Leading International Marathi News Daily

बुधवार, १७ जून २००९

(सविस्तर वृत्त)

‘कॅग’ चा आक्षेप माजी खासदार जयसिंगराव गायकवाड यांनी फेटाळला
औरंगाबाद, १६ जून/खास प्रतिनिधी

‘खासदारांनी कामे न सुचविल्यामुळे निधी परत गेला. खासदार निधीच्या २०५ कोटी रुपयांवर पाणी’ असा आक्षेप कॅगने आपल्या अहवालात घेतला आहे. हा आक्षेप बीडचे माजी खासदार

 

जयसिंगराव गायकवाड यांनी फेटाळून लावला आहे.
कॅगच्या अहवालात जयसिंगराव गायकवाड यांचेही नाव आहे. ते नाव का आले हे मात्र मला समजण्यापलीकडचे आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते जयसिंगराव गायकवाड यांनी दिली. त्यांनी एकूण १४ प्रश्नही विचारले आहेत. खासदारांच्या निधी वापस जातो का, खासदारांना फक्त कामे सुचवायची जबाबदारी आहे, हे खरे नाही का? खासदार निधीतील खर्चाला जिल्हाधिकाऱ्यांच्या अंतर्गत लेखापरीक्षणानंतर सी.ए.कडून पुन्हा लेखापरीक्षण करून घेण्याचा दंडक केंद्र शासनाने घातला आहे. मग राज्य सरकारने सी.ए.च्या नियुक्तया केल्या का, असा सवालही माजी खासदार जयसिंगराव गायकवाड यांनी केला आहे. राज्य सरकारने या नियुक्तया केल्या असतील तर त्या कधीपासून केल्या, याचा खुलासा करण्यात यावा. अनेक ठिकाणी खासगी सी.ए.कडून लेखापरीक्षण करावे लागते. या सी.ए.ची बाजारभावाने शुल्क कोणी द्यायचे, असेही त्यांचे म्हणणे आहे.
खासदार निधीच्या भरवशावर पूर्ण केलेल्या कामाचे पैसे अजूनही जिल्हाधिकाऱ्यांकडून मिळाले नाहीत. तांत्रिक मान्यता वेळेवर देण्याची जबाबदारी नियोजन अधिकाऱ्यांची पर्यायाने जिल्हाधिकाऱ्यांची नाही का? त्यांचा मेहनताना एक टक्का खासदार निधीतून त्यांना मिळत नाही का, असेही जयसिंगराव गायकवाड यांचे म्हणणे आहे.
कॅगने बीड लोकसभा मतदारसंघात खासदाराने कामे सुचविली नाही म्हणताना खातरजमा करून घेतली नाही का? माझा खासदार निधीतील पै न् पैची कामे मी पुरेशा आधी सुचविली आहेत. एवढेच नव्हे तर गेल्या सात वर्षात मी या निधीच्या रकमेपेक्षाही जास्त कामे सुचविली आहेत, असेही जयसिंगराव गायकवाड यांनी सांगितले.
खासदारांचा निधी वापस जातो याबाबत आरडाओरड करावयाचे काही कारण नाही. या संदर्भात कामचुकार करणाऱ्या किती अधिकाऱ्यांना राज्यशासनाने निलंबित व बडतर्फ केले आहे, असा सवालही माजी खासदारांनी केला.