Leading International Marathi News Daily

बुधवार, १७ जून २००९

(सविस्तर वृत्त)

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कम्युनिस्ट पक्षाचे आंदोलन
विधानसभेसाठी अश्फाक सलामी यांची उमेदवारी जाहीर
औरंगाबाद, १६ जून/खास प्रतिनिधी

खते, बी-बियाणे आणि शेतकऱ्यांच्या अन्य प्रश्नांवर २५ जून ते १ जुलैपर्यंत तालुक्याच्या ठिकाणी आंदोलन करण्याचा निर्णय भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या जिल्हा समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

 

या बैठकीत आगामी विधानसभेच्या फुलंब्री, गंगापूर व औरंगाबाद मध्य या मतदारसंघात भाकपने आपला उमेदवार उभा करण्याचे ठरविले आहे. औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघातून अश्फाक सलामी यांची उमेदवारीवर राज्य कार्यकारिणीने शिक्कामोर्तब केल्याची माहितीही या बैठकीत देण्यात आली.
भाकपच्या औरंगाबाद जिल्हा समितीची बैठक मंगळवारी खोकडपुरा कार्यालयात झाली. या वेळी रंगनाथ कळसकर, प्रकाश बनसोड आणि मिलिंद काकडे यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर फुलंब्री (२५ जून), कन्नड (२७ जून) आणि गंगापूर (१ जुलै) या तालुक्यांच्या तहसील कार्यालयावर निदर्शने आणि धरणे आंदोलन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
दारिद्रयरेषेखालील कुटुंबाचे पुनसर्वेक्षण करा, सर्वाना पिवळ्या रंगाच्या शिधापत्रिका द्या, रोजगार हमीची कामे सुरू करा या मागणीसाठी १० ते १९ जुलैपर्यंत औरंगाबाद जिल्ह्य़ातील सर्व तहसील कार्यालयावर मोर्चे काढण्यात येणार आहे. २० जुलैला औरंगाबाद शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.
औरंगाबाद जिल्ह्य़ातील फुलंब्री, गंगापूर आणि औरंगाबाद मध्य या तीन विधानसभा मतदारसंघात भारतीय कम्युनिस्ट पक्ष निवडणुका लढविणार आहे. औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघात पक्षाचे शहर सचिव आणि माजी नगरसेवक अश्फाक सलामी यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अन्य दोन मतदारसंघाचा निर्णय राज्य कार्यकारिणीकडे प्रलंबित आहे. औरंगाबाद मध्य मतदारसंघासाठी निवडणूक समिती गठीत करण्यात आली आहे. कार्यकर्त्यांचा मेळावा, समविचारी पक्ष-संघटनांची बैठक घेण्याचे या वेळी ठरले. निधी संकलनाचे कामही ही समिती करणार आहे.
या बैठकीत लोकसभा निवडणूक निकालांचा आढावा घेण्यात आला. राज्य सचिव डॉ. भालचंद्र कांगो यांनी या बैठकीत यावर विवेचन केले. या वेळी मनोहर टाकसाळ, जिल्हा सचिव प्रश्न. राम बाहेती आदी उपस्थित होते.