Leading International Marathi News Daily

बुधवार, १७ जून २००९

(सविस्तर वृत्त)

कृषी उत्पन्न समितीच्या परिसरातून जाणारा नाला गायब?
महापालिका आता शोध घेणार
औरंगाबाद, १६ जून /प्रतिनिधी

भूसंपादन करण्यापूर्वी आताच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेतून सुमारे २८ फूट रुंदीचा नाला वाहत होता. बाजार समितीने सादर केलेल्या पहिल्या विकास आराखडय़ातही हा नाला दिसत होता. मात्र आता नाला जागेवर दिसत नाही आणि विकास आराखडय़ातूनही तो गायब झाला आहे.

 

याची चौकशी आता महापालिका करणार आहे.
सुरेवाडी प्रभागाचे नगरसेवक आणि येथील मूळ शेतकरी सीताराम सुरे यांनी स्थायी समितीसमोर हा मुद्दा उपस्थित केला. कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी येथील पंधरा शेतकऱ्यांकडून १७५ एकर जमिन संपादीत करण्यात आली होती. या शेतकऱ्यांमध्ये सुरे यांचाही समावेश होता. सुरे जमीन कसत असताना तेथून २८ फूट रुंदीचा नाला वाहत होता. भूसंपादनानंतर बाजार समितीच्या वतीने सादर करण्यात आलेल्या १९९८ च्या पहिल्या विकास आराखडय़ात हा नाला दर्शविण्यात आला होता. त्यानुसार बांधकामाला परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर अवघ्या तीनच वर्षानी सादर करण्यात आलेल्या दुसऱ्या विकास आराखडय़ात हा नाला दर्शविण्यात आला नाही. पहिला विकास आराखडा न पाहताच दुसऱ्या आराखडय़ाला मंजुरी देण्यात आली. या मधल्या काळात नाला गायब झाला असून त्याचा शोध घेण्यात यावा, अशी मागणी सुरे यांनी केली.
शासकीय संस्थेनेच नाला गायब करण्याचा हा प्रकार गंभीर असून याची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नगररचना विभागातील अधिकारी यात दोषी असून त्यांचीही चौकशी करावी, असे आदेशात म्हटले आहे.
याबरोबरच बाजार समितीने बांधकाम करताना पालिकेची परवानगी घेतलेली नाही. शिवाय पालिकेला विकलेल्या काही जमिनीची कागदपत्रेही देण्यात आलेली नसल्याचे समोर आले. पालिकेने बाजार समितीकडून खरेदी केलेल्या दहा एकर जमिनीची पी. आर. कार्ड पालिकेच्या नावावर होण्यापर्यंत बाजार समितीच्या कोणत्याही लेआऊटला मान्यता देण्यात येऊ नये, असे आदेशही देण्यात आले.