Leading International Marathi News Daily

बुधवार, १७ जून २००९

(सविस्तर वृत्त)

प्रश्नध्यापकांचे सहाव्या वेतन आयोगासाठी धरणे आंदोलन
औरंगाबाद, १६ जून/खास प्रतिनिधी

विद्यापीठ महाविद्यालयीन प्रश्नध्यापक संघटना (एमफुक्टो) आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रश्नध्यापक संघटना यांच्या वतीने येथील उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयासमोर सोमवारी धरणे आंदोलन करण्यात आले. सहावा वेतन आयोग व इतर प्रलंबित

 

मागण्यांसाठी हे आंदोलन झाले.
केंद्र सरकारने प्रश्नध्यापकांना सहावा वेतन लागू करण्याचे निर्देश ३१ डिसेंबर २००८ ला उच्च शिक्षण विभागाचे मुख्य सचिव यांना पत्र पाठवून दिले आहेत. केंद्र सरकारने प्रश्नध्यापकांसाठी सहावा वेतन आयोग लागू करून सहा महिने होऊनसुद्धा राज्य सरकारने त्याची अंमलबजावणी केलेली नाही. यासाठी केंद्राकडून रक्कमही मिळणार आहे. परंतु त्यासाठीही राज्यशासनाला वेळ मिळाला नाही, अशी टीका या संघटनांनी केली आहे.
नेट-सेटऐवजी पीएच.डी. व एम.फिलला मान्यता, अधिव्याख्यातांची वरिष्ठ पदावर निवड झाल्यानंतर निवृत्त योजना पूर्ववत लागू करणे आदी मागण्याही या संघटनेने केल्या आहेत. एमफुक्टोचे कोषाध्यक्ष डॉ. अशोक तेजनकर, सचिव डॉ. सुजात काद्री, डॉ. एम. एन. भिसे यांनी निदर्शने करणाऱ्या प्रश्नध्यापकांसमोर मार्गदर्शन केले. येत्या २२ जूनला राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संघटनेमार्फत निदर्शने करण्यात येणार आहे, असे डॉ. तेजनकर यांनी सांगितले.