Leading International Marathi News Daily

बुधवार, १७ जून २००९

(सविस्तर वृत्त)

संस्कार प्रबोधिनीच्या मुख्याध्यापकाची खुर्ची जप्त
औरंगाबाद, १६ जून /प्रतिनिधी

मालमत्ता करासाठी देण्यात आलेला धनादेश न वटल्यानंतर नोटीस देऊनही रक्कम अदा न केल्यामुळे पालिकेकडून आज संस्कार प्रबोधिनी विद्यालयाच्या मुख्याध्यापकाची खुर्ची जप्त

 

करण्यात आली. प्रभाग अधिकारी महावीर पाटणी यांनी ही कारवाई केली.
या शाळेकडे ४३ हजार ४१९ रुपयांची थकबाकी होती. मार्च महिन्याच्या शेवटी त्यांनी पालिकेला या रकमेचा धनादेश दिला होता. हा धनादेश न वटता परत गेला. धनादेश परत आल्यानंतर पालिकेने पुन्हा या शाळेला नोटीस बजावून रक्कम रोखीने जमा करण्यास बजावले होते. मात्र त्यांनी या नोटिसीला उत्तर दिले नाही. त्यामुळे पुन्हा नोटीस देण्यात आली. त्या नोटिसीवरही उत्तर न आल्याने आज दुपारी शाळेत जाऊन मुख्याध्यापकाची खुर्ची जप्त करण्यात आली. या शाळेला आठ दिवसांची मुदत देण्यात आली असून या कालावधीत रकमेचा भरणा न केल्यास मुध्याध्यापकांचे दालन जप्त करण्यात येणार असल्याचे पाटणी यांनी सांगितले.
मालमत्ता कराच्या भरण्यापोटी दिलेले धनादेश न वटता परत जाण्याचे प्रमाण जास्त आहे. धनादेश परत आले की पालिकेच्या वतीने नोटीस बजावण्यात येते. तेथेच ही रक्कम जमा होते. मात्र नोटीस देऊनही रक्कम जमा न होण्याची ११ प्रकरणे आहेत. या सर्व प्रकरणांमध्ये कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
पालिकेच्या वतीने आज करण्यात आलेल्या अन्य एका कारवाईत आय. एस. एफ. या खासगी संस्थेचे कार्यालय सील करण्यात आले तर हॉटेल अंगत-पंगतलाही सील करण्यात आले. अन्य थकबाकीदारांविरुद्धही अशीच कारवाई करण्यात येणार आहे.