलिसांची धावपळ सुरू झाली.
शुक्रवारी (१२ जून) पहाटे ही घटना उजेडात आली होती. घटनेला चार दिवस उलटून गेले तरीही या खुनाचे धागेदोरे पोलिसांना मिळाले नाहीत. ‘तपास सुरू आहे’ असे पोलिसांच्या वतीने सांगण्यात येते. स्वत: पोलीस आयुक्त के. एल. बिष्णोई यांनी या तपासात लक्ष घातले आहे. आठ पथके या प्रकरणाचा तपास करत आहेत.
आज सकाळी विधान परिषदेत यावर आमदार नीलम गोऱ्हे यांनी लक्षवेधी उपस्थित केली. दुपारच्या सत्रात सभागृहाला सविस्तर माहिती देण्यात येईल असे सरकारच्या वतीने सांगण्यात आले आणि लगेच आयुक्तालयाकडून माहिती मागविण्यात आली. त्यामुळे पोलीस आयुक्तांसह सगळेच कामाला लागले. सकाळी नेहमीप्रमाणे पत्रकारांनी पोलिसांकडे विचारणा केली असता ‘आधी सभागृहाला माहिती देतोय तपासाचे नंतर पाहण्यात येईल’ असे सांगण्यात आले.
संगणकाची तपासणी
दरम्यान खूनप्रकरणात काहीही प्रगती झालेली नाही. ‘चौकशी सुरू आहे’ असे उत्तर देण्यात आले. सकाळचे सत्र सविस्तर माहिती विधानसभेला देण्यातच गेले. त्यानंतर पोलिसांनी मानसीच्या संगणकाची तपासणी केली. यासाठी पुण्याहून एच. एल. डिकोस्टा या तज्ज्ञाला पाचारण करण्यात आले होते.
सायंकाळपर्यंत संगणक तसापणी सुरू होती. त्याचा तपशील उपलब्ध होऊ शकला नाही.